पुणे, दि. २१ मे २०२६ : ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने बांधलेली घरे ही स्थानिक भौगोलिक स्थिती व हवामानपूरक शाश्वत बांधकामे असतात. हाच विचार विद्यार्थिनींमध्ये रुजवण्याच्या उद्देशाने साठी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) पहिल्या वर्षातील विद्यार्थिनींनी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील पारगाव या छोट्या वस्तीचा केलेला अभ्यास प्रदर्शनाच्या स्वरुपात मांडला आहे.
ऊर्वी पब्लिक ट्रस्टच्या सेक्रेटरी अमृता नायडू यांच्या सहकार्याने पारगाव तर्फ खेड येथे १३ ते १६ मार्च २०२६ या काळात हा अभ्यास केला गेला. या अभ्यासाचे प्रदर्शन पाहण्यासाठी पारगाव तर्फ खेड यथील बीएनसीए येथे उपस्थित होते.
बीएनसीएमधील पहिल्या वर्षातील ४३ विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाल्या असून त्यांना महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. ध्रुव चंदवानिया, प्रा. अपर्णा कुलकर्णी, प्रा. श्वेता अलबाळ, प्रा. सायली कुलकर्णी आणि प्रा. दीप्ती नातू यांनी या प्रकल्पास मार्गदर्शन केले.
दगड, विटा, माती आणि लाकडाचा वापर केलेली पारंपरिक घरे हीच खऱ्या अर्थाने शाश्वत घरे असतात, हा विचार वास्तूरचनाशास्त्राच्या विद्यार्थिनींमध्ये सुरुवातीपासूनच ठसवण्यासाठी दरवर्षी हा उपक्रम घेतला जातो, असे बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी सांगितले. हे या उपक्रमाचे चौथे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. ध्रुव चंदवानिया, प्रा. अपर्णा कुलकर्णी आणि प्रा. श्वेता अलबाळ म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील छोट्या गावांमध्ये जाऊन तेथील बांधकामशैली व राहाणीमानाचा अभ्यास करणे हा उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. पारंपरिक बांधकामशैली व आधुनिक राहाणीमान यांची सांगड गावकरी कसे घालतात हा सुद्धा अभ्यासाचा एक भाग आहे. पारंपरिक बांधकामशैलीचा वापर आजच्या काळातील रहाणीमानाच्या गरजांना कसा पूरक ठरेल याचे विश्लेषण विद्यार्थिनींनी केले आहे. गावकऱ्यांना पारंपरिक, हवामान पूरक व गावातील उपलब्ध सामुग्रीपासून बांधलेल्या वास्तूंचे फायदे सांगून लोकजागृती करणे हा सुद्धा या प्रकल्पाचा एक भाग आहे.
या विद्यार्थिनींनी गावातील सहा पारंपरिक घरे आणि वेशीवरील हनुमान मंदिराचा अभ्यास केला. त्यातील गावात उपलब्ध असणारी दगड, माती, विटा आणि लाकूड यांसारखी पारंपरिक सामुग्री किती प्रभावीपणे तापमान नियंत्रण करतात याचे निरीक्षण त्यातून नोंदवले. तसेच गावातील पारंपरिक बांधकाम पद्धतीसंबंधीची माहिती गावकऱ्यांशी संवाद साधून मिळवली.
गावाजवळच्या माळरानावर सुमारे २०० एकर जमिनीवर ‘फोर्टीन ट्रीज फौंडेशन’ या संस्थेतर्फे वनीकरण प्रकल्प उभारला जात आहे. विद्यार्थिनींचा अभ्यास, निरीक्षणे व विश्लेषणे यांच्या आधारे या वनक्षेत्रात ‘व्हिजिटर्स सेंटर’चा प्रस्ताव देण्यात येणार आहे. तसेच गावातील पडझड झालेल्या वास्तूंमधील बांधकाम सामुग्री वापरून गावातील मुक्ताई मंदिराजवळ ‘नाना नानी पार्क’चा प्रस्तावही बीएनसीएच्या विद्यार्थिनी देत आहेत.
या संपूर्ण प्रकल्पास प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप आणि उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
ऊर्वी फौंडेशनच्या वतीने आर्किटेक्ट देवश्री वांगे यांनीही या प्रदर्शनास भेट दिली. त्या म्हणाल्या की, हेच प्रदर्शन लवकरच पारगाव तर्फ खेड येथे भरवण्यात येणार असून गावकऱ्यांच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार या प्रस्तावास अंतिम रूप दिले जाईल. हे काम पाहण्यासाठी गावात काम करणाऱ्या रोटरी क्लबचे स्थानिक अध्यक्ष राजन जांभळे तसेच जिल्हा परिषदेचे निवृत्त अधिकारी दीपक कांबळे आले होते. त्यांनी बीएनसीएच्या विद्यार्थ्यांनी गावात तसेच नंतर प्रदर्शनातून तयार केलेली मॉडेल्स व निरीक्षणे याबाबत समाधान व्यक्त केले.
बीएनसीएच्या तळमजल्यावरील प्रदर्शन विभागात हे प्रदर्शन सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत सर्वां
साठी खुले आहे.


