“इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे ” असे म्हटले गेले आहे. असे हे
“वाघिणीचे दूध ” पिऊन,पचवून मराठी माणुस जग जिंकायला निघाला आहे.!
याचे एक उदाहरण म्हणजे, उद्या पुणे येथे सादर करण्यात येणारे “फिनिक्स” हे इंग्रजी नाटक होय.
या नाटकाच्या लेखिका दिवंगत अरुणा ठोसर दीक्षित या आहेत. तर नाटकाची निर्मिती जेष्ठ चित्रपट लेखक, दिग्दर्शक
श्री प्रदीप दीक्षित यांनी केली असून दिग्दर्शन श्री मोहन माडगूळकर यांनी केले आहे. या नाटकात भूमिका करणारे सर्व कलाकार देखील मराठी आहेत. नाटकाचा सर्व तपशील पुढील जाहिरातीत दिला असल्याने, त्याची पुनरुक्ती इथे करणे बरोबर ठरणार नाही.
विशेष म्हणजे, या नाटकाची दुसरी आवृत्ती न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स ने
प्रकाशित केली असून, ती प्रयोग स्थळी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“नाटकाचा आशय”
विवाहानंतर काही वर्षांनी, जर जोडीदारांपैकी एकाच्या वागणुकीत लक्षणीय बदल झाला, तर ते दोघे एकमेकांना अनुरूप राहात नाहीत. ते एकमेकांपासून मनाने दूर जातात आणि मनाच्या त्या अवस्थेशी जुळणारा नवा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करतात.
कारण त्यांच्या व्यक्तिमत्वातच असते- अशोक हा अत्यंत महत्वाकांक्षी, आत्मविश्वास असलेला, चतुर, कष्टाळू आणि त्याचबरोबर निष्ठुर, हुकूमशाही वृत्तीचा व आपल्या महत्त्वाकांक्षेला प्रत्यक्षात आणण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करणारा आहे. तर, नीलिमा ही तशी शामळू, कमकुवत मनाची आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावरच यांचे लग्न झालेले आहे.
अशोक नीलिमाला घटस्फोट मागतो आणि त्यावर नीलिमाची प्रतिक्रिया, प्रतिसाद आणि अखेर तिने घेतलेला निर्णय अशा दिवसभरात घडलेल्या घडामोडी या नाटकात दाखवण्यात आलेल्या आहेत.
पुणेकर रसिक या नाटकाला भरभरून प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे.
_ देवेंद्र भुजबळ
9869484800.


