पुणे : अधिक ज्येष्ठ मासानिमित्त ग्रंथ पारायण दिंडी, पुणे आणि गीताधर्म मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच मराठीत भव्य गोकथेचे आयोजन करण्यात आले आहे. गोमातेचे माहात्म्य, गोसेवेचे महत्त्व आणि गोदानाचे महत्त्व यांचा सुंदर संगम असलेली ही प्रेरणादायी गोकथा १४ ते १७ जून २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० वाजता सदाशिव पेठेतील गीताधर्म मंडळ येथे होणार आहे. या गोकथेचे निरूपण ह.भ.प. परेशबुवा देवळणकर करणार आहेत, अशी माहिती ग्रंथ पारायण दिंडीचे वीरेंद्र कुंटे यांनी दिली.
भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पूजनीय स्थान असून तिच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे विवेचन या गोकथेतून करण्यात येणार आहे. अधिक ज्येष्ठ मासाच्या पुण्यप्रद पर्वकाळात आयोजित या प्रवचनमालेतून गोभक्ती, धर्मभक्ती आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा भाविकांना मिळणार आहे. तसेच गोसंवर्धन, गोसेवा आणि गोदानाचे महत्त्वही विविध उदाहरणांसह उलगडून सांगितले जाणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता गोमाता पूजनाने होणार असून त्यानंतर गोकथेचे पहिले पुष्प गुंफले जाईल. “गावो विश्वस्य मातरः” या वैदिक संकल्पनेवर आधारित या आध्यात्मिक पर्वात भाविकांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह सहभागी होऊन या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गोशाळांचे व्यवस्थापन व गोसेवेचे कार्य निष्ठेने चालविणाऱ्या गोशाळा संचालकांचा सन्मान करण्यात येणार असून, या प्रसंगी विविध गोशाळांना आर्थिक मदत व देणग्यांचे वितरणही करण्यात येणार आहे.


