मेटा २०२६ मध्ये महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कार
• सर्वोत्कृष्ट निर्मिती – उजागर ड्रॅमॅटिक असोसिएशन अँड वेद सत्पथी, मिथ्यासुर
• सर्वोत्कृष्ट मूळ स्क्रिप्ट – मिथ्यासुर
• मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता – समथिंग लाईक ट्रुथ
• सहायक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता – साहिल अहुजा – मिथ्यासुर
• सर्वोत्कृष्ट ध्वनी आणि संगीत रचना – कैझाद घेरडा – चांदनी रातें
• सर्वोत्कृष्ट वेशभूषा रचना – आशिष देशपांडे – करुणाष्टके
नवी दिल्ली, २६ मार्च २०२६: महिंद्रा ग्रुपतर्फे सुरु करण्यात आलेल्या आणि ‘टीमवर्क आर्ट्स’द्वारे निर्मित ‘महिंद्रा एक्सेलन्स इन थिएटर अवॉर्ड्स’च्या (META) २१ व्या आवृत्तीचा समारोप नवी दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये एका दिमाखदार पुरस्कार सोहळ्याने झाला. या सोहळ्याने भारतातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण रंगभूमीच्या आठवडाभर चाललेल्या अविस्मरणीय उत्सवाची सांगता झाली.
१९ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘मेटा २०२६’ मुळे नवी दिल्लीतील कमानी ऑडिटोरियम आणि श्रीराम सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचे रूपांतर एका चैतन्यमय सांस्कृतिक मंचावर झाले होते. येथे देशातील काही सर्वोत्तम नाट्यकर्मींनी धाडसी, मूळ आणि प्रभावी नाटके सादर केली. या महोत्सवादरम्यान, निवडक १० उत्कृष्ट नाटकांचे सादरीकरण नामवंत परीक्षकांसमोर करण्यात आले. यावेळी नाट्यरसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतातील २० राज्यांमधून, १०० हून अधिक शहरांतून आणि ६० भाषा व बोलीभाषांमधून आलेल्या विक्रमी ४२२ प्रवेशिकांमधून या नाटकांची निवड करण्यात आली होती. हे प्रदर्शन म्हणजे समकालीन भारतीय रंगभूमीची सखोलता, व्याप्ती आणि चैतन्याचे दर्शन घडवणारा एक सशक्त अविष्कार होता. निवडलेल्या अंतिम १० नाटकांनी भारताच्या वैविध्यपूर्ण सादरीकरण परंपरा आणि समकालीन कथा सांगण्याच्या पद्धतीचे प्रतिबिंब उमटवले. यामध्ये हिंदी, मल्याळम, बंगाली, मराठी, हिंदुस्तानी, बुंदेलखंडी, संस्कृत, इंग्रजी आणि जिब्रिश अशा विविध भाषांमधील नाटकांतून पौराणिक कथा, साहित्यिक कथा, आत्मचरित्रे, राजकारण, सामाजिक चळवळ, सामाजिक अस्वस्थता आणि विचारधारा यांचा एक अनोखा संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला.
कमानी ऑडिटोरियम आणि श्रीराम सेंटरमध्ये दररोज होणाऱ्या सादरीकरणामुळे, ‘मेटा २०२६’ ने निवडक नाटकांना नामवंत परीक्षक आणि राजधानीतील नाट्यप्रेमींसमोर आपली कला सादर करण्यासाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले. नेहमीप्रमाणेच, या महोत्सवाने रंगभूमीवरील आणि पडद्यामागील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेणारे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक व्यासपीठ म्हणून आपली भूमिका अधोरेखित केली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे अमोल पालेकर यांना भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल ‘मेटा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. एक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यकर्मी म्हणून पालेकर यांच्या योगदानाने देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीवर खोलवर प्रभाव टाकला आहे. पारंपारिक प्रेक्षागृहांच्या पलीकडे जाऊन रंगभूमीला अधिक जिवंत, सुलभ आणि प्रायोगिक बनवण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले आहे.
