· या उपक्रमामुळे देशातील एलजीबीटीक्यू आणि संबंधित समुदायाच्या तांत्रिक कौशल्यांना आता केवळ गुणवत्तेच्या आधारावर समान संधी उपलब्ध होणार आहे.
· सर्वसमावेशक कार्यसंघ आणि पूर्वग्रहरहित नाविन्यपूर्णतेच्या जोरावर एआय आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान विकासावर भर दिला जाईल.
मुंबई, ९ फेब्रुवारी २०२६: गोदरेज इंडस्ट्रीज समूहाची वित्तीय सेवा असलेल्या गोदरेज कॅपिटनकडून प्राइड इन टेक या विशेष तंत्रज्ञान हॅकाथॉनचे आयोजन करण्यात आले होते. हे हॅकाथॉन खासकरुन एलजीबीटीक्यू आणि संबंधित समूहाकरिता आयोजित करण्यात येते. सर्वसमावेशक कॅम्पस भरती प्रक्रियेला बळकटी देणे आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिभावार उमेदवारांची फळी तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उददेश आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या अनेक क्वीअर व्यावसायिकांना समान रोजगाराच्या संधी मिळवताना अनेक संचरनात्मक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना फारशा संधीही दिल्या जात नाहीत. ही सत्य परिस्थिती लक्षात घेता अशा अडचणी दूर करणे, कौशल्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन देणे आणि एलजीबीटीक्यू समुदायातील तरुण तंत्रज्ञानांना मुख्य प्रवाहातील संधींशी जोडणे, या हेतूखातर हा उपक्रम राबवला जात असल्याचे गोदरेज कॅपिटलच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
एलजीबीटीक्यू आणि संबंधित समुदायांना तांत्रिक क्षेत्रात घडवण्यासाठी सुरक्षित, गुणवत्तेवर आधारित आणि सर्वसमावेशक व्यासपीठ निर्माण करणे हे, या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमाद्वारे तंत्रज्ञानांना केवळ त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि गुणवत्तेवर पारखण्याची संधी मिळते. हॅकाथॉनमध्ये प्रत्यक्ष समस्या सोडवण्याच्या स्वरुपाचा वापर केला जात असल्याने भरती प्रक्रियेत होणारे पारंपरिक भेदभाव दूर सारता येतात. सर्व स्तरावर सहभागी उमेदवारांचे निष्पक्ष मूल्यमापन करता येते. या उपक्रमामुळे गोदरेज कॅपिटलची विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता यांप्रती असलेली दीर्घकालीन वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, कंपनीच्या सर्व स्तरांवर एक समावेशक कार्यसंस्कृती निर्माण करण्याच्य त्यांच्या ध्येयाला यामुळे अधिक बळकटी मिळाली आहे.
गोदरेज कॅपिटल आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा विस्तार करत असताना कर्ज वाटप, जोखीम व्यवस्थापन तसेच ग्राहक अनुभवामध्ये अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आहे. या प्रक्रियेत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान हे केवळ तांत्रिक नसून, ते विविध पार्श्वभूमी असलेल्या सर्वसमावेशक टीमद्वारे विकसित व्हायला हवे, असे कंपनीचे ठाम मत आहे. सर्वसमावेशक कार्यबलामुळे पूर्वग्रहविरहित नवकल्पना शक्य होते. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, उत्पादने आणि डिजिटल प्लॅटफॉर्म जबाबदारीने विकसित होतात. अशा प्रणाली विविध वापरकर्त्यांच्या गरजा प्रतिबिंबित करतात, सर्वांसाठी उपयुक्त ठरतात. या पद्धती संस्थेला योग्य प्रकारे विकसित करतात. अधिक सक्षम, सुरक्षित व टिकाऊ स्वरुपात विस्तार करण्यास मदत करतात.
या हॅकाथॉनला देशभरातील एलजीबीटीक्यू आणि संबंधित समुदायांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण १ हजार २०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले. सर्व अर्जदारांनी हॅकाथॉनच्या स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन तांत्रिक चाचणीत सहभाग घेतला. या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणा-या उमेदवारांची समस्या सोडवण्याची क्षमता, कोडिंगमधील सखोलता तसेच प्रत्यक्ष उपयोगातील विचारशक्ती या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. या सर्व टप्प्यांवर निवड झालेल्या चार उमेदवारांना गोदरेज कॅपिटलमध्ये नोकरीची ऑफर देण्यात आली. यासोबतच हॅकाथॉनमधील विजेत्या उमेदवारांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विक्रोळी येथील गोदरेज वन या ठिकाणी प्राइड इन टेक या हॅकाथॉनचे आयोजन करण्यात आले होते. गोदरेज कॅपिटलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ज्योतिर्लता बी. यांच्या उद्घाटनपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्योतिर्लता बी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात समावेशकतेचे महत्त्व आणि प्रतिभेला समान संधी देण्याबाबत कंपनीची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाची सांगता गोदरेज कॅपिटलच्या मुख्य मनुष्यबळ अधिकारी भाव्या मिश्रा यांच्या समारोपात्मक भाषणाने झाली. यावेळी त्यांनी संस्थेमध्ये विविधता, समता आणि समावेशनाच्या मूल्यांना चालना देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
गोदरेज कॅपिटलच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ज्योतिर्लता बी. म्हणाल्या, ‘‘तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादने आणि डिजिटल व्यासपीठ हे विकसित करणा-या लोकांच्या विचारसरणीवर आणि अनुभवांवर आधारित असतात. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील भूमिकांसाठी सर्वसमावेशक संधी निर्माण केल्यास विविध दृष्टिकोन समोर येतात, संभाव्य त्रुटी कमी होतात आणि उपोययोजना अधिक प्रभावीपणे विकसित व विस्तारित करता येतात. कंपनीकडून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना तंत्रज्ञान टीममध्ये विविधता असणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रक्रियमुळे न्याय्य, सशक्त आणि भविष्यासाठी सज्ज प्रणाली तयार करता येतात. प्राइड इन टेक हा उपक्रम उमेदवारांची ओळख आणि पार्श्वभूमी न पाहता प्रत्यक्ष कामाशी संबंधित समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या आधारे प्रतिभेचे मूल्यमापन करतो. हाच गोदरेज कॅपिटलचा विश्वास आहे.’’
