Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedद वंडर स्कूल, पुणे आणि आविष्कार इन्क्लुजन सेंटरतर्फे ‘अनलेबलिंग कॉन्फरन्स २०२६’...

द वंडर स्कूल, पुणे आणि आविष्कार इन्क्लुजन सेंटरतर्फे ‘अनलेबलिंग कॉन्फरन्स २०२६’ चे यशस्वी आयोजन

पुणे, ३१ मार्च २०२६: द वंडर स्कूल, पुणे यांनी आविष्कार इन्क्लुजन सेंटरच्या सहकार्याने ‘द अनलेबलिंग कॉन्फरन्स २०२६ ’ हा उपक्रम नुकताच यशस्वीरीत्या आयोजित केला. या परिषदेमध्ये न्यूरोडायव्हर्सिटीविषयी असलेले गैरसमज दूर करण्यावर भर देत, घर आणि शाळा या दोन्ही स्तरांवर मुलांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे, त्यांना योग्य पाठबळ देणे आणि सक्षम बनवण्याचा नवा दृष्टिकोन मांडण्यात आला. याचबरोबर द वंडर स्कूलच्या ‘द अनलेबलिंग प्रोजेक्ट – डिस्कव्हरिंग स्ट्रेंथ्स, डिझायनिंग पाथवेज’ या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमालाही यावेळी सुरुवात करण्यात आली.

परिषदेत बोलताना द वंडर स्कूल, पुणेच्या संचालिका अनामिका दासगुप्ता म्हणाल्या, “अनलेबलिंग कॉन्फरन्सची सुरुवात मुलांबाबत आपण वापरत असलेल्या भाषेचा सखोल विचार करण्यापासून झाली. ‘ADHD’ किंवा ‘न्यूरोडायव्हर्जंट’ यांसारख्या संज्ञा वरकरणी योग्य वाटल्या, तरी त्यामध्ये अप्रत्यक्षपणे काही ठरावीक मतांचा किंवा पूर्वग्रहांचा अंश असतो. ‘अटेंशन डेफिसिट’, ‘हायपरॲक्टिव्हिटी’, ‘डिसऑर्डर’ या संज्ञा मूळतः नकारात्मक अर्थ दर्शवतात. आपण लेबल टाळण्याचा प्रयत्न करत असलो, तरी अनेकदा एका लेबलच्या जागी दुसरे लेबल वापरले जाते. एखाद्याला ‘न्यूरोडायव्हर्जंट’ म्हणताना तो नेमका कोणापेक्षा वेगळा आहे आणि ‘सामान्य’ ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे, हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे. एखाद्या गटाने निकष ठरवून दुसऱ्या गटाला ‘वेगळे’ किंवा ‘चुकीचे’ ठरवणे अन्यायकारक आहे. द वंडर स्कूलची स्थापना करणारे शिक्षक म्हणून आम्ही ठामपणे मानतो की, प्रत्येक मुलाला—त्याच्या क्षमतां, वैशिष्ट्यां किंवा भासणाऱ्या फरकांपासून स्वतंत्रपणे—स्वतःच्या पद्धतीने शिकण्याचा अधिकार आहे. शिक्षणातील भिन्नता ही कोणतीही अतिरिक्त सेवा नसून ‘पर्यायी शिक्षण’ म्हणून साजरी करण्याची बाबही नाही; ती प्रत्येक शैक्षणिक संस्थेची मूलभूत जबाबदारी आहे. वेगळ्या पद्धतीने शिकण्याचा अधिकार म्हणजेच शिकण्याचा मूलभूत अधिकार होय.”

