थीम कॅलेंडरद्वारे झाकिरजींची कृष्ण-धवल प्रकाशचित्रे व सोबतच प्रत्येक पानावर भारतातील नामांकित कलावंतानी त्यांच्या जागवलेल्या आठवणी येणार रसिकांच्या भेटीला
पुणे, दि. ५ डिसेंबर, २०२५ : उस्ताद झाकिरजींची कृष्ण-धवल प्रकाशचित्रे व सोबतच प्रत्येक पानावर भारतातील नामांकित कलावंतानी त्यांच्या जागवलेल्या आठवणी एका थीम कॅलेंडरद्वारे रसिकांच्या भेटीला येत आहेत. ‘ताल फरिश्ता’ असे या थीम कॅलेंडरचे नाव असून पुण्यातील औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी त्याची निर्मिती केली आहे. या संबंधीची माहिती पाकणीकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
थीम कॅलेंडर विषयी अधिक माहिती देताना पाकणीकर म्हणाले, “पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसैन हे नाव उच्चारताच आपल्या नजरेसमोर जी छबी येते त्याने सर्व शरीरभर चैतन्याच्या, आनंदाच्या लहरी उमटू लागतात. सहा दशकांपेक्षाही जास्त काळ आपल्या जादूई बोटातून उमटणाऱ्या स्वर-ताल-मात्रांच्या आवर्तनातून या महान कलावंताने सर्व श्रोत्यांची हृदये काबीज केली. तबला वादनातील जी सारी घराणी आहेत त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन ‘तबला’ या वाद्याला कलाकार, मर्मज्ञ व सामान्य श्रोते यांच्या हृदयात अढळ स्थान मिळवून देणाऱ्या असामान्य कलाकाराची आठवण म्हणजे हे थीम कॅलेंडर.”
१५ डिसेंबर २०२४ या दिवशी झाकिरभाईंनी अचानक इहलोक यात्रा संपवली. येत्या ९ मार्च या दिवशी झाकिरभाईंनी आपल्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असती. ‘ताल फरिश्ता’ या थीम कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांची स्मृती जपताना १९८५ ते २०१९ या कालावधीत मी टिपलेली त्यांची बारा कृष्ण-धवल प्रकाशचित्रे व सोबतच प्रत्येक पानावर भारतातील नामांकित कलावंतानी त्यांच्या जागवलेल्या आठवणी यांचा हा गुलदस्ता या थीम कॅलेंडर द्वारे रसिकांसमोर घेऊन येत आहे, असेही पाकणीकर म्हणाले.
२०२६ या वर्षासाठीची ही सुंदर दिनदर्शिका असून यामध्ये आधी नमूद केल्याप्रमाणे झाकिर भाईंची बारा कृष्ण-धवल प्रकाशचित्रे आहेत याशिवाय पं. हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान, पं. सुरेश तळवलकर, पं. कुमार बोस, पं. अनिंदो चटर्जी, पं. उल्हास कशाळकर, उ. शाहिद परवेझ, पं. विजय घाटे, उ. अक्रम खान व पं. योगेश समसी या कलावंतांनी आत्मीयतेने पाठविलेल्या आठवणीही आहेत. विशेष म्हणजे या आठवणी वाचण्यासोबतच प्रत्येक पानावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून कलाकारांचे हे व्हिडीओ देखील रसिकांना पाहता येणार आहेत, अशी माहिती पाकणीकर यांनी दिली. ‘अनुनाद’ या संस्थेने थीम कॅलेंडरची सुबक मांडणी केलेली असून, युनिक ऑफसेट यांनी आर्ट पेपरवर त्याची उत्तम रंगीत छपाई व वायर-ओ-वायरची बांधणी केली आहे.
सदर थीम कॅलेंडरचे प्रकाशन मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल या ठिकाणी सुरु होणाऱ्या ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (१० डिसेंबर रोजी) ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. उल्हास कशाळकर व तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर यांच्या हस्ते आणि आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती, सतीश पाकणीकर यां
नी दिली.


