Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत...

पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत मोनॅकोच्या व्हॅलेंटिन व्हॅचेरोट याला विजेतेपद

पुणे, 25 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मोनॅकोच्या व्हॅलेंटिन व्हॅचेरोट याने विजेतेपद संपादन केले.

म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अतितटीच्या अंतिम फेरीत मोनॅकोच्या चौथ्या मानांकित व्हॅलेंटिन व्हॅचेरोट याने ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या मानांकित ॲडम वॉल्टन याचा 3-6, 7-6(5), 7-6(5) असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना 2 तास 38मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये व्हॅलेंटिनने पहिल्याच गेममध्ये ॲडमची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत आघडी घेतली. पण हि आघाडी व्हॅलेंटिनला फार काळ टिकवता आली नाही.ॲडम याने नेट जवळून जोरदार खेळ करत व्हॅलेंटिनची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर ॲडमने वर्चस्व कायम राखत व्हॅलेंटिनची आठव्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3असा जिंकून आघाडी मिळवली.

दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या व्हॅलेंटिनने बिनतोड सर्व्हिस व आक्रमक खेळाच्या जोरावर ॲडम दुसऱ्या गेममध्ये सर्व्हिस भेदली. पण,ॲडम याने पुन्हा तोडीस तोड खेळ करत सातव्या गेममध्ये व्हॅलेंटिनची सर्व्हिस ब्रेक केली व बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी बाराव्या गेमपर्यंत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये व्हॅलेंटिनने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत हा सेट 7-6(5)असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमधे 2-2 अशी बरोबरी असताना व्हॅलेंटिनने ॲडमची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली. त्यानंतर ॲडमने व्हॅलेंटिनची आठव्या गेममध्ये सर्व्हिस भेदून बरोबरी साधली. बाराव्या गेमपर्यंत बरोबरी कायम राहिल्याने सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये व्हॅलेंटिनने वर्चस्व राखत हा सेट 7-6(5) असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

व्हॅलेंटिनचे हे या वर्षातील एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील चौथे विजेतेपद आहे. याआधी त्याने २० लढतींमध्ये १९ सामन्यात विजय मिळवला असून जागतिक क्रमवारीत अव्वल १५० खेळाडूंमध्ये त्याने पहिल्यांदा प्रवेश केला आहे.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक, 100एटीपी गुण व 18230डॉलर, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व 50एटीपी गुण, 10730डॉलर अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल(आयएएस), केएसएलटीएचे मानद सचिव व नम्मा मेट्रो बंगळुरूचे प्रमुख महेश्वर राव(आयएएस), राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य सचिव संजय खंदारे, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर(आयएएस), एमएसएलटीएचे चेअरमन प्रशांत सुतार आणि स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एटीपी सुपरवायझर रोजेरिओ सँटोस आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.

निकाल: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: एकेरी:
व्हॅलेंटिन व्हॅचेरोट( मोनॅको) [4] वि.वि.ॲडम वॉल्टन(ऑस्ट्रेलिया) [3] 3-6, 7-6(5), 7-6(5)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments