२० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन साजरे करावे सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाचे गौरव देशपांडे यांचे आवाहन

तारां कित Avatar

 

पुणे, दि. १३ ऑक्टोबर, २०२५ : मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन कधी साजरे करावे याबद्दल शंका असून अनेक पंचांगकर्त्यांमधेच संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र याला बळी न पडता संपूर्ण राज्यात अमावस्या या तिथीला येणाऱ्या प्रदोषकाळात अर्थात २० ऑक्टोबर रोजी सूर्यास्तानंतर पुढील अडीच तासांत लक्ष्मीपूजन साजरे करावे, असे आवाहन सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाचे गौरव देशपांडे यांनी केले आहे.

 

याविषयी बोलताना गौरव देशपांडे म्हणाले, “अमावस्या या तिथीला जे लक्ष्मीपूजन साजरे करण्यात येते ते प्रदोषकाळी (म्हणजेच सूर्यास्तानंतर साधारण अडीच तासाच्या कालावधी) करावे. त्यामुळे ज्या दिवशी प्रदोषकाळात अमावस्या मिळते त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे. दोन्हीही दिवस प्रदोषकाळात अमावस्या मिळत असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे, दोन्ही दिवशी प्रदोषकाळात किमान एक घटिका (२४ मिनिटे) अमावस्या मिळत असेल तरीही दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे आणि जर आदल्या दिवशी संपूर्ण प्रदोषकाळात अमावास्या मिळत असेल तर आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे वेगवेगळे निर्णय शास्त्रांत सांगितले आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये २० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदोषकाळात अमावस्या संपूर्ण मिळते त्यामुळे संपूर्ण राज्यात २० ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन साजरे करणे हे शास्त्रसंमत ठरणार आहे.”

 

याबरोबरच पूर्व आणि उत्तर भारताचा विचार केल्यास अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, नागालँड, प. बंगाल, बिहार, ओडिशा, आसाम, त्रिपुरा, झारखंड या प्रांतात मात्र, २१ ऑक्टोबर, २०२५ रोजी लक्ष्मी पूजन साजरे करणे शास्त्र संमत ठरणार आहे. तर गुजरात, राजस्थान, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगना या सर्व राज्यांमध्ये २० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदोषकाळात संपूर्ण अमावस्या मिळत असल्यामुळे येथे देखील २० ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन साजरे करावे.

 

जगाचा विचार केल्यास मध्य व पूर्व युरोपमध्ये दुबई, अबूधाबी, रियाध, जेद्दा, कुवेत, मस्कत, लंडन, पॅरिस, कैरो, नैरोबी, रोम, इटली, दोहा, बर्लिन या ठिकाणी २० ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन साजरे करावे असेही देशपांडे म्हणाले.

 

संपूर्ण अमेरिका आणि कॅनेडामध्ये म्हणजे वॉशिंग्टन डी. सी, शिकागो, न्यूयॉर्क, मेक्सिको सिटी, लॉस एंजेलिस, डॅलस, ह्युस्टन, फिलाडेल्फिया, बोस्टन या सर्व ठिकाणी देखील २० ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन साजरे करावे तर आशिया ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड यांचा विचार केला तर बँकॉक, सिंगापूर, टोकियो, थायलंड, सिडनी, हाँगकाँग, क्वालालंपूर, सोल, शांघाय, मेलबर्न या सर्व ठिकाणी २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन करावे, असे देशपांडे यांनी नमूद केले. ज्या गावी राहता त्या गावात सूर्यास्तानंतर पुढील अडीच तासांत म्हणजे प्रदोषकाळात लक्ष्मीपूजन साजरे करावे. राहुकाळ वगैरे कोणत्याही गोष्टी यावेळी बघायच्या नसतात असेही देशपांडे यांनी नमूद केले.

 

गौरव देशपांडे यांच्याविषयी – गौरव देशपांडे हे महाराष्ट्रात गेली १५ वर्षे सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग प्रकाशित करीत आहेत. १५ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर अजूनही आपला आयटी व्यवसाय सांभाळून ते पंचांग आणि ज्योतिषशास्त्र यात उल्लेखनीय काम करत आहे. बंगळुरू येथील कुडली श्रृंगेरी पीठातर्फे त्यांना ज्योतिर्विद्या वाचस्पती ही उपाधी प्रदान करण्यात आली असून कुडली श्रृंगेरी पीठाचे अकरावे शंकराचार्य मठाधिपती श्री श्री विद्याविद्येश्वर भारती यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे. देशपांडे यांच्या भारतीय खगोलशास्रावर आधारित पंचांग अभ्यासाची दखल घेत सदर सन्मानाने त्यांना गौरविण्यात

आले आहे.

 

 

Tagged in :

तारां कित Avatar