एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या मॅग्मा २०२६ मधील तज्ञांचे मत
पुणे, ६ मे २०२६:- जागतिक ऊर्जेची अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे इंधन पुरवठा यंत्रणा विस्कळीत होत असताना भारताने भूगर्भीय औष्णिक ऊर्जा आणि नैसर्गिक हायड्रोजन यांसारख्या उदयोन्मुख स्रोतांमधील गुंतवणूक वाढवून आपल्या ऊर्जा मिश्रणात तातडीने वैविध्य आणले पाहिजे, असे मत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (एमआयटी-डब्ल्यूपीयू) अॅन्युअल जिओथर्मल मीट फॉर अॅडव्हान्समेंट, मॅग्मा २०२६ मध्ये तज्ञांनी व्यक्त केले.
भूगर्भीय औष्णिक ऊर्जा शोध व उत्पादन (ईअँडपी) या विषयावरील या पाच दिवसांच्या विशेष कार्यशाळेत जगभरातील १६ हून अधिक संस्थांनी सहभाग नोंदवला. यामध्ये जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, आयआयटी, आयआयएसईआर सीडीएसी, सीएसआयआर लॅब्स, बहुराष्ट्रीय कंपन्या जसे हॅलिबर्टन, सीएमजी, बेसिप-फ्रॅनलाब, अॅपेक्स वेल्स आणि ब्लॅक रिव्हर, तसेच सेरॉस एनर्जी, थरमॅक्स आणि निश्रा एनर्जी यांसारख्या भारतातील कॉर्पोरेट्ससह पुण्यातील अनेक युनिव्हर्सिटीजचा समावेश होता. सध्या भारतातील पुगा व्हॅलीमध्ये भूगर्भीय औष्णिक विहिरींचे खोदकाम करणारी सेरॉस एनर्जी या इव्हेण्टची मुख्य प्रायोजक होती.
या चर्चेत भर देण्यात आला की, भारताची दीर्घकालीन ऊर्जा स्थिरता फक्त सौर आणि पवन ऊर्जेच्या विस्तारावर अवलंबून नसून २४x७ ऊर्जा निर्माण करू शकणाऱ्या स्थिर आणि स्थळ-विशिष्ट बेस लोड ऊर्जा स्रोतांच्या विकासावरही अवलंबून असेल. यामुळे आयात केलेल्या जीवाश्म इंधनावरील अवलंबन कमी होऊन ऊर्जा सार्वभौमत्व प्राप्त करण्यास मदत होईल. भारतात भूगर्भीय औष्णिक ऊर्जेची क्षमता १० गिगावॅट पेक्षा जास्त आहे, तसेच हा देशातील सर्वात संभाव्य बेस लोड ऊर्जा स्रोत आहे.
मुख्य अतिथी म्हणून उपस्थित सेरॉस एनर्जीचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ डॉ. आशिष अग्रवाल यांच्या हस्ते या इव्हेण्टचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अग्रवाल म्हणाले की, देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी भूगर्भीय औष्णिक ऊर्जेचा विकास अत्यंत महत्त्वाचा असून सेरॉस एनर्जी त्यासाठी कटिबद्ध आहे. या उद्घाटन सोहळ्याचे सन्माननीय अतिथी म्हणून जागतिक कीर्तीचे भूभौतिकशास्त्रज्ञ आणि नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनजीआरआय)-सीएसआयआरचे संचालक डॉ. प्रकाश कुमार उपस्थित होते. त्यांनी भूभौतिकशास्त्रातील प्रगत तंत्रज्ञानावर चर्चा केली आणि माहिती दिली की, प्रगत भूभौतिकीय आणि भूगर्भीय पद्धतींचे एकत्रित निकाल अतिशय अचूकतेने भूगर्भीय औष्णिक संधी शोधण्यास सक्षम आहेत.
तज्ञांनी नमूद केले की, भारतात भूगर्भीय औष्णिक ऊर्जा अजूनही संशोधनाच्या टप्प्यावर असली तरी सुरुवातीचा मोठा शोध खर्च आणि स्थळ-विशिष्ट स्वरूपामुळे तिचा विकास टप्प्याटप्प्याने आणि जोखीम-व्यवस्थापन दृष्टिकोनातून केला जात आहे. या क्षेत्राचा पुरेसा वापर होत नाही असे नसून प्रायोगिक प्रकल्प आणि सरकारी उपक्रमांद्वारे दीर्घकालीन व्यावसायिक व्यवहार्यता सुनिश्चित करण्यासाठी हे क्षेत्र सावधगिरीने प्रगती करत आहे.
मॅग्मा २०२६ च्या समारोप समारंभाचे मुख्य अतिथी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी (आयआयपीई)चे संचालक डॉ. शालीवाहन म्हणाले, “भारतातील भूगर्भीय औष्णिक ऊर्जेचे स्थळ-विशिष्ट स्वरूप आणि संशोधनासाठी लागणारा मोठा खर्च पाहता तिचा विकास टप्प्याटप्प्याने आणि जबाबदार पद्धतीने केला जात आहे. हा ऊर्जा स्रोत लगेच मुख्य प्रवाहात येणार नसला, तरी भारताच्या ऊर्जा मिश्रणात धोरणात्मक आणि पूरक भूमिका बजावेल.”