तसेच अनामिका पुढे म्हणाल्या, “आम्ही ‘आविष्कार इन्क्लुजन’ची सुरुवात केली तेव्हा न्यूरोडायव्हर्सिटी हा अजूनही विकसित होत असलेला विषय आहे, याची जाणीव झाली. लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी वेगळ्या पद्धतीने विचार करणारी किंवा वागणारी मुले पाहिली होती, मात्र त्यावेळी त्यांना इतकी लेबले लावली जात नव्हती. आज मात्र सोयीसाठी मुलांचे वर्गीकरण करण्याची प्रवृत्ती वाढली असून, काही वेळा धोरणे आणि यंत्रणांमधूनही ती अधिक बळकट होते. शिक्षक म्हणून आम्हाला शिकण्याच्या प्रक्रियेची चांगली समज आहे, मात्र पोषण, थेरपी, सर्वांगीण आरोग्य किंवा वैद्यकीय हस्तक्षेप या क्षेत्रांतील आम्ही तज्ज्ञ नाही, हे आम्ही मान्य केले. त्यामुळे विविध तज्ज्ञ, व्यावसायिक, पालक आणि शिक्षक यांना एकत्र आणत, मुलांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही सहकार्याचे व्यासपीठ उभारण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांपासून आविष्कारने न्यूरोडायव्हर्सिटीविषयी असलेला कलंक आणि चुकीची माहिती दूर करण्यासाठी असे एक सक्षम पर्यावरण निर्माण करण्याचे काम केले आहे. अनेकदा तथाकथित तज्ज्ञांकडूनही नकळत गैरसमज पसरवले जातात, त्यालाही आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना लेबल लावल्याने त्यांना एका चौकटीत बंदिस्त केले जाते, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाऐवजी केवळ निदानावर लक्ष केंद्रित केल्याने समाजही त्यांच्या मोठ्या क्षमतेपासून वंचित राहतो. वैयक्तिकरित्या, मी ‘ADHD’कडे जिज्ञासू, आवडीने प्रेरित, उच्च प्रेरणा आणि एकाग्रता असलेली अवस्था म्हणून पाहणे पसंत करेन. कारण आपण भाषा बदलली, तर दृष्टिकोन बदलतो आणि जे मर्यादा वाटत होते, तेच अनेकांना हवेसे वाटणारे सामर्थ्य ठरू शकते.”

परिषदेच्या शेवटी आपले विचार मांडताना अनामिका म्हणाल्या, “अनलेबलिंग कॉन्फरन्स हा केवळ एक कार्यक्रम नसून वर्षभर चालणारा सातत्यपूर्ण उपक्रम आहे. यामधून गैरसमजांना आव्हान देणे, विश्वासार्ह व अद्ययावत माहिती शेअर करणे आणि या शिकवणीचा आपल्या संस्थांमध्ये सातत्याने वापर करणे, हा आमचा उद्देश आहे. हा उपक्रम केवळ आविष्कार किंवा कोणत्याही एका संस्थेच्या प्रचारासाठी नाही, तर समाजातील विचारसरणीत बदल घडवण्यासाठी आहे. लेबल्सच्या पलीकडे जाऊन मुलांकडे प्रथम व्यक्ती म्हणून पाहिले जावे, निदान म्हणून नव्हे, अशी आमची भूमिका आहे. प्रत्येक मुलाला सन्मान, संधी आणि त्याच्या वेगळेपणानुसार प्रगती करण्यासाठी योग्य वातावरण मिळावे, हेच आमचे ध्येय आहे.”

या परिषदेदरम्यान बोलताना होमिओपॅथिक सल्लागार डॉ. अनुम झहीर (BHMS, M.D. (Hom), PGDEMS, बॅच फ्लॉवर प्रॅक्टिशनर) म्हणाल्या, “द वंडर स्कूल, पुणे आणि आविष्कार इन्क्लुजन सेंटर यांनी आयोजित केलेली ही परिषद अत्यंत उपयुक्त ठरली आहे. अनेक पालक अजूनही आपल्या मुलांचे वेगळेपण स्वीकारण्यास तयार नसतात. मात्र हे कोणतेही समस्या नसून अशा मुलांना केवळ अधिक लक्ष आणि सहानुभूतीपूर्ण वागणूक देण्याची गरज असते. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन याविषयी जागरूकता निर्माण करत आहेत, ही आनंदाची बाब आहे. पालकांनीही आपल्या अडचणी आणि अनुभव मोकळेपणाने मांडले. होमिओपॅथी आणि बाख फ्लॉवर थेरपीसारख्या उपचारपद्धतींमुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत. हे उपचार त्वरित परिणाम देतात असा दावा मी करत नाही, मात्र चिंता, राग यांसारख्या भावनिक संतुलनासाठी ते निश्चितच उपयुक्त ठरतात. न्यूरोडायव्हर्जंट मुलांच्या दैनंदिन जीवनातही याचा चांगला परिणाम दिसून येतो. त्यामुळे अशा मुलांना ‘बदलण्याचा’ प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना समजून घेणे, स्वीकारणे आणि सक्षम बनवणे अधिक महत्त्वाचे आहे.”

