Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedबारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुलास मंत्रिमंडळाची मंजुरी* *दिवंगत उपमुख्यमंत्री...

बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुलास मंत्रिमंडळाची मंजुरी* *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार*

 

 

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारुन पहिल्याच दिवशी अजितदादांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकले पहिले दमदार पाऊल*

 

मुंबई, दि. १० :- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे बारामती तालुक्यातील कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुल (टप्पा-३) अंतर्गत अतिरिक्त इमारत बांधकामे व विविध आधुनिक क्रीडा सुविधा उभारणीसाठी ७५.१३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंत्रिमंडळाने आज कार्योत्तर मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मार्गी लावून घेत आदरणीय अजितदादांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.

 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राप्त झालेल्या बारामती तालुक्यातील कटफळ येथील ८० हजार चौ.मी. क्षेत्रावर हे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारले जाणार असून, यामुळे पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंक, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान यासह विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. राज्याच्या क्रीडा धोरणानुसार जिल्हा पातळीवर क्रीडा संकुल उभारणीचा संकल्प दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पुढे नेला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बारामती येथे टप्पा-१ व टप्पा-२ अंतर्गत क्रीडा सुविधा उभारल्या गेल्या असून, आता टप्पा-३ मुळे या संकुलाचा विस्तार अधिक व्यापक स्वरूपात होणार आहे.

 

उच्चस्तरीय सचिव समितीने प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर मंत्रिमंडळाच्या मंजुरीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, आधुनिक वास्तुशास्त्रीय मानकांनुसार संकुलाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण व शहरी भागातील युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार असून, क्रीडा क्षेत्रात बारामती तालुका राज्यात नवे आदर्श प्रस्थापित करेल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वप्नातील क्रीडा संकुल प्रत्यक्षात साकार होत असून, त्यांच्या दूरदृष्टीला हीच खरी आदरांजली ठरणार आहे.

*****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments