पुणे, दि. 16 (जिमाका, वृत्तसेवा) : राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी शासनाच्या मिशन लक्ष्यवेध या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, कुस्ती, शूटिंग, रोईंग, टेबल टेनिस आदी क्रीडा प्रकारांसाठी विभागीय स्तरावर एकूण नऊ केंद्रांवर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
त्यापैकी अॅथलेटिक्स, शूटिंग, रोईंग, कुस्ती व टेबल टेनिस या प्रत्येक खेळासाठी 20 खेळाडू, तर हॉकीसाठी 40 खेळाडूंची निवड निवडचाचणीद्वारे करण्यात येणार आहे.
यासाठी निवडीचे निकष पुढील प्रमाणे आहेत. 31 डिसेंबर 2025 रोजी 25 वर्षांखालील खेळाडू, महाराष्ट्र राज्याचा अधिवास आवश्यक , राज्यस्तरीय पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी, गत दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन, क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती चाचणीत पात्रता, शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांचे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य राहील.
निवड झालेल्या खेळाडूंना निवास, भोजन, पूरक आहार, क्रीडा साहित्य, प्रशिक्षण साहित्य, किट, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण व स्पर्धा सहभाग खर्च तसेच वैद्यकीय चाचण्या व उपचारांचा खर्च विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र खेळाडूंनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत विभागीय क्रीडा संकुल, सर्व्हे क्र. 161, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे विद्यालयासमोर, येरवडा, पुणे येथे प्रत्यक्ष किंवा deputypune@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत.
या योजनेचा लाभ जास्तीत जास्त खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन युवराज नाईक, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग यांनी केले आहे.
00000000


