पुणे –
‘कार्तिकी एकादशी’ या मंगल दिनी भगवान श्रीगोपाळकृष्णाची ‘महापूजा’ अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाली. या दिव्य सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून साधक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.
या पवित्र दिनाचे औचित्य साधून मंदिरात श्रीमद् भगवद्गीतेच्या संपूर्ण १८ अध्यायांचे पठण, विष्णू सहस्त्रनामाचे पठण आणि तुलसी अर्चन करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय आणि चैतन्यमय झाले. पूजेनंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता आदरणीय कल्याणी नामजोशी ताई यांच्या सुश्राव्य प्रवचनाने झाले. ज्याचा सर्वांनी लाभ घेतला. गिरवी हे भगवान श्रीकृष्णांचे एक महत्त्वाचे वसतीस्थान असून येथे दर्शन, उपासना, सेवा करणाऱ्या भाविकांना उत्तम अनुभव व प्रचिती येत आहे असा उल्लेख केला. भक्तीमार्ग प्रचार व प्रसार कार्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
लांबून प्रवास करून आलेल्या व दर्शन घेतलेल्या भाविकांनी कार्यक्रमानंतर अत्यंत आनंद व समाधान व्यक्त केले आणि येथे येऊन कृतकृत्य झाल्याचे नमूद केले. भाविक नागपूर, संभाजीनगर, परभणी, सोलापूर, मुंबई, नाशिक अशा दूरवरच्या शहरांतून आले होते.


