Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorized'इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६' चे १५ ते १७ मे दरम्यान...

‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

 

 

*पुणे शहर कृषी-तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने सज्ज*

 

*विजेत्यास २५ लाख रुपये ; उपविजेत्यास १५ लाख रुपये बक्षीस*

 

पुणे, दि. ११: पुणे शहर आणि परिसराची कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानातील आघाडी लक्षात घेऊन, शहराला नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासाचे ‘हब’ बनवण्यासाठी ‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ या स्पर्धेचे कृषी महाविद्यालय, पुणे येथे १५, १६ आणि १७ मे २०२६ या कालावधीत भव्यस्वरुपात आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

 

*स्पर्धेचे वेळापत्रक :* यास्पर्धेत स्पर्धकांना सहभागी होण्याकरिता २३ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत ऑनलाईनपद्धतीने अर्ज स्वीकरण्यात येणार आहे. प्राप्त अर्जाची तज्ज्ञ समितीद्वारे छाननी करुन अंतिम फेरीतील स्पर्धकांची निवड ३० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. कृषी महाविद्यालय, पुणे येथे १५, १६ आणि १७ मे २०२६ येथे प्रत्यक्ष स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

*स्पर्धेचे मुख्य विषय:* स्पर्धकांना जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि जमिनीचा पोत राखण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, स्मार्ट जलव्यवस्थापन: पाण्याचा दर्जा, ऑटोमेशन आणि फर्टिगेशनमधील नवकल्पना, शेती यांत्रिकीकरण: शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटिक्सचा वापर, कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी: विपणन आणि निर्यातीसह प्रक्रिया तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा: शेतीमधील अक्षय ऊर्जेचा वापर आणि शेतीतील कचरा व्यवस्थापन, पीक संरक्षण: कीड आणि रोगांचे भाकीत व व्यवस्थापन, हवामान अनुकूल, डिजिटल आणि शाश्वत शेतीमधील बदल आणि शेतकऱ्यांनी स्वतः विकसित केलेली नाविन्यपूर्ण साधने किंवा तंत्रज्ञान या आठ महत्त्वाच्या विषयांवर आधारित आपले नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर करता येतील.

 

*विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे:* या स्पर्धेतील विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठी बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत. अंतिम फेरीतून निवडल्या जाणाऱ्या विजेत्यास २५ लाख रुपये तर उपविजेत्यास १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुणे हे कृषी आणि तंत्रज्ञानाचे संगम केंद्र असून, या हॅकाथॉनच्या माध्यमातून देशातील गुणवंत संशोधकांना आणि शेतकऱ्यांना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. अधिकृत संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम सुरु असून ते २३ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments