तळेगाव* : प्रगत अवस्थेतील फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ६३ वर्षीय रुग्णावर तळेगावच्या टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. वेळीच आणि अत्याधुनिक रेडिएशन थेरपीद्वारे उपचार केल्याने रुग्णाला श्वासोच्छ्वासात येणारा अडथळा दूर झाला आणि सततच्या खोकल्यापासूनही आराम मिळला.
प्रगत अवस्थेतील फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे श्वसनलिकेस अडथळा, रक्तवाहिन्यांवर दाब आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे अशा गंभीर गुंतागुंतीचा सामना करावा लागु शकतो. त्यामुळे त्वरित उपचार करणे गरजेचे होते.
*तळेगाव येथील ६३ वर्षीय नारायण कदम (नाव बदललेले)* हे गेल्या तीन आठवड्यांपासून वाढत्या श्वासोच्छ्वासाच्या त्रासाने, सततच्या खोकल्याने, चेहऱ्यावर तसेच संपूर्ण शरीरावर सूज येणे यासारख्या समस्यांनी त्रस्त झाले होते. यामुळे त्यांच्या दैनंदिन कामातही अडथळा येऊ लागला. या लक्षणांमुळे त्यांच्या जीवनमानावर मोठा परिणाम झाला. त्यांनी विविध डॉक्टर आणि जवळच्या रुग्णालयांत उपचार घेतले, मात्र काही केल्या आराम मिळाला नाही. अखेर त्यांनी टीजीएच ॲान्को लाईफ कॅन्सर सेंटरकडे उपचारांसाठी धाव घेतली.
*रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अभिषेक पुरकायस्थ* आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले. डॉ. पुरकायस्थ यांनी सांगितले, रुग्ण आमच्याकडे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाला. खुप दम लागणे, सतत खोकला आणि चेहरा तसेच शरीरावर आलेली सूज ही प्रगत फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे होती. छातीचा सीटी स्कॅन केल्यानंतर उजव्या फुफ्फुसाच्या वरच्या भागात १०.४ x ९.३ x ८.५ सेंमी आकाराचा मोठा ट्युमर आढळला. हा ट्युमर उजव्या ब्रॉन्कस, आसपासच्या श्वासनलिका आणि सुपीरियर व्हेना कावा(शरीरातील एक प्रमुख रक्तवाहिनी) या महत्त्वाच्या रक्तवाहिनीत पसरला होता, ज्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दाब निर्माण झाला होता आणि त्यामुळेच रुग्णाला त्रासदायक लक्षणे जाणवत होती. बायोप्सीनंतर एडेनोकार्सिनोमाचे (पोटाचा कर्करोग) निदान झाले.
ते पुढे म्हणाले, रुग्णाची प्रकृती लक्षात घेता आणि कर्करोगाची प्रगत अवस्था पाहता, लक्षणांपासून आराम मिळावा आणि रोगाचा प्रसार नियंत्रित ठेवण्यासाठी तातडीने रेडिएशन थेरपी सुरू करण्याचा निर्णय घेतला. उपचारास विलंब झाला असता तर जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असता. अशा प्रकारच्या कर्करोगात श्वासनलिकेचा अडथळा, ऑक्सिजनची कमतरता आणि मोठ्या रक्तवाहिन्यांवर दबाव निर्माण होतो, ज्यामुळे जीवनमान खालावते. त्यामुळे वेळीच निदान आणि उपचार अत्यंत आवश्यक आहेत.
रुग्णावर ‘व्हॉल्युमेट्रिक मॉड्युलेटेड आर्क थेरपी’ (VMAT) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १६ सत्रांमध्ये रेडिएशन थेरेपी देण्यात आली. या तंत्रज्ञानाद्वारे ३६० अंशात फिरणाऱ्या आर्क पद्धतीने ट्युमरवर अत्यंत अचूकपणे किरणोत्सर्ग केला जातो, तसेच हृदय, फुफ्फुसे आणि महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांसारख्या अवयवांचे संरक्षण केले जाते.
या उपचारांना रुग्णाने खुप चांगला प्रतिसाद दिला. दम लागणे, खोकला येणे आणि शरीरावरील सूज पूर्णपणे कमी झाली होता. १६ सत्रांनंतरच्या फॉलो-अप तपासणीत ट्युमरचा आकारही कमी झाल्याचे आढळून आले. प्रगत रेडिएशन तंत्रज्ञानामुळे आता अशा गुंतागुंतीच्या आणि प्रगत कर्करोगांवर प्रभावीपणे उपचार करणे शक्य होत आहे, ज्यामुळे रुग्णांच्या जगण्याची शक्यता वाढत आहे.
*उपचारानंतर रुग्ण नारायण कदम म्हणाले,* मला सतत श्वास घेण्यात अडचण येत होती आणि दैनंदिन कामंसुद्धा अवघड झाली होती. उपचारानंतर माझ्या शरीरावरील सूज कमी झाली असून आता मला खूप बरे वाटत आहे आणि मी पुन्हा मोकळा श्वास घेऊ शकतो. मी डॉ. अभिषेक पुरकायस्थ आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानतो.


