Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedतन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२५ तामिळनाडूचे दुष्यंत गुणशेखर यांना प्रदान तामिळनाडूतील शाळांमध्ये...

तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२५ तामिळनाडूचे दुष्यंत गुणशेखर यांना प्रदान तामिळनाडूतील शाळांमध्ये थिएटरला शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग बनविणाऱ्या अवलियाचा सन्मान

पुणे, दि. १६ नोव्हेंबर, २०२५ : भारतीय शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्यासाठी आपण तामिळनाडू या राज्याला ओळखतो, मात्र याच तामिळनाडूमध्ये शालेय अभ्यासक्रमात थिएटर या विषयाचा समावेश करण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या दुष्यंत गुणशेखर या अवलियाचा आज तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२५ प्रदान करीत पुण्यात सन्मान करण्यात आला.

 

पुण्यातील रुपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार सोहळा २०२५ प्रदान कार्यक्रमात समकालीन भारतीय रंगभूमीचे प्रसिद्ध दिग्दर्शक, शिक्षक आणि अभ्यासक, आधुनिक भारतीय नाट्य क्षेत्रातील डिजिटल थिएटरचे अग्रणी म्हणून ओळखले जाणाऱ्या डॉ. अभिलाष पिल्लई यांच्या हस्ते दुष्यंत गुणशेखर यांचा यावर्षीचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार देत गौरव करण्यात आला.

 

टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील श्रीराम लागू रंग अवकाश येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, रुपवेध प्रतिष्ठानचे आनंद लागू, महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष एस. पी. कुलकर्णी, यावर्षीचा तन्वीर नाट्य धर्मी पुरस्कार विजेते दुष्यंत गुणशेखर, महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे प्रसाद वनारसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 

तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराचे हे १८ वे वर्ष असून थिएटर अर्थात रंगभूमी या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या तरुण पिढीतील कलाकारांना दरवर्षी सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मानचिन्ह आणि ७५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

 

आपल्या ‘क्रिया शक्ती’ या नाट्यसमूहाच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर भाष्य करणारी नाटके रंगमंचावर आणणाऱ्या, रंगभूमी कलाकारांना शाश्वत उत्पन्न व सुरक्षितता प्रदान करण्यासाठी केली १३ वर्षांपासून प्रयत्नशील असणाऱ्या आणि तमिळनाडूमध्ये रंगभूमीशी संबंधित अभ्यासक्रम विकसित करून खाजगी व सार्वजनिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये रंगभूमीविषयी आस्था निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेल्या दुष्यंत गुणशेखर यांना यंदाचा हा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२५ प्रदान केल्या गेला.

 

पुणे हे माझे दुसरे घर आहे. इथे आल्यानंतर मला घरी आल्यासारखे वाटते. मराठी प्रायोगिक रंगभूमीची अनेक मोहक रूपे आणि कलाकार यांना श्रीराम लागू रंग अवकाश या जागेने खूप जवळून पाहिले आहे, त्यामुळे या ठिकाणी येणे आणि तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराने गौरवान्वित होणे हा मी स्वत:चा गौरव समजतो असे सांगत दुष्यंत गुणशेखर म्हणाले, “क्रिया शक्ती या संस्थेच्या माध्यमातून क्रिया प्ले हा आमचा उपक्रम संस्थेच्या कामांचा एक महत्त्वाचा गाभा आहे असे आम्ही मानतो. याद्वारे आम्ही शालेय विद्यार्थ्यांपर्यंत प्रायोगिक रंगभूमी घेऊन जात आहोत. प्रत्येक मुलाला त्याचा आवाज शोधण्याचा अधिकार असून रंगभूमी हा माझ्यासाठी एक लोकशाही कलाप्रकार आहे.”

 

मुले मोठी झाल्यावर ती वेगवेगळ्या क्षेत्रात जाता ते रंगभूमीच्या या ओळखीमुळे अनेक गोष्टी शिकतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येतो, योग्य दिशेने विचार करण्याची त्यांची क्षमता विकसित होते, ते एकत्रितपणे काम करू शकतात आणि खऱ्या अर्थाने ‘वर्क स्पेसेस’ ला ‘ह्युमन स्पेसेस’ बनविण्याचा प्रयत्न करू शकतात. हे सर्व लक्षात घेत शालेय शिक्षणात थिएटरचा समावेश हा महत्त्वपूर्ण ठरतो असे मत गुणशेखर यांनी व्यक्त केले.

 

आज क्रिया प्ले अंतर्गत आम्ही इंग्रजी व तमिळ भाषेतील नाटके रंगमंचावर आणत असून सरकारी व खाजगी अशा दोन्ही शाळांमध्ये थिएटर संबंधित शैक्षणिक अभ्यासक्रम राबवीत आहोत अशी माहिती गुणशेखर यांनी दिली. आज क्रिया शक्ती संस्थेच्या वतीने ९० हून अधिक नाटके रंगभूमीवर आली असून त्यांचे १७०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. या प्रयोगांद्वारे आज ८०० कलाकारांना रोजगार तर ५० कलाकारांना दरमहा मानधन मिळत असून १४० हून अधिक शाळांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम देखील सुरु आहे. या अभ्यासक्रमाचा लाभ १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आहे अशी माहिती देखील गुणशेखर यांनी दिली.

