वैयक्तीक व सामाजिक ध्येयपूर्तीसाठी कार्यकारणभाव जाणून काम करायला हवे वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या वार्षिक पदवीदान समारंभात डॉ. अनुराग कश्यप यांचे प्रतिपादन

तारां कित Avatar

पुणे. दि. 16: व्यक्तिगत आणि सामाजिक या दोन्ही स्तरांवर अंतिम ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी आपण करत असलेल्या कार्यामागचा कार्यकारणभाव जाणून काम केले पाहिजे असे प्रतिपादन भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनचे (बीएनसीए) प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी नुकतेच केले. वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या वार्षिक पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू आणि वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या अध्यक्ष डॉ. गीताली टिळक यांनी भूषवले.

 

वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या वतीने यावर्षी दि. 4 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत पुण्यासह भारतातील 14 केंद्रांवर वेद, भारतीय दर्शनशास्त्रे आणि पुराणे या विषयांच्या परीक्षा घेण्यात आल्या. एकूण 1070 विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या. अभिज्ञ, कोविद, चूडामणी या पदव्या या समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या. एकूण 42 विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते देण्यात आले. यात वरदानंद भारती, द. पां. किंजवडेकर, रजनी गंगाधर जोशी, विश्वनाथशास्त्री दंडगे, परशुराम परांजपे, प्रभाकर गोखले इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या वतीने या प्रसंगी वे. मू. शांतारामशास्त्री भानोसे घनपाठी आणि विद्वान राजेश्वरशास्त्री जोशी यांचाही त्यांच्या कार्याबद्दल सन्मानपत्र, शाल व श्रीफल देऊन डॉ. कश्यप यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

 

डॉ. कश्यप म्हणाले, चौफेर वाचन करून पौरोहित्य करणाऱ्या वैदिकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपला व्यासंग वाढवावा. कारण समाजाचे गुरू म्हणून वैदिकांची भूमिका खूप मोठी आहे. आरोग्यविषयक जागरुकताही विद्यार्थी व वैदिकांमध्ये आवश्यक आहे.

 

सामाजिक प्रसार माध्यमांचा सुयोग्य वापर करून आपले प्राचीन भारतीय ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात योगवासिष्ठातले अनेक संदर्भ देऊन क्वांटम फिजिक्स आणि योगवासिष्ठ यांचा संबंध डॉ. कश्यप यांनी स्पष्ट केला. वैदिकांच्या सपत्नीक सत्कारांबद्दल त्यांनी अतिशय संतोष व्यक्त करून वैदिकांच्या पत्नींचा त्यांच्या पतींच्या कार्यातल्या सहभागाचे मोल मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

डॉ. गीताली टिळक म्हणाल्या की, लोकमान्य टिळकांनी वेदविद्येविषयी मांडलेले विचार आज खरे ठरत आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आंतरविद्याशाखीय अध्ययानात वैदिकज्ञानाचा समावेश केला गेला आहे. केवळ पाठांतरापाशी वेदाध्ययन न थांबता समाजकार्यासाठीही त्याचा उपयोग झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी प्रास्ताविक आणि स्वागत सभेच्या कार्यवाह श्रद्धा परांजपे यांनी केले. परीक्षाविषयक सविस्तर अहवाल सभेचे उपाध्यक्ष डॉ. मल्हार कुलकर्णी यांनी सादर केला. सभेचे कार्याध्यक्ष भगवंत ठिपसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन तुषार भट यांनी केले.

Tagged in :

तारां कित Avatar