यावेळी माय सेन्सरी पार्कच्या संस्थापक व पेडियाट्रिक थेरपिस्ट डॉ. रश्मीत कौर म्हणाल्या, “अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत परिणामकारक ठरतात. सध्या ‘इन्क्लुजन’ केवळ संकल्पना न राहता प्रत्यक्षात राबवली जात असल्याचे यातून दिसून येते. अनेकजण जागरूकता निर्माण करतात, मात्र इन्क्लुजन प्रत्यक्षात आणण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज असते. समाजातील विविध घटक एकत्र येऊन समुदाय उभारण्याचा प्रयत्न करत असतील, तरच न्यूरोडायव्हर्जंट मुलांसाठी अधिक चांगले भविष्य घडवता येईल. द वंडर स्कूल, पुणे आणि आविष्कार इन्क्लुजन सेंटरसारख्या संस्था अशा उपक्रमांद्वारे जागरूकता वाढवण्यासोबतच इन्क्लुजनची अंमलबजावणीही करत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. आजच्या घडीला सेन्सरी प्रोसेसिंग आणि कम्युनिकेशनशी संबंधित अडचणी असलेल्या न्यूरोडायव्हर्जंट व्यक्तींची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहत, त्यांना समाजात प्रभावीपणे कसे सामावून घ्यावे, यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. असे उपक्रम निश्चितच मोठा सकारात्मक परिणाम घडवतील.”

या परिषदेत मुलांसाठी कला, नृत्य आणि क्रीडा या क्षेत्रांतील विविध आकर्षक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळांचा उद्देश मुलांच्या अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि एकूणच सर्वांगीण विकासाला चालना देणे हा होता. आर्ट थेरपी ही अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम ठरली. मुलांनी माती, क्रेयॉन्स, रंगीत पेन्सिल्स आणि वॉटरकलर्स यांसारख्या साहित्यांशी संवाद साधत विविध टेक्स्चरचा अनुभव घेतला, ज्यामुळे त्यांच्या सर्जनशीलतेला आणि संवेदनात्मक जाणिवांना प्रोत्साहन मिळाले. कलेच्या माध्यमातून त्यांनी शब्दांत व्यक्त करणे कठीण असलेल्या भावना सहज मांडल्या. डान्स थेरपीमुळे न्यूरोडायव्हर्जंट मुलांना स्वतःसारखे राहण्यासाठी सुरक्षित आणि मुक्त वातावरण मिळाले. हालचाली हीच त्यांच्या अभिव्यक्तीची भाषा बनली, ज्यामुळे शब्दांच्या मर्यादेपलीकडे जाऊन संवाद साधता आला. हालचाल, उड्या मारणे आणि शरीर हलवण्याच्या विविध कृतींमुळे मुलांना आपली ऊर्जा योग्य प्रकारे व्यक्त करता आली, तसेच मानसिक शांतता आणि भावनिक संतुलन साधण्यास मदत झाली.

क्रीडा थेरपीमुळे मुलांना खेळाच्या माध्यमातून सहभागी होण्याची, नवीन गोष्टी अनुभवण्याची आणि इतरांशी जोडले जाण्याची संधी मिळाली. सामाजिक अडथळ्यांमुळे जे अनुभव पूर्वी त्यांना मिळू शकले नव्हते, ते त्यांनी या माध्यमातून अनुभवले. क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होताना मुलांनी संघभावना, आनंद आणि आत्मविश्वास विकसित केला, तसेच बालपणातील महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा भाग पुन्हा अनुभवला. क्रीडा थेरपीमुळे मुलांच्या मोटर स्किल्समध्येही सुधारणा होत असल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments