**पुणे, दि. १८ एप्रिल २०२६:**
आरोग्य क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून निरपेक्ष भावनेने कार्यरत असलेल्या **’सेवा आरोग्य फाउंडेशन’**चा दशकपूर्ती सोहळा कर्वेनगर येथील रमा पुरुषोत्तम हायस्कूलच्या अॅम्फी थिएटरमध्ये अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. “रुग्णाचा त्रास केवळ शारीरिक स्तरावर न पाहता तो मानसिक आणि भावनिक स्तरावर समजून घेऊन त्याला माणुसकीने सहकार्य करणे हीच खरी सेवा आहे,” असे प्रेरक विचार *प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. संजीव डोळे* यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या १० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘दशकपूर्ती अंका’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याचे औचित्य साधून बोलताना **सतीश जोशी** यांनी प्रास्ताविकात नमूद केले की, “हा सोहळा म्हणजे केवळ एक उत्सव नसून आमच्यासाठी आत्मपरीक्षणाची संधी आहे. मागील दहा वर्षांच्या अनुभवांच्या शिदोरीवर आम्हाला पुढील वाटचालीची योग्य दिशा निश्चित करायची आहे.” संस्थेच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातांचे त्यांनी यावेळी मनःपूर्वक आभार मानले.
या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या विविध विभागांनी केलेले सादरीकरण. विद्यार्थ्यांनी ‘नागरी कर्तव्य’, ‘मोबाईलचा अतिवापर’, समुपदेशन आणि प्रथमोपचार या विषयांवर अत्यंत प्रभावी नाटिका सादर केल्या. समाजजागृतीचा हा संदेश उपस्थितांच्या मनाला भिडला.
मुख्य मार्गदर्शक *डॉ. संजीव डोळे* यांनी सेवाकार्यात दया, सहानुभूती आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख वक्ते पराग कंगले यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “संस्था तेव्हाच सक्षम आणि विश्वासार्ह बनते जेव्हा तिथे पारदर्शकता, सर्वांचा सहभाग आणि एकत्रित निर्णय प्रक्रिया असते. सेवा आरोग्य फाउंडेशनने ही मूल्ये जपली आहेत. समाजातील समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही संस्था आज आपल्या निस्वार्थ कार्यामुळे समाजात आदराचे स्थान राखून आहे.” यावेळी संस्थेने केलेल्या २ लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांच्या विक्रमी कार्याचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, आगामी काळात ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी अधिक नियोजनपूर्वक आणि एकत्रित प्रयत्न केले जातील. आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याला संस्थेचे *संचालक रवींद्र शिंगणापूरकर* *,मनोज देशमुख*, *डॉ. हर्षदा पाध्ये*, संभाजी भाग संघचालक मा .अनिल जी व्यास* व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन *ऋतुजा फुलकर यांनी केले, तर निरंजनी शिरसट* यांनी आभार मानले. सामूहिक ‘वंदे मातरम’ने या प्रेरणादायी सोहळ्याची सांगता झाली.


