पिंपरी, दि. १५ ऑक्टोबर २०२५ –: भारतीय संस्कृतीतील प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (१८ ऑक्टोबर ) पहाटे ६ वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात भव्य स्वरूपात पार पडणार असून, शहरातील नागरिकांसाठी संगीत, नृत्य आणि कला यांचा सुंदर संगम अनुभवण्याची ही एक खास संधी ठरणार आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती या महोत्सवाला असणार आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, महेश लांडगे, शंकर जगताप, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे तसेच माजी खासदार, माजी आमदार, माजी नगरसदस्य,माजी नगरसदस्या तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे,तृप्ती सांडभोर तसेच महानगरपालिकेतील विविध विभागप्रमुख, विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘दिपगंध सुरांचा ….सुरांच्या सुवासात उजळलेली दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम सादर होणार आहेत. यामध्ये कोमल कृष्णा, राजेश्वरी, विनय देशमुख, गणेश मोरे हे गायक कलाकार गीत गायन करणार आहेत. तर नितीन खंडागळे, सुबोध जैन, दीपक काळे, शाम चंदनशिवे, सागर घोडके ही मंडळी वादन कलाकार म्हणून साथ देणार आहेत. असल्याची माहिती क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांनी दिली आहे.
महानगरपालिका नागरिकांसमोर दिवाळीच्या पारंपरिक स्वरूपाची, सांस्कृतिक वारशाची आणि कलात्मक सौंदर्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात होणाऱ्या या कार्यक्रमात शास्त्रीय, सुगम, भक्तिगीत, नाट्यसंगीत तसेच लोकसंगीताच्या स्वरांनी सभागृह दुमदुमून जाईल.
‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमात नामांकित गायक, वादक आणि नृत्यकलावंतांची रंगतदार सादरीकरणे सादर केली जाणार आहेत. पारंपरिक पोशाख, दिव्यांच्या सजावटीसह आणि दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाला मंगल वातावरण लाभणार आहे. सर्वासाठी मोफत असणाऱ्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाला नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून पहाटेच्या या संगीतसफरीचा आनंद घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
—–
कोट १ –
महापालिका प्रशासनाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमधून शहरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या माध्यमातून ‘दिवाळी पहाट’ सारख्या उपक्रमांद्वारे संस्कृतीचे जतन, कलावंतांना प्रोत्साहन आणि नागरिकांमध्ये सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
—————-
कोट २ –
धनत्रयोदशीच्या दिवशी शास्त्रीय, सुगम, भक्तिगीत, नाट्यसंगीत तसेच लोकसंगीताच्या स्वरांनी दिवाळीच्या आनंदोत्सवात नागरिकांना स्वर, ताल आणि भावनांचा सुरेल मेळ यांचा एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव मिळणार आहे. त्याचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा
पंकज पाटील, उप आयुक्त, क्रीडा व सांस्कृतिक विभाग, पिंप
री चिंचवड महानगरपालिका