पुरस्कार सोहळ्याच्या उत्सवी वातावरणात ‘ताल फ्राय’च्या सादरीकरणामुळे अधिकच रंगत आली. ‘ताल फ्राय’ हा लयीचा छंद आणि उत्तम चवीची सांगड घालणारा एक आगळावेगळा सांगीतिक उपक्रम असून, यामध्ये विविध वाद्यांचे वैविध्यपूर्ण स्वर आणि आकर्षक प्रकाशयोजनेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. तबला, मृदंगम, घटम, काहोन (Cajon), ढोलक, सितार, बासरी, जेम्बे (Djembe) आणि कर्नाटक शास्त्रीय गायन अशा वैविध्यपूर्ण वाद्यांच्या साहाय्याने हा समूह कर्नाटक आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शैलीतील समृद्ध तालबद्ध परंपरांची मांडणी करतो. त्यांच्या सादरीकरणाने सोहळ्यात एक चैतन्यमय ऊर्जा भरली, जी भारतीय सादरीकरण कलेतील गतिशीलता आणि वैविध्यतेचा एक यथोचित गौरव ठरली.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि सांस्कृतिक विस्तार प्रमुख श्री जय शाह म्हणाले, “मेटा २०२६ ने आजच्या भारतीय रंगभूमीची ओळख असलेल्या विलक्षण प्रतिभा आणि सर्जनशील धैर्याचा पुनरुच्चार केला आहे. या वर्षीच्या महोत्सवात देशभरातील विविध कथा आणि सादरीकरणांचे दर्शन घडले, ज्यातून विचारांना चालना देण्याची, सहानुभूती जोपासण्याची आणि अर्थपूर्ण संवाद घडवून आणण्याची रंगभूमीची क्षमता अधोरेखित झाली. अमोल पालेकर यांचा रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या जीवनगौरवाबद्दल केलेला सन्मान हा आम्हा सर्वांसाठी एक विशेष प्रेरणादायी क्षण ठरला.”
‘टीमवर्क आर्ट्स’चे व्यवस्थापकीय संचालक आणि महोत्सवाचे निर्माते श्री संजोय के. रॉय पुढे म्हणाले, “‘मेटा २०२६’ मध्ये भारतीय रंगभूमीची विलक्षण व्याप्ती आणि तिची चिवट प्रवृत्ती यांचा गौरव करण्यात आला. सात दिवसांच्या या महोत्सवामध्ये अशा १० उत्कृष्ट कलाकृती सादर करण्यात आल्या, ज्यातून आपल्या भाषा, परंपरा आणि समकालीन मुद्द्यांची समृद्धता प्रतिबिंबित झाली. हा पुरस्कार सोहळा केवळ महोत्सवाचा समारोप नव्हता, तर तो अशा कलाकार, नेपथ्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि सादरकर्त्यांचा गौरव होता, ज्यांचे कार्य भारतातील कथाकथनाच्या आणि सादरीकरणाच्या पद्धतींच्या कक्षा रुंदावत आहे.”
मेटाचे महोत्सव निर्माता आणि टीमवर्क आर्ट्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री सूरज धिंग्रा म्हणाले, “‘मेटा २०२६’ हा एक अत्यंत समृद्ध करणारा प्रवास राहिला आहे, ज्याने देशभरातील काही अतिशय गुणी आणि विलक्षण नाट्यकर्मींना एकत्र आणले. दरवर्षी आम्हाला केवळ कथा आणि सादरीकरणाच्या प्रकारांमधील वैविध्यच नाही, तर अशा उत्तम दर्जाच्या कलाकृती निर्माण करण्यासाठी लागणारी शिस्त, सहकार्य आणि कटिबद्धता प्रकर्षाने जाणवते. हा महोत्सव केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून, तो कलाकार, प्रेक्षक आणि नाट्यकर्मी यांच्यातील विचारांच्या देवाणघेवाणीचा एक सोहळा आहे आणि या वर्षीच्या सोहळ्याने ही भावना खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित केली आहे. भारतीय रंगभूमीचा हा उत्सव इतका चैतन्यमय आणि अविस्मरणीय बनवल्याबद्दल आम्ही सर्व सहभागी संघांचे आभारी आहोत.”