 

आपल्या देशात मराठी, बंगाली, गुजराथी अशा प्रादेशिक रंगभूमी या त्या त्या भागापुरते रिजनल सेंट्रिक काम करत आहेत असे जाणवते. या उलट या सर्व रंगभूमींनी राष्ट्रीय पातळीवर एकत्रितपणे काम करायला हवे असे मला वाटते. प्रादेशिक रंगभूमीच्या भिंती तोडून त्यामध्ये आज पूल बांधायला हवे आहेत, एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा या रंगभूमींनी एकत्रित काम करायला हवे जेणे करून भारतीय रंगभूमीचे भविष्य उज्ज्वल होईल असा आशावाद गुणशेखर यांनी व्यक्त केला.

 

रंगभूमीशी संबंधित काम करीत असताना आज फक्त कलाकार नाही तर प्रेक्षक बनविणे हे देखील महत्त्वाचे आहे याची जाण असल्याने प्रायोगिक रंगभूमीची परंपरा तेवत ठेवण्यासाठी आज स्टेज ही संकल्पना पुन्हा एकदा परिभाषित अर्थात रिडिफाईन करण्याची गरज देखील गुणशेखर यांनी अधोरेखित केली.

 

डॉ. पिल्लई यांनी ‘रिइमॅजिन दी रिंग: दी इंडीयन सर्कस बिटवीन ट्रॅडिशन, थिएटर अँड दी फ्युचर’ या विषयावर आपले विचार मांडले. १८८० च्या दशकात महाराष्ट्रातील विष्णूपंत छत्रे यांनी भारतीय सर्कस सुरु करीत त्याचा पाया रोवला. यानंतर केरळमध्ये काही काळ तिचा प्रचार प्रसार झाला मात्र, २००० च्या दशकात वेगवेगळ्या कारणांमुळे भारतीय सर्कस लयाला गेली. भारतीय सर्कस पुनरुज्जीत करण्यासाठी भारतीय सर्कस कलाकार आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी यांनी एकत्रितपणे पुन्हा एक हायब्रीड प्रयोग रचला असून एकमेकांची कौशल्ये शिकत, प्रयोगांमध्ये नेपथ्य, साउंड, लाईट्स यांचा सफाईदार वापर करीत पुन्हा एकदा भारतीय सर्कस प्रेक्षकांसमोर आणण्याच्या प्रयत्नाविषयी डॉ. पिल्लई यांनी उपस्थितांना माहिती दिली. याअंतर्गत एनएसडी आणि ग्रँड सर्कस यांनी आपल्या एनओव्हीए अर्थात नेटवर्क ऑफ व्हिज्युअल आर्ट्सअकादमी यांच्या माध्यमातून पंचतंत्र, मेघदूत, समुद्रमंथन असे अनेक प्रयोग केले असल्याचेही डॉ. पिल्लई यांनी नमूद केले.

 

डॉ श्रीराम लागू गेल्यानंतर तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार सातत्याने चालू ठेवण्याचे काम लागू कुटुंबीयांनी केले याबद्दल त्यांचे आभार मानत डॉ. आगाशे यांनी या पुरस्कारामागील लागू कुटुंबियांची असलेली तळमळ व्यक्त केली. महाराष्ट्रातील प्रत्यके जिल्हा हा सांस्कृतिक दृष्ट्या विविधता असलेला जिल्हा असल्याचे सांगत डॉ. आगाशे पुढे म्हणाले, “आज पुण्यासारख्या शहरात प्रायोगिक रंगभूमीला चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्ये तरुण, युवा पिढी एक प्रेक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका निभावीत आहे. प्रायोगिक रंगभूमीवर काम करीत असताना आपल्या चरितार्थासाठी एक वेगळा पर्याय असायला हवा हे हळूहळू या क्षेत्रातील कलाकारांना समजत असून आजचे पुरस्कार्थी दुष्यंत गुणशेखर यांनी हाच विचार करीत तामिळनाडूमध्ये शाश्वत रंगभूमी निर्माण करण्याच्या दृष्टीने उचललेली पाऊल ही कौतुकास्पद आहेत. लहान मुलांपर्यंत योग्य वयात प्रायोगिक रंगभूमीची आवड निर्माण करण्याचे ते करीत असलेले काम म्हणूनच उल्लेखनीय आहे असे मला वाटते.”

 

आनंद लागू यांनी यावेळी तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. प्रसाद वनारसे यांनी दुष्यंत गुणशेखर यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. राजेश देशमुख

यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments