सलग १४ व्या वर्षी अष्टसहस्त्र दीपोत्सवातून शिवरायांना मानवंदना

तारां कित Avatar

दिवाळी पाडवासंध्येला होणार ८ हजार पणत्यांचा लखलखाट – शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे एसएसपीएमएस शाळेच्या प्रांगणात आयोजन

 

पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे दिवाळी पाडवा बुधवार, दि. २२ ॲाक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता “श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव सोहळा” पर्व १४ वे आयोजन श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस शाळा प्रांगण, छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे करण्यात आले आहे. दीपोत्सवाचे उद्घाटन पोलीस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील तसेच शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या स्वराज्य घराण्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

 

शिवरायांचा हे जगातील पहिले भव्य अश्वारुढ स्मारक आहे तसेच एकसंघ ओतीव काम केलेले एकमेव स्मारक आहे. राजर्षी छत्रपती शाहु महाराज पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या पुतळ्याचे अनावरण झाले होते. पुतळ्याचे यंदा ९८ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. पुतळयाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात येणार आहे.

 

स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानिपत वीर महादजी माळवदकर, पानिपत वीर महादजी व दादजी हरपळे, दक्षिण दिग्विजय वीर मानाजी मोरे ह्या स्वराज्यघराण्यांचा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागााची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन तसेच शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात पदार्पण केल्याबद्दल दुर्ग अजिंक्यतारा वीर किल्लेदार मानाजी साबळे, शुरवीर सावंत स्वराज्यघराणे या स्वराज्यघराण्यांचा दीपोत्सवाचे सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे.

 

दीपोत्सव सोहळायाचे आयोजन दीपोत्सवाचे संकल्पक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, सचिन पायगुडे, शंकर कडू, समीर जाधवराव, निलेश जेधे, गोपी पवार, प्रवीण गायकवाड, मोहन पासलकर, किरण शितोळे, महेंद्र भोईटे, विशाल गव्हाणे, निलेश जगताप यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने या अनोख्या नेत्रदिपक दीपोत्सवा मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

Tagged in :

तारां कित Avatar