गोदरेज कॅपिटलच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी भाव्या मिश्रा म्हणाल्या, ‘‘ही सर्वसमावेशक भरती केवळ चांगल्या उद्देशांपूरती मर्यादित नसून, त्यासाठी योग्य रचना, विचारपूर्वक आखलेली प्रक्रिया आणि सातत्यूपर्ण बांधिलकी गरजेची ठरते. प्राइड इन टेक हा उपक्रम आमच्या या प्रयत्नांचा भाग असून, या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रतिभेचे निष्पक्ष मूल्यमापन करणारी भरती प्रक्रिया उभारत आहोत. एलजीबीटीक्यू आणि संबंधित समुदायातील व्यक्तींना अर्थपूर्ण भूमिका तसेच दीर्घकालीन करिअर संधी उपलब्ध होतात. समावेशक कार्यसंस्कृतीमुळे नवोन्मेषालाही चालना मिळते कारण विविध पार्श्वभूमीतील लोकांचा सहभाग असलेली टीम पारंपरिक समजुतींना प्रश्न विचारु शकते आणि निर्णय प्रक्रियेत असलेले प्रणालीलगत पूर्वग्रह कमी करण्यास अधिक सक्षम ठरते. ’’
प्राइड इन टेक हा उपक्रम गोदरेज कॅपिटलच्या व्यापक समावेशन चौकटीचा महत्त्वाचा भाग आहे. हा उपक्रम संस्थेच समावेशक संस्कृती निर्माण करण्यासाठी राबवण्यात येणा-या विविध उपक्रमांशी जोडलेला आहे. या चौकटीअंतर्गत क्यूनिटी हा एलजीबीटीक्यू आणि संबंधित समर्पित कर्मचारी संसाधन गट, प्राइड कॅपिटल आणि प्राइड पाथ असे विविध विभागांतील एलजीबीटीक्यू आणि उमेदवारांच्या भरतीवर लक्ष केंद्रित करणारे विशेष उपक्रम यांसह इनक्लुशन ३.० हा समावेशक कार्यसंस्कृती वाढवण्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रम तसेच बीयू इंटर्नशिप इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे. हे सर्व उपक्रम एकत्रितपणे संस्थेमध्ये जागरुकता निर्माण कऱणे, समावेशक भरती प्रक्रिया राबवणे, करिअरमध्ये प्रगतीसाठी संधी उपलब्ध करुन देणे आणि सहकार्य व पाठिंब मजबूत करणे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या उपक्रमांमुळे संपूर्ण संस्थेमध्ये समता, समावेशनाची संस्कृती अधिक भक्कम करण्यास हातभार लावत आहेत.
कामाचे ठिकाण सुरक्षित आणि सर्वसमावेशक असावे याकरिता गोदरेज कॅपिटलने विविध धोरणांची अंमलबजावणी केली आहे. यामध्ये सर्व कार्यालयांमध्ये लिंगभेद न करणारी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देणे, लिंग ओळखीशी संबंधित वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक सहाय्य देणे तसेच नेतृत्वाच्या भूमिका आणि करिअरमधील प्रगतीच्या संधी सर्व कर्मचा-यांना समान आणि न्याय पद्धतीने उपलब्ध करुन देणे आदी घटकांचा समावेश आहे. या धोरणांमुळे प्रत्येक कर्मचा-याला आपली ओळख जपून सुरक्षित वातावरणात आणि समान संधींच्या आधारावर काम करता यावे, असा गोदरेज कॅपिटलचा ठाम प्रयत्न यातून अधोरेखित होतो.
प्राइड इन टेक हा गोदरेज कॅपिटलचा एक प्रमुख आणि पाथदर्शक उपक्रम म्हणून ओळखला जातो. या उपक्रमात येत्या काळात अधिकाधिक सहभाग वाढवणे, तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योगांवर त्याचा प्रभाव अधिक व्यापक करणे आणि विविध पार्श्वभूमी असलेल्या प्रतिभावान तज्ज्ञांची मजबूक आणि समावेशक साखळी उभारणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कंपनी दीर्घकालीन दृष्टीकोनातून विविधता, समावेशन आणि संधींची समानता जोपासत तंत्रज्ञान क्षेत्रात सक्षम व संतुलित कार्यबल घडवण्यावर भर देत राहील.


