सुलभ शिक्षण मंडळ पुणे आणि श्री गोपाळ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने बहुश्रुत व्याख्यानमालेचे आयोजन
पुणे : स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अजिंक्ययोद्धा बाजीराव पेशवे यांच्यासारख्या महापुरुषांचा पराक्रम आपल्याला जाणूनबुजून सांगितला गेला नाही. उलट पराभूत झालेल्यांचा इतिहास शिकवला गेला. बाजीरावांचा पराक्रम मस्तानीशी नाते जोडल्यामुळे कमी लेखण्याचा प्रयत्न झाला. पण खरे पाहता, त्यांनी केलेला पराक्रम अतुलनीय होता. भविष्यात देशाने मोठी झेप घ्यायची असेल, तर इतिहास योग्य रीतीने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत व्याख्याते जगन्नाथ लडकत यांनी व्यक्त केले.
सुलभ शिक्षण मंडळ पुणे आणि श्री गोपाळ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने बहुश्रुत व्याख्यानमालेचे आयोजन सदाशिव पेठेतील श्री गोपाळ हायस्कूल येथे करण्यात आले होते. यावेळी जगन्नाथ लडकत यांचे अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई या विषयावर व्याख्यान झाले. संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. उमा बोडस यावेळी उपस्थित होत्या.
जगन्नाथ लडकत म्हणाले, इंग्रज इतिहासकारांचेही याबाबत आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी बाजीरावांच्या पराक्रमाचे योग्य मूल्यमापन केले आहे. जर मराठी माणसानेच हा इतिहास सविस्तर लिहून ठेवला असता, तर आज मोठा संघर्ष उभा राहिला असता. इंग्रजांनी बाजीरावांचे वर्णन करताना त्यांना “घोडदळाचा ईश्वर, ईश्वरी देणगी लाभलेला सेनानी, देवयोद्धा” असे गौरवोद्गार काढले आहेत.
—


