पुणे, दि. 31 ऑक्टोबर २०२५ : पाहिलेली घटना व्यक्त करणे एवढेच साहित्याचे काम नसून ती गोष्टीरूपात मनात रुजणे महत्त्वाचे असते . जेव्हा एखादी घटना कथारूपात येते तेव्हा ती साहित्याचे लेणं ल्यालेली कलात्मक निर्मिती होते. लेखकाच्या सांस्कृतिक, सामाजक व वैयक्तीक मनोविश्वातील सूत्रात अशावेळी नेहमीपेक्षा काही वेगळं गवसणंं व दिसण्यातून त्याची मांडणी वेगळेपणाने केली जाते. ही सारी वैशिष्ट्ये 1960च्या दशकात इंग्लंडमध्ये वास्तव्यास गेलेल्या पुणेकर ज्येष्ठ कथाकार शुभांगी साठे यांच्या ‘सा मो सा’ (साहेबिणीच्या मोहक साठवणी) या व्यक्तीचित्रणात्मक कथांमधून प्रभावीपणे अभिव्यक्त होतात, असे प्रतिपादन संस्कृतच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. ज्योत्स्ना खरे यांनी केले.
‘सा मो सा’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. खरे यांच्यासह 86 वर्षे वयाच्या लेखिका शुभांगी साठे, त्यांचे पुत्र महेश साठे, कन्या डॉ. माधुरी साठे-कश्यप आणि सून नीता साठे व जावई बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप उपस्थित होते. डॉ. अनुराग कश्यप यांनी प्रास्तविक तसेच आभारप्रदर्शन केले. डॉ माधुरी कश्यप यांनी शुभांगी साठे यांच्या मुलाखत घेताना या पुस्तकामागची भूमिका विशद केली. ‘सा मो सा’ या व्यक्तीचित्रणात्मक कथांच्या पुस्तकाचे वाचक म्हणून विवेक सबनीस यांनी विचार मांडले. या पुस्तकासाठी काम करणाऱ्या अजित ठोंबरे, चंद्रशेखर बेगमपुरे, अनिरूद्ध घैसास आणि प्रसन्न पेठे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
डॉ. खरे पुढे म्हणाल्या की, माणूस लेखक म्हणून जेव्हा देशाटन करतो तेव्हा तो केवळ भौगोलिक अंतर कापत नाही तर त्याचा सांस्कृतिक भवतालही बदलतो. त्यावेळी वाट्याला आलेल्या दोन भिन्न संस्कृतींमधील साम्य व वेगळेपणा नेमकेपणाने टिपणे ही जाणतेपणाने होणारी गोष्ट नसते. शुभांगी साठे यांच्याप्रमाणे अनेक जण परदेशात गेले पण सगळ्यांना लिहिता आलं नाही. हे पुस्तक आपल्याला ‘टाईम मशिन’ प्रमाणे 1960च्या दशकात नेते व ‘साहेबाचा देश’ कसा होता हे सांगते. घरापासून लांब व प्रतिकुल परिस्थितीत शुभांगी साठे यांना त्यावर कथा लिहाव्याशा वाटणे हेच विशेष असून त्याकाळात लिहिली जाणारी आलंकारीक व कृत्रिम भाषाशैलीचा लवलेशही त्यामध्ये नाही. उलट ती भाषा रोजच्या जगण्यातली असून त्यातून मानवी जगण्याला पोषक असणाऱ्या विविध रसांचा परिपोष करते .
शुभांगी साठे म्हणाल्या की, वडीलांमुळे आपल्याला लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे व परदेशी जाण्याची इच्छा पूर्ण करणारे पती डॉक्टर शरद साठे होते. तेथे चांगली ब्रिटिश शेजारीण मिळाली व तिचा आलेला अनुभव यातून पहिली कथा लिहिली व तिला भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे पुढील कथा लिहू शकले. मध्यंतरी पडलेल्या खंडात एका वाचक महिलेने प्रोत्साहन दिल्यामुळे इंग्लंडमधील अनुभवांवर आणखी कथा लिहू शकले.
शुभांगी साठे यांची मुलाखतीच्या दरम्यान डॉ. माधुरी कश्यप व महेश साठे म्हणाले की, लेखिकेपलिकडे असणाऱ्या आई शुभांगी यांचे विविध पैलूंमध्ये मराठी माध्यमात शिकलेली आई शेजारीण इव्हलीन हिच्यामुळे उत्तम ब्रिटिश इंग्रजी बोलायला लागली. तेथील दिव्यांग मुलांसाठी सेवाभावी कार्य केले. भारतात शालेय मुलांसाठी मराठी व इंग्रजीतून शिकवण्या घेतल्या. स्वत:चे उत्तम शिक्षण झाले असतानाही तिने स्वत:ची स्वतंत्र कारकीर्द करता गृहिणी म्हणून पती व मुलांसाठीच उत्तम संसार केला.
प्रसिद्ध लेखक व अनुवादकार प्रसन्न पेठेे म्हणाले की, शुभांगी साठे यांना 1968 मध्ये इंग्लंडमधील चार वर्षांच्या वास्तव्यात व नंतर 1981 ते 2003 मध्ये भेटलेली नाना प्रकारची माणसं, मिळालेल्या मैत्रिणी, इंग्लंडचा गरठा, तेथील राहण्यातली मजा आणि येणाऱ्या अडचणी अशा अनेकविध विषयांवर खुमासदार शैलीत लेखन करता आले. मानवी भावनांचे कंगोरे टिपत खूप प्रांजळपणे मांडलेल्या अनुभवांच्या गोष्टींचं ‘सा मो सा’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय झालं आहे.
सामोसा पदार्थ व ‘सा मो सा’ कथासंग्रह
डॉ. ज्योत्स्ना खरे म्हणाल्या की, सामोसा हा चटपटीत व पोटभरीचा पदार्थ असून हे शीर्शक असलेलं पुस्तकही मनभरीचं झालं आहे! सामोसा हा मुळात पोर्तुगाल, ग्रीस तसेच मध्यपूर्वेतला पदार्थ असून तो जेव्हा भारतात आला त्ोव्हा त्याने कात टाकली. मुळात मांसाहरी असणाऱ्या या पदार्थाने भारतात आल्यावर ‘देश तसा वेश’ या प्रमाणे स्वत:चे अंतरंग बदलले तरी स्वाद तोच ठेवला. ‘सा मो सा’तील कथाही तशाच आहेत. ‘सा मो सा’ हे शीर्शक त्या दृष्टिने अत्यंत अ
न्वर्थक आहे!


