Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedएंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड हिपॅटीकोगॅस्ट्रोक्टोमी प्रक्रियेमुळे पुढील टप्प्यात असलेल्या कर्करोगग्रस्त रूग्णाची काविळीतून मुक्तता

एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड हिपॅटीकोगॅस्ट्रोक्टोमी प्रक्रियेमुळे पुढील टप्प्यात असलेल्या कर्करोगग्रस्त रूग्णाची काविळीतून मुक्तता

केईएम हॉस्पिटल पुणे येथील डॉक्टरांनी केलेल्या प्रक्रियेमुळे 36 वर्षीय तरूणाला कर्करोगाचे पुढील उपचार घ्यायला मार्ग मोकळा

 

पुणे,14 ऑक्टोबर 2025 : केईएम हॉस्पिटल पुणे येथील डॉक्टरांनी तीव्र कावीळ झालेल्या 36 वर्षीय तरूण शेतकऱ्यावर एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड हिपॅटीकोगॅस्ट्रोक्टोमी प्रक्रिया करत पुढील कर्करोग उपचारासाठी मार्ग मोकळा केला.ही परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होती.या तरूणाला पुढील टप्प्यातील पित्ताशयाचा कर्करोग झाला असून तो पसरला होता. कावीळ झाल्यामुळे बिलिरूबीनची पातळी वाढली होती आणि यामुळे केमोथेरपी उपचार घेण्यास अडथळा येत होता.

 

या रूग्णाने अन्य ठिकाणी तपासण्या केल्या होत्या.त्यावेळेस काविळीची लक्षणे होती,त्याचबरोबर ताप,खाज,वजन कमी होणे,भूक मंदावली होती. एलएफटी (लिव्हर फंक्शन टेस्ट) चाचणीमध्ये बिलिरूबीनची पातळी वाढल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर सोनोग्राफीमध्ये पित्ताशयात मांसपेशी वाढल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे पेट सीटी करण्याचा सल्ला दिला आणि या चाचणीतून पित्ताशयाचा कर्करोग असल्याचे निदान झाले.तसेच हे यकृत व लसिका ग्रंथींमध्ये (लिम्फ नोडस) पसरल्याचे निष्पन्न झाले. ही मांसपेशी पित्तनलिकेवर दाब देत असल्याने काविळीचा धोका बळावला.कर्करोग पसरल्याने स्थिती ही शस्त्रक्रियेने आटोक्यात आणणे शक्य नव्हते,त्यामुळे रूग्णाला केईएम हॉस्पिटल पुणे येथे पाठविण्यात आले.

 

याबाबत माहिती देताना केईम हॉस्पिटल पुणे येथील पोट विकार तज्ञ डॉ.अक्षय काळे म्हणाले की,जेव्हा रूग्ण आमच्याकडे आला तेव्हा काविळीबरोबरच खाज येणे,गडद रंगाची लघवी आणि चरबीयुक्त मल अशी लक्षणे होती.यावर उपचार करणे गरजेचे होते,कारण कर्करोगाचे उपचार घेण्यासाठी हा आजार दूर करणे महत्त्वाचे होते.प्रारंभी आम्ही पित्ताचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलांजिओपॅनक्रियाटोग्राफी (पित्तनलिकेतील अडथळे दूर करण्यासाठी एंडोस्कोप द्वारे केली जाणारी प्रक्रिया) करण्याचा विचार केला.ही प्रक्रिया परिणामकारक ठरली नाही तर एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड गाईडेड प्रक्रिया करावी लागेल याबाबत रूग्णाच्या नातेवाईकांना आम्ही सांगितले होते. पित्ताशयात मांसपेशी असल्याने लहान आतड्याच्या पहिल्या भागावर दाब येत होता आणि पित्तनलिकेपर्यंत पोहचणे अवघड होते.त्यामुळे आम्ही एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड गाईडेड कोलेडॉकहोडिओडेनोस्टोमी (ईयूएस-सीडीएस) ही कमीत कमी छेद असलेली प्रक्रिया करण्याचा विचार केला.पित्तनलिका आणि लहान आतड्याचा पहिला भाग (डिओडेनम) मध्ये संपर्क प्रस्थापित करण्यासाठी वापरली जाणारी ही प्रक्रिया तेव्हा केली जाते,जेव्हा ईआरसीपी परिणामकारक ठरत नाही.मात्र मोठी गाठ असल्याने पित्तनलिकेपर्यंत पोहचता येत नव्हते.

 

अशा या गुंतागुंतीच्या स्थितीत खुली शस्त्रक्रिया किंवा पोट आणि अन्ननलिकेमध्ये संपर्क प्रस्थापित करण्यासाठी केली जाणारी हिपॅटीकोगॅस्ट्रोक्टोमी ही अद्ययावत एंडोस्कोपी प्रक्रिया असे दोनच पर्याय उरले होते. हिपॅटीकोगॅस्ट्रोक्टोमी ही प्रक्रिया आम्ही करायचे ठरवले. यामध्ये एका छोट्याशा सुईने जठराच्या भिंतीमधून पित्तनलिकेत एक छोटीशी सुई टाकण्यात आली.त्यानंतर अंशत: झाकलेला एक जिओबार स्टेंट टाकण्यात आला.त्यामुळे पित्त बाहेर पडण्यासाठी एक मार्ग निर्माण झाला.यातून रूग्णाची काविळीतून मुक्तता झाली.प्रक्रिया झाल्यानंतर त्यादिवशीच संध्याकाळी रूग्णाला द्रवपदार्थ खाण्यास सुरूवात करण्यात आली आणि 3 ते 4 दिवसात सामान्य अन्न खाण्यास सुरूवात करता आली.आठवडाभरात रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

 

अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये उच्च कौशल्याची गरज असते,कारण पित्ताची गळती,संसर्ग आणि रक्तस्त्रावाचा संभाव्य धोका जास्त असतो.

 

केईएम हॉस्पिटलचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ.राकेश शहा म्हणाले की, या प्रक्रियेतून गुंतागुंतीची स्थिती हाताळण्याचे आमच्या डॉक्टरांचे कौशल्य आणि गुंतगुंतीच्या परिस्थितीत अद्ययावत उपचार प्रदान करण्याची आमची कटिबध्दता दर्शविते.

 

उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ.अक्षय काळे यांच्यासह विभागप्रमुख डॉ.सुहास वागळे,भूलतज्ञ डॉ.जॉयशंकर जाना व डॉ.खंडू पडवळ,तसेच तंत्रज्ञ स्वप्निल पाटील,सौ.तोडकर,सौ.कुचेकर व योगेश जाधव यांचा

समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments