Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन*

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन*

 

 

पुणे, दि. १५ फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) – नवी मुंबई येथे आयोजित “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम नियोजनाबाबत पुणे विभागाचे

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विभागातील संबंधित विभागांचा सविस्तर आढावा घेतला.

 

नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी *“हिंद-दी-चादर” कार्यक्रम भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत असून या कार्यक्रमास पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असल्याने सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

 

बैठकीस पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, महानगरपालिका उपआयुक्त, जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, कार्यक्रमाची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्हास्तरावर समाज संघटनांशी प्रभावी समन्वय आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शीख व इतर समाज प्रमुखांची तातडीने बैठक घेऊन नवी मुंबईला जाणाऱ्या भाविकांची माहिती घ्यावी. विशेषतः पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या संख्येने शीख बांधव वास्तव्यास असल्याने किमान किती भाविक जातील यासंदर्भात नियोजन महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्या समन्वयाने करावे.

 

विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये वक्तृत्व, निबंध, गायन, चित्रकला, वाचन, भक्तीगीत स्पर्धांचे आयोजन करावे. वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित स्पर्धा परीक्षा घेऊन माहितीपट प्रदर्शित करावेत. सर्व उपक्रमांचे जिओ-टॅग फोटो व व्हिडिओ शासन संकेतस्थळावर अपलोड करावेत. जिल्हास्तरावर उत्कृष्ट १५ विद्यार्थी व ५ शैक्षणिक संस्थांची निवड करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ग्रामपंचायत व जिल्हा परिषद स्तरावर विशेष ग्रामसभा घेऊन कार्यक्रमाची माहिती द्यावी. ग्रामपंचायत कार्यालयांवर भक्तीगीत प्रसारण, बॅनर लावणे, तसेच गावागावांत स्वच्छता मोहीम राबवून त्याचे दस्तऐवजीकरण करावे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५ ग्रामपंचायतींची जिल्हास्तरावर निवड करण्यात येईल.

 

आरोग्य विभागाने आरोग्य सप्ताह साजरा करून प्रत्येक गावात वैद्यकीय शिबिरे आयोजित करावीत. शिबिर स्थळी कार्यक्रमाची प्रसिद्धी अनिवार्य राहील. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे जिल्हास्तरावर निश्चित करावीत. कार्यक्रमांचे तांत्रिक दस्तऐवजीकरण करून दररोज संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करावी. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित सर्व विभागांकडील माहिती संकलित करून अपलोड करण्याची जबाबदारी पार पाडावी, तर अप्पर जिल्हाधिकारी हे ‘नोडल अधिकारी’ म्हणून समन्वय साधतील.

 

भाविकांच्या वाहतुकीसाठी आवश्यक बस व्यवस्थेबाबत सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत औद्योगिक संस्था व उद्योजकांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हा आरटीओ यांनी पनवेल आरटीओशी समन्वय साधून बस संख्या, भाविकांची संख्या, समन्वय अधिकारी व चालकांची माहिती उपलब्ध करून द्यावी. भाविकांच्या मुक्कामाबाबतची माहिती कोकण विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्याचे निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments