Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedजनरल प्रॅक्टिशनर्स हे भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा खरा पाया भारतीय सेना...

जनरल प्रॅक्टिशनर्स हे भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा खरा पाया भारतीय सेना वैद्यकीय सेवा माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल डॉ. ए. के. दास : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे ‘मेगा जीपीकॉन २०२५’ परिषद

पुणे : जनरल प्रॅक्टिशनर्स आपल्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी स्वतःला प्रगत आणि व्यावसायिक कौशल्यांचा विस्तार करुन भविष्यासाठी तयार ठेवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग च्या आकडेवारीनुसार सध्या आपल्याकडे १३.५ लाख अलोपॅथिक डॉक्टर आणि ७.५ लाख आयुष डॉक्टर नोंदणीकृत आहेत. दोन्ही मिळून आपल्याकडे प्रत्येक ८१० लोकांमागे एक डॉक्टर आहे, जो डब्ल्यूएचओ च्या मानकांपेक्षा अधिक चांगला आहे. हे फक्त जनरल प्रॅक्टिशनर्सच्या योगदानामुळेच शक्य झाले आहे. जनरल प्रॅक्टिशनर्स हे भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा खरा पाया आहेत, असे मत भारतीय सेना वैद्यकीय सेवा माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल डॉ. ए. के. दास यांनी व्यक्त केले.

 

 

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे यांच्या वतीने आयोजित ३५वे वार्षिक वैद्यकीय अधिवेशन – मेगा जीपीकॉन २०२५ हे अधिवेशन अण्णाभाऊ साठे सभागृह येथे पार पडले. दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेला राज्यभरातील तसेच देशभरातील शेकडो डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि संशोधकांचा मोठा प्रतिसाद लाभला. डॉ. ए. के. दास यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला. मोहनभाई पालेशा आणि रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन व विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. आयोजनाध्यक्ष डॉ. सुनील भुजबळ, सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता, आयोजन सचिव डॉ. राजेश दोशी आणि सह-अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब काकडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

 

डॉ. ए. के. दास म्हणाले, आपण एक मोठा देश आहोत आणि आपली लोकसंख्या प्रचंड आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत, विशेषतः दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचणे, हे एक अत्यंत कठीण कार्य आहे. सध्या सुमारे ७०% प्राथमिक आरोग्यसेवा सरकारी संस्थांकडून आणि फक्त ३०% सेवा खाजगी क्षेत्राकडून मिळते. पण तज्ज्ञ सेवा ७०% खाजगी रुग्णालयांकडून दिली जाते आणि फक्त ३०% सरकारी रुग्णालये व संस्थांकडून मिळते. मात्र, आरोग्य कव्हरेज अजूनही अपूर्ण आहे. सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू करून विमा कव्हर वाढवण्याचा आणि अधिक लोकांना आरोग्य सेवेच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीही आपण आजही देशभरात सुमारे ५ लाख डॉक्टरांच्या तुटवड्याला सामोरं जात आहोत आणि हा आकडा खूप मोठा आहे. सरकारने यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत तरीदेखील मानवी संसाधनांचा तुटवडा आहे.

 

डाॅ. सुनील भुजबळ म्हणाले, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या मेगा जीपीकॉनमध्ये यंदाची संकल्पना ‘प्रतिबंध, संरक्षण आणि प्रोत्साहन निरोगी भविष्यासाठी’ अशी होती. ‘प्रतिबंध उपचारापेक्षा श्रेष्ठ’ हे केवळ एक वाक्य नाही, तर आपल्या वैद्यकीय व्यवसायाची नाडी आहे. आजचा डॉक्टर फक्त उपचार करणारा नसून समाजाचा आरोग्यदायी मार्गदर्शक आहे जो तंत्रज्ञान, संशोधन आणि नैतिकता यांचा सुसंवाद राखत समाजाचे आरोग्य जपतो. डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेश दोषी यांनी आभार मानले. मोहनभाई पालेशा आणि डॉ. सायमन ग्रँट यांनी मनोगत व्यक्त केले.

 

*परिषदेत डॉ. नस्ली इचापोरिया, डॉ. समीर सोनार, डॉ. पियुष लोढा, डॉ. अनुज दरक, डॉ. हसमुख गुजर, डॉ. हिमानी तापस्वी, डॉ. सुश्रुत सेव्हे, आणि डॉ. संजय राऊत यांनी आपापल्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्रात डॉ. उर्मी सेठ यांनी ‘हिमॅटोलॉजी’ विषयावर व्याख्यान देत परिषदेला सुरुवात केली. यानंतर डॉ. नीरज अडकर, डॉ. यशवंत माने, डॉ. रितेश भल्ला, डॉ. मनोज श्रीवास्तव, डॉ. सुनील जावळे, डॉ. ऋषिकेश बडवे, डॉ. निखिल ऋषिकेशी, आणि डॉ. विशाल सेठ यांनी विविध क्लिनिकल विषयांवरील प्रात्यक्षिक व संशोधनपर सत्रांद्वारे उपस्थित डॉक्टरांना नव्या दृष्टीकोनांची ओळख करून दिली.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments