पुणे, दि. 17 : द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या (आयआयए) पुणे विभागातर्फे तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा आर्किटेक्चर शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दलचा ‘एस. जे. कॉन्ट्रॅक्टस् प्रायव्हेट लिमिटेड जीवनगौरव पुरस्कार’ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनचे (बीएनसीए) संस्थापक प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांना पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आयआयएचे अध्यक्ष आर्किटेक्ट विकास आचलकर, उपाध्यक्ष सीतेश अग्रवाल आणि एस. के. बेलवलकर हाऊसिंगचे समीर बेलवलकर आणि एस. जे. कॉन्ट्रॅक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे सौरभ जंगले उपस्थित होते. आयआयएचे पदाधिकारी आर्किटेक्ट महेश बांगड, आर्किटेक्ट शैलेश दनदने, आर्किटेक्ट संदीप महाजन आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुणेरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1994 पासून गेली 31 वर्षे बीएनसीएचे प्राचार्यपद भूषवलेले डॉ. कश्यप यांचे आर्किटेक्चर शैक्षणिक क्षेत्रातील स्थान मोठे आहे. ते डिझाईन इन्स्टिट्यूटचे प्राचार्य असून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अकादमिक समितीमध्ये आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या आर्किटेक्चर आणि अन्य क्षेत्रांसाठी स्थापन केलेल्या पीएचडी संशोधन केंद्राचे अध्यक्ष असून आतापर्यत केवळ आर्किटेक्चर क्षेत्रात या संशोधन केंद्रात 50 स्नातकांना मार्गदर्शनाचे काम त्यांनी केले आहे. डॉ. कश्यप यांच्या नेतृत्त्वाखाली ‘आयएसडीएस’तर्फे (शाश्वतता अध्यायन विकास संस्था) आणि विद्यार्थिंनींसाठी पहिले ड्रोन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे. ऑक्सफर्डच्या ॲकेडमिक युनियनचे सदस्य असणाऱ्या डॉ. कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 68 आंतरराष्ट्रीय अकादमिक सहयोग व सामंजस्य करार करण्यात आले आहेत. देशातील पहिला पदव्युत्तर पर्यावरणीय आर्किटेक्चर विभागत तर आशिया खंडातील पहिला डिजिटल आर्किटेक्चर पदव्युत्तर विभाग सुरू करण्याचा मानही डॉ. कश्यप यांचेकडे जातो.
‘आयआयए’च्या ‘आर्किटेक्चर व्यवसायातील उत्तुंग कामगिरी केलेल्या एस. के. बेलवलकर पुरस्कारां’मध्ये ज्येष्ठ आकिंटेक्ट विष्णूकुमार विश्वास उर्फ व्ही. व्ही. बडवे, ज्येष्ठ आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे आणि ज्येष्ठ शहर नियोजनकार रामचंद्र गोहाड यांनाही शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुणेरी पगडी प्रदान करून गौरवण्यात आले. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या बीएनसीएमधील प्रा. डॉ. अस्मिता जोशी, एमआयटी कॉलेज ऑफ अर्किटेक्चरच्या प्राचार्य डॉ. अश्विनी पेठे आणि आर्किटेक्ट विनिश देसाई यांनाही पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन ‘एस. जे. कॉन्ट्रॅक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड एक्सलन्स इन टिचिंग’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘आयआयए’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धामधील विजेत्यांनाही यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच बॉक्स क्रीकेट ट्रॉफीचे अनावरणही अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