ते पुढे म्हणाले की, भूगर्भीय औष्णिक ऊर्जा फक्त स्वतंत्र उपाय म्हणून न राहता व्यापक ऊर्जा मिश्रण धोरणाचा एक भाग म्हणून योगदान देईल. “भारताचे लक्ष एका संतुलित ऊर्जा पोर्टफोलिओवर असले पाहिजे, जिथे विविध स्रोत आयातीवरील अवलंबन कमी करण्यासाठी आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा प्रबळ करण्यासाठी योगदान देतील,” असे ते म्हणाले.
भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणातील एक महत्त्वाची उणीव म्हणजे उच्च-गुणवत्तेचा डेटा आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित सुसंगत शोध धोरणाची गरज. तज्ञांनी स्पष्ट केले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि प्रगत डेटा अॅनालिटिक्स यांसारखी तंत्रज्ञाने भूगर्भातील संशोधनातील अनिश्चितता लक्षणीयरित्या कमी करू शकतात, यशाचा दर सुधारू शकतात आणि उदयोन्मुख ऊर्जा प्रकल्पांना आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य बनवू शकतात.
“एआय आणि डेटा-आधारित तंत्रज्ञान संशोधनाला गती देऊ शकतात, जलद निर्णय घेण्यास सक्षम करू शकतात आणि नवीन ऊर्जा संसाधनांची व्यावसायिक व्यवहार्यता सुधारू शकतात,” असे डॉ. शालीवाहन म्हणाले.
या परिषदेत भूगर्भीय औष्णिक ऊर्जेसोबत नैसर्गिक हायड्रोजन या जागतिक स्तरावर वाढत्या आवडीच्या विषयाकडेही लक्ष वेधण्यात आले. हे उदयोन्मुख ऊर्जा स्रोत स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्राचा कायापालट करण्याची क्षमता ठेवतात. डॉ. शालीवाहन यांनी स्पष्ट केले की, हायड्रोजन उत्पादनाच्या पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत निसर्गात नैसर्गिकरित्या आढळणारे हायड्रोजनचे साठे अत्यंत कमी खर्चात काढले जाऊ शकतात, ज्यामुळे जागतिक ऊर्जा मिश्रणात ही आश्वासक भर ठरेल.
तज्ञांनी सांगितले की, भूगर्भीय औष्णिक ऊर्जा आणि नैसर्गिक हायड्रोजनसाठी भारतात विशेषतः विविध भूगर्भीय रचनांमध्ये मोठी क्षमता आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील संशोधनाचे प्रयत्न भारताला या क्षेत्रात भविष्यातील जागतिक लीडर म्हणून प्रस्थापित करू शकतात. भूगर्भीय औष्णिक यंत्रणा व हायड्रोजन-समृद्ध क्षेत्रांचे एकत्रीकरण झाल्यास संशोधनाची क्षमता अधिक वाढू शकते आणि संसाधनांची कार्यक्षमता सुधारू शकते.
थर्मॅक्स लिमिटेडच्या आरटीआयसीचे प्रिन्सिपल टेक्नॉलॉजिस्ट आणि जनरल मॅनेजर डॉ. चार्ल्स पी. म्हणाले, “भारताच्या ऊर्जा परिवर्तनामध्ये महत्त्वाकांक्षा आणि व्यावहारिकता यांचा समतोल असणे आवश्यक आहे. सौर आणि पवन ऊर्जेसारखे अक्षय ऊर्जा स्रोत वेगाने विस्तारत असताना भूगर्भीय औष्णिक ऊर्जा स्थानिक ऊर्जा निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. विशेषतः दुर्गम भागात, जिथे महागड्या डिझेल-आधारित यंत्रणांवरील अवलंबन यामुळे कमी होऊ शकते.”
एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या पेट्रोलियम इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक आणि मॅग्मा २०२६ चे निमंत्रक डॉ. राजिब के. सिन्हाराय यांनी ऊर्जा विकासासाठी दीर्घकालीन आणि ध्येय-प्रेरित दृष्टिकोनाच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले, “आजच्या जागतिक संदर्भात ऊर्जा सुरक्षा आर्थिक आणि धोरणात्मक स्थिरतेशी निगडित आहे. भारताने अल्पकालीन उपायांच्या पुढे जाऊन नाविन्यपूर्ण संशोधन, तसेच शैक्षणिक संस्था, उद्योग आणि धोरणकर्ते यांच्यातील प्रबळ सहयोगाच्या माध्यमातून ऊर्जा स्वावलंबन निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”
तसेच, तज्ञांनी भर दिला की, जागतिक व्यत्ययांचा भारतावर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी भारताने इतर क्षेत्रांतील राष्ट्रीय उपक्रमांप्रमाणे ऊर्जा नियोजनाबाबत अधिक धोरणात्मक आणि ध्येय-प्रेरित दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भूगर्भीय औष्णिक, हायड्रोजन आणि भूगर्भीय संशोधनातील देशांतर्गत क्षमता मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
या चर्चेचा समारोप एका सहमतीने झाला की, भारताच्या अक्षय ऊर्जा विकासात सौर आणि पवन ऊर्जा केंद्रस्थानी राहतील, पण स्थिर, वैविध्यपूर्ण आणि भविष्यासाठी सज्ज अशी ऊर्जा परिसंस्था उभारण्यासाठी भूगर्भीय औष्णिक ऊर्जा आणि नैसर्गिक हायड्रोजन यांसारखे उदयोन्मुख उपाय महत्त्वपूर्ण पूरक भूमिका बजावतील.


