मुंबई, १ एप्रिल २०२६: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडने चौथ्या तिमाहीमध्ये सर्व विभागांत उल्लेखनीय वाढ नोंदवली. मार्च २०२६ मध्ये देशांतर्गत बाजारातील प्रवासी वाहनांची विक्री ६६,१९२ युनिट्स इतकी झाली, जी मार्च २०२५ मधील ५१,६१६ युनिट्सच्या तुलनेत २८% वाढ दर्शवते. तिमाहीत देशांतर्गत विक्री १,९८,७४३ युनिट्सवर पोहोचली, जी २०२५ च्या चौथ्या तिमाहीमधील १,४६,१२७ युनिट्सच्या तुलनेत ३६% अधिक आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्ष २६ साठी देशांतर्गत विक्री ६,३१,३८७ युनिट्स झाली, म्हणजेच आर्थिक वर्ष २५ मधील ५,५३,५८५ युनिट्सच्या तुलनेत १४% वाढ झाली.
आंतरराष्ट्रीय व्यवसायात (आयबी) देखील लक्षणीय वाढ झाली. मार्च २०२६ मध्ये विक्री ७७९ युनिट्सवर पोहोचली, जी मार्च २०२५ मधील २५६ युनिट्सच्या तुलनेत तब्बल २०४% वाढ आहे. तिमाहीतील आंतरराष्ट्रीय व्यवसायात विक्री २,६२५ युनिट्स झाली (आर्थिक वर्ष २५च्या चौथ्या तिमाहीमधील ८७२ युनिट्सच्या तुलनेत २०१% वाढ), तर आर्थिक वर्ष२६ साठी विक्री १०,२०० युनिट्सवर पोहोचली, जी आर्थिक वर्ष २५ मधील २,६७८ युनिट्सच्या तुलनेत २८१% वाढ दर्शवते.
एकूण प्रवासी वाहनांची विक्री (इलेक्ट्रिक वाहनांसह) मार्च २०२६ मध्ये ६६,९७१ युनिट्स झाली, जी मार्च २०२५ मधील ५१,८७२ युनिट्सच्या तुलनेत २९% वाढ आहे. आर्थिक वर्ष २६च्या चौथ्या तिमाहीमध्ये एकूण विक्री २,०१,३६८ युनिट्सवर पोहोचली, म्हणजेच आर्थिक वर्ष २५च्या चौथ्या तिमाहीमधील १,४६,९९९ युनिट्सच्या तुलनेत ३७% वाढ. वार्षिक स्तरावर आर्थिक वर्ष २६ मध्ये एकूण विक्री ६,४१,५८७ युनिट्स झाली, जी आर्थिक वर्ष २५ मधील ५,५६,२६३ युनिट्सच्या तुलनेत १५% अधिक आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या (देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय) विक्रीतही दमदार कामगिरी दिसून आली. मार्च २०२६ मध्ये इव्ही विक्री ९,४९४ युनिट्स झाली, जी मार्च २०२५ मधील ५,३५३ युनिट्सच्या तुलनेत ७७% वाढ आहे. आर्थिक वर्ष २६च्या चौथ्या तिमाहीमध्ये इव्ही विक्री २६,९३१ युनिट्स झाली (आर्थिक वर्ष २५च्या चौथ्या तिमाही मधील १५,९३६ युनिट्सच्या तुलनेत ६९% वाढ), तर आर्थिक वर्ष २६ मध्ये एकूण इव्ही विक्री ९२,१२० युनिट्सवर पोहोचली, जी आर्थिक वर्ष२५ मधील ६४,२७६ युनिट्सच्या तुलनेत ४३% वाढ दर्शवते.
कंपनीचे एमडी आणि सीईओ श्री. शैलेश चंद्रा म्हणाले, “या वर्षात पीव्ही उद्योगाची विक्री सुमारे ४.७ दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, जी वर्षागणिक ८% वाढ दर्शवते. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत उद्योगाने दमदार पुनरागमन करत दुहेरी अंकातील वाढ नोंदवली, ज्याला जीएसटी २.० ची अंमलबजावणी आणि सणासुदीच्या हंगामातील मजबूत मागणीचा आधार मिळाला. ग्राहकांमध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाबाबतची पसंती अधिक वाढली असून, सीएनजी वाहनांची विक्री सुमारे २०% वार्षिक दराने वाढली, तर इव्ही विक्रीने २ लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला. या वाढीमागे इव्हीबाबत वाढलेला ग्राहकांचा विश्वास आणि सर्व प्रमुख ओईएमकडून नवीन उत्पादनांचे लाँचिंग हे घटक कारणीभूत ठरले.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्ससाठी आर्थिक वर्ष२६ हे अनेक टप्पे गाठणारे ऐतिहासिक वर्ष ठरले. आम्ही ६.४ लाखांहून अधिक युनिट्सची आतापर्यंतची सर्वोच्च वार्षिक विक्री नोंदवली, जी उद्योगापेक्षा जास्त १५% वार्षिक वाढ दर्शवते. सहामाहीत वाहन नोंदणीनुसार आम्ही उद्योगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो. दक्षिण आफ्रिकेत पुन्हा प्रवेश केल्यामुळे आंतरराष्ट्रीय विक्री १०,००० युनिट्सहून अधिक झाली. सीएनजी विभागात आमच्या पर्यावरणपूरक पॉवरट्रेनमुळे १.७ लाखांहून अधिक विक्री (२४% वार्षिक वाढ) झाली. इव्ही क्षेत्रात आम्ही आमचे नेतृत्व अधिक बळकट करत ४३% वार्षिक वाढीसह ९२,००० हून अधिक युनिट्सची विक्री नोंदवली.
आर्थिक वर्ष २६च्या चौथ्या तिमाहीत आम्ही २ लाख युनिट्सचा टप्पा ओलांडत आतापर्यंतची सर्वाधिक तिमाही विक्री साध्य केली, जी ३७% वार्षिक वाढ दर्शवते. या तिमाहीत इव्ही विक्रीतही विक्रमी कामगिरी करत सुमारे २७,००० युनिट्सची विक्री (६९% वार्षिक वाढ) झाली.
पहिल्या सहामाहीमध्ये नेक्सॉन आणि पंच हे सर्वाधिक विक्री झालेले एसयूव्ही मॉडेल्स ठरले, ज्यातून आमच्या एसयूव्ही पोर्टफोलिओची ताकद स्पष्ट होते. हॅचबॅक सेगमेंटमधील उद्योगापेक्षा जास्त वाढ ग्राहकांची पसंती दर्शवते. सिएरा, सुधारित पंच तसेच हॅरियर आणि सफारीच्या पेट्रोल व्हर्जन्सना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, जो बुकिंग, चौकशी आणि डिलिव्हरीमध्ये दिसून येतो.
पुढील काळात एसयूव्ही, सीएनजी आणि इव्ही विभागातील वाढीमुळे उद्योगाची गती कायम राहण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी भू-राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणे गरजेचे राहील. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आर्थिक वर्ष २७ मध्येही अर्धवार्षिकमधील मजबूत गतीवर आधारित उद्योगापेक्षा जास्त वाढ साध्य करण्यास उत्सुक आहे, ज्याला नवीन उत्पादनांची पाइपलाइन आणि मल्टी-पॉवरट्रेन धोरणाचा आधार मिळेल.”


