पुणे : श्री कसबा गणपती मंदिराची रचना पाहिली, तर त्यात सभामंडप म्हणजेच अंतराळ आणि गर्भगृह आहे. शिवकालीन सभामंडप पूर्णपणे यादवकालीन शैलीत केलेले आहे. बाह्यभाग पूर्णपणे लाकडाचा आहे. मंदिरातील सुंदर कमानी पाहिल्या तर त्यामध्ये केळ फुलाची मराठा शैलीतील कमान रेखीव कोरलेली दिसते. आतील भागात स्तंभांवर उलट नाग दिसतात आणि आत गणरायाची स्वयंभू मूर्ती पाहायला मिळते. अशी माहिती देत इतिहास अभ्यासक अमोघ वैद्य कसबा गणपती मंदिराची स्थापत्यशैली पुणेकरांसमोर उलगडली.
ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने दिपावलीच्या निमित्ताने दीपावली उत्सवाचे आयोजन मंदिरामध्ये करण्यात आले आहे. ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर आणि पुरातन मंदिरांच्या स्थापत्यशैलीचा इतिहास याविषयावर प्रसिद्ध अभ्यासक व व्याख्याते अमोघ वैद्य यांचे व्याख्यान झाले.
अमोघ वैद्य म्हणाले, मुरार जगदेवाने पुण्यावर आक्रमण केले आणि पुणे बेचिराख झाले. त्या वेळी पुण्याचे ग्रामदैवत उभे होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब यांना ग्रामदेवतेने जणू बोलावले. यादव शैलीत त्यांनी मंदिर पुन्हा उभे केले. आताचा जो भाग आपल्याला दिसतो, तो पेशवे काळात जोडला गेला. मानाचे पहिले ग्रामदैवत श्री कसबा गणपती, याला अक्षता दिल्याशिवाय कोणताही कार्यक्रम होत नसे. श्रीमंत पेशवे देखील मोहिमेला जाण्यापूर्वी गणरायाला सन्मान देऊनच जात असत.
ते पुढे म्हणाले, पुण्यात अशी अनेक सुंदर मंदिरे आहेत. त्यामध्ये श्री केदारेश्वर मंदिर आहे, जे खूप पुरातन असून १२व्या शतकातील आहे. या मंदिरात एक अत्यंत रोचक पंचमुखी शिवलिंग आहे. महादेवाचे पाच चेहरे म्हणजेच ईशान, सद्यो, जात, तत्वपुरुष, वाम देवा आणि अघोर ही पंचमुखी शिवपिंडी आजही पाहता येते. पुण्याजवळ आणखी एक ग्रामदेवता आहे, ज्याला आपण श्री तांबडी जोगेश्वरी म्हणतो. पुण्यातील श्री तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी अशी मंदिरे पाहणे हे एक महत्त्वाचे ज्ञान आहे.