Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

पुणे, दि. 7: सन 2025-26 मधील रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभाग नोंदणीसाठी https://www.pmfby.gov.in हे राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरु करण्यात आले आहे. ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर, गहू, हरभरा व कांदा पिकासाठी 15 डिसेंबर व उन्हाळी भुईमूगासाठी 31 मार्च 2026 पर्यंतच्या मुदतीत पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

 

नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून विभागातील पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी- फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार आदी कागदपत्रे आवश्यक असून ई-पीक पाहणी असणे बंधनकारक आहे.

 

विमा अर्ज भरण्यासाठी सीएससी विभागास केंद्र शासनाने निर्धारित केलेले प्रति शेतकरी 40 रुपये मानधन संबंधित विमा कंपनीमार्फत दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या विमा हप्त्याव्यतिरिक्त इतर शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही. एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करुन विमा योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना पुढील पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.

 

जिल्हा व पीक निहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता (कंसात) पुढीलप्रमाणे. अहिल्यानगर जिल्हा- गहू (बागायत)- विमा संरक्षित रक्कम 45 हजार रूपये (विमा हप्ता 450 रुपये), रब्बी ज्वारी बागायत व जिरायत, हरभरा- 36 हजार रुपये (360 रुपये), पुणे जिल्हा- गहू (बागायत)- 45 हजार रूपये (225 रुपये), रब्बी ज्वारी बागायत व जिरायत- 36 हजार रुपये (180 रुपये), हरभरा- 36 हजार रुपये (90 रुपये) याप्रमाणे विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता राहील.

 

सोलापूर जिल्हा- गहू (बागायत)- विमा संरक्षित रक्कम 38 हजार रूपये (विमा हप्ता 380 रुपये), रब्बी ज्वारी बागायत – 36 हजार रुपये (360 रुपये), रब्बी ज्वारी जिरायत- 30 हजार रुपये (300 रुपये), हरभरा- 32 हजार 675 रुपये (326 रुपये 75 पैसे) याप्रमाणे राहील.

 

रब्बी कांद्यासाठी तिन्ही जिल्ह्यांसाठी विमा संरक्षित रक्कम 90 हजार रुपये तर विमा हप्ता अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यासाठी 900 रुपये आणि सोलापूर जिल्ह्यासाठी 450 रुपये राहील. उन्हाळी भुईमूगासाठी तिन्ही जिल्ह्यांसाठी विमा संरक्षित रक्कम 40 हजार 600 व विमा हप्ता 101 रुपये 50 पैसे विमा हप्ता राहील.

 

अधिक माहितीसाठी 14447 या हेल्पलाईन क्रमांकावर अथवा भारतीय कृषी विमा कंपनी, स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा https://krishi.maharashtra.gov.in या संकेस्थळाला भेट द्यावी. शेतकऱ्यांनी विहित मुदतीमध्ये योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. गावसाने यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments