* मिरर इमेज ॲनाटॉमी किंवा सायटस इनव्हर्सस टोटॅलिस या दुर्मिळ जन्मजात स्थितीमध्ये छातीच्या पिंजऱ्यातील व पोटातील अवयव सामान्य स्थानापेक्षा उलटे किंवा प्रतिबिंबित स्थितीत असतात
· महिलेला असलेल्या इतर गुंतागुंतींमुळे प्रक्रिया अधिक आव्हानात्मक
पुणे,21 मे 2026 : नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर येथील डॉक्टरांच्या टीमने सायटस इनव्हर्सस टोटॅलिसया या जन्मजात दुर्मिळ स्थिती असलेल्या 44 वर्षीय महिलेवर लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टोमी ही कमीत कमी छेद असणारी प्रक्रिया यशस्वीरित्या केली.
सायटस इनव्हर्सस टोटॅलिस ही एक जन्मजात स्थिती आहे,ज्यामध्ये छाती आणि पोटाच्या पोकळीतील अवयव नेहमीपेक्षा उलट्या किंवा प्रतिबिंबीत अशा अद्वितीय स्थितीमध्ये असतात.याचे प्रमाण 10,000 ते 25,000 जन्मलेल्या व्यक्तींपैकी अंदाजे फक्त एका मध्ये आढळू शकते.सोप्या भाषेत छाती आणि पोटातील मुख्य अवयव हे शरीर रचनेत उलट्या दिशेच्या स्थितीत असतात.म्हणजेच सामान्य शरीर रचनेचे हे प्रतिबिंब असते.उदा.हृदयाचे खालचे टोक (अपेक्स) हे डाव्या बाजू ऐवजी उजव्या दिशेने वळलेले असते.तसेच यकृत डाव्या बाजूला असते.या स्थितीमध्ये कोणतीही लक्षणे नसली तरी प्रतिबिंबसारख्या शरीर रचनेमुळे कुठलीही शस्त्रक्रिया करताना किंवा निदान करताना तांत्रिक अडचणी येतात. या महिलेला असलेल्या सिम्प्टोमॅटिक कोलेलिथियासिस यावर सामान्यत: लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टोमी ही प्रक्रिया केली जाते.मात्र अवयवांच्या प्रतिबिंबत स्थितीमुळे नेहमीच्या शस्त्रक्रिया पध्दती,शस्त्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या ट्रोकर हे उपकरण बसवण्याचे स्थान आणि शल्यचिकित्सकाची कार्यसुविधेत (एर्गोनॉमिक्स) बदल करावा लागतो.
याबाबत सांगताना नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे वरिष्ठ रोबोटिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.अभिजीत व्होटकर म्हणाले की,या महिला रूग्ण जेव्हा आमच्याकडे आल्या होत्या तेव्हा त्याआधी चार दिवसांपासून त्यांच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या.त्यांना एक वर्षापासून उच्च रक्तदाब आणि गेली 15 वर्षे हर्नियाच्या आधी झालेल्या शस्त्रक्रियेच्या जागी फुगवटा आला होता.याआधी त्यांच्यावर ट्युबल लिगेशन ही शस्त्रक्रिया झाली होती.याशिवाय फुफ्फुसांवर परिणाम करणाऱ्या ट्युबरक्युलॉसिसवर त्यांनी उपचार घेतले होते.याचबरोबर अँटी रेट्रो व्हायरल थेरपीला त्यांच्या शरीराचा प्रतिसाद चांगला नव्हता.या सर्व असलेल्या वैद्यकीय स्थितींमुळे, ही शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक होती.
पोटदुखीवर निदान करण्यासाठी अल्ट्रा सोनोग्राफी आणि एमआरसीपी चाचण्या करण्यात आल्या.यामध्ये कोलेलिथियासिस विथ सायटस इनव्हर्सस टोटॅलिस या स्थितीचे निदान झाले.यानंतर हर्नियावर उपचारासाठी मेयो रिपेअर तंत्र आणि त्याचबरोबर लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टोमी करून पित्ताशय काढण्याच्या प्रक्रियेचे धोरण आखण्यात आले.मात्र सेरोपॉझिटिव्हीटी (रोगप्रतिरोधक स्थिती) यामुळे संसर्ग नियंत्रण,रोगप्रतिकारक स्थितीचे मुल्यांकन आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमसाठी सुरक्षा विषयक खबरदारी या सर्व बाबी महत्त्वाच्या होत्या.
कीहोल शस्त्रक्रियेने त्यानंतर पित्ताशय काढण्यात आले.रक्तस्रावावर नियंत्रण मिळविण्यात आले आणि शस्त्रक्रियेनंतर अतिरिक्त द्रवाचा निचरा करण्यासाठी तात्पुरती ट्युब पोटात बसविण्यात आली.शेवटी छोटे केलेले छेद बंद करण्यात आले आणि हर्नियामुळे झालेला फुगवटा दुरूस्त करण्यात आला.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ.अभिजीत व्होटकर यांच्यासह भूलतज्ञ डॉ.प्रतिक कदम,शल्यचिकित्सक डॉ.राजश्री सहा,डॉ.कविश पंडित इत्यादींचा समावेश होता.
या टीमचे अभिनंदन करताना नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,इतर गुंतागुंत असलेल्या पूर्वस्थितीत अशा प्रकारच्या दुर्मिळ आजारावर उपचार करण्यासाठी काटेकोर नियोजनाची आवश्यकता असते.आमची कुशल डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीम यासह अत्याधुनिक सुविधांच्या साहाय