पुणे
शेठ हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या व्यवहाराशी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदारातून मी बाहेर पडल्यानंतर ११ महिन्यांनी हा व्यवहार झाला. त्यामुळे या व्यवहाराशी माझा संबंध येत नाही. राजू शेट्टी किंवा कोणीही वस्तुस्थिती पडताळल्यास ही बाब समजेल, त्यामुळे माहिती न घेताच चुकीचे आरोप करू नयेत, असे पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी स्पष्ट केले.
मोहोळ यांनी रविवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ‘३०-३२ वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना असे चुकीचे आरोप झाल्यास एखाद्या कार्यकर्त्याचे मनोबल खच्ची होते. एखाद्याचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. पुणेकरांचा खासदार असल्याने माझ्यावर होत असलेल्या आरोपांवर पुणेकरांना स्पष्टीकरण देणे मला गरजेचे वाटले, म्हणून मी माझी बाजू मांडली, असे मोहोळ यांनी नमूद केले.
‘जैन बोर्डिंगचे खरेदीखत, व्यवहार गोखले बिल्डर्स या बांधकाम व्यावसायिकाने केला. मी गोखलेंचा भागीदार आहे, असा आरोप माझ्यावर केला गेला. मी माझ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात तसे घोषित केले आहे. मी शेती व्यवसाय करतो, बांधकाम व्यवसाय करतो, हे सर्व मी स्पष्टपणे नमूद केले होते. मी स्वच्छपणे व्यवसाय केला व त्याची माहिती कागदावर दाखवली,असे मोहोळ म्हणाले.
‘गोखले इस्टेट एलएलपी’ आणि ‘गोखले फ्यूचर एलएलपी’ या दोन कंपन्यांमध्ये मी भागीदार होतो. यातील एक संस्था २०२२ आणि दुसरी २०२३ मध्ये स्थापन झाली. या दोन्ही कंपन्यांमध्ये एकही रुपयाचा व्यवसाय, व्यवहार झालेला नाही, ही माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवरून कोणालाही पडताळून पाहता येईल. केंद्रात मंत्री झाल्यानंतर नोकरी करता येत नाही, भागीदारी करता येत नाही. त्यानुसार या दोन्ही भागीदारी संस्थांमधून मी २५ नोव्हेंबर २०२४ रोजी राजीनामा देत बाहेर पडलो. त्यानंतर जैन बोर्डिंग ट्रस्टची बैठक १६ डिसेंबर २०२४ रोजी बैठक झाली. त्यात बोर्डिंगच्या पुनर्विकासासाठी विकसकाला देण्याचा निर्णय घेतला. २० डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी पुणे आणि मुंबईतील काही वर्तमानपत्रांत निविदा प्रसिद्ध केली. पुढे गोखले बिल्डर्सने आठ ऑक्टोबर २०२५ रोजी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबत खरेदीखत केले. मी या भागीदारी संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर ११ महिन्यांनी हा व्यवहार झाला. मग यात माझा संबंध येतोच कुठे ? असा सवाल मोहोळ यांनी या वेळी केला. या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नसताना मुरलीधर मोहोळ यांनी तीन हजार कोटींची जमीन ३०० कोटी रुपयांत घेतली, असा आरोप केला गेला.
जमिनीची किंमत २४० कोटी
जमीन एक लाख २० हजार चौरस फूट आहे. मोकळ्या जमिनीसाठी २० हजार रुपये चौरस फूट इतका दर कुठेही नाही. एक वेळ हा दर गृहीत धरला तरी या जमिनीची किंमत २४० कोटी रुपयेच होते. मग अशा परिस्थितीत जमिनीची किंमत तीन किंवा चार हजार कोटी भासवून बेताल आरोप केले जात आहेत. आरोप करणाऱ्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि मगच आरोप करावेत, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पुण्यातील जैन बांधवांवर माझा विश्वास आहे, पुण्यातील एकाही जैन बांधवाने माझ्यावर आरोप केलेला नाही. मी त्यांच्या व ते माझ्यासोबत आहेत. त्यांच्या भावना समजून घेत त्यांना मदत कशी करता येईल, हाच माझा प्रयत्न आहे,असे मोहोळ यांनी नमूद केले.
राजू शेट्टींची नूरा कुस्ती
‘राजू शेट्टी यांना चुकीची माहिती देण्यात आली. त्यांनी शहानिशा न करताच, मला न विचारताच बेछूट आरोप केले. त्यांनी मला विचारले असते, तर मी वस्तुस्थिती मांडली असती. त्यांच्यावर माझा आक्षेप नाही. एक खरी कुस्ती असते आणि दुसरी नुरा कुस्ती. राजू शेट्टी हे मला नूरा कुस्तीचे खेळाडू वाटतात. दोन्हीतला फरक पुणेकर व कोल्हापूरकर चांगलाच जाणतात,’असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगावला.
बिळातले उंदीर बाहेर
राजू शेट्टींनी आरोप केल्यानंतर काही बिळात लपलेले उंदीर बाहेर येऊन बोलू लागले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी या नेत्याने सगळ्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. मी तेव्हाही आणि आताही एकही शब्द बोलणार नाही. ही व्यक्ती वैफल्यग्रस्त आहे, सगळीकडून नाकारली गेली आहे, अशा शब्दात मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांना टोला लगावला. तर महायुतीत आमच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे. नेत्यांचे आदेश आम्ही ऐकतो. धंगेकर हा काय प्रकार आहे त्यांचे त्यांनाच माहित. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले पण एकही कागद दाखवला नाही, असे मोहोळ म्हणाले.
—–
ऑलिंपिक समितीच्या निवडणुकीत मी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही आहेत. राज्यातील युती आणि खेळ हा वेगळा विषय आहे. मात्र, ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात होईल.
गुन्हेगारी खपवून घेणार नाही
कोथरूड मध्येच काय, पुण्यातही गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. पोलिस त्यांचे काम करत आहेत. कोणीही पुण्याला बदनाम करू नये. काही गोष्टी घडल्या आहेत ते स्वीकारून पोलिस दलामार्फत योग्य कारवाई व्हावी, यासाठी मी सातत्याने पोलिस आयुक्तांच्या संपर्कात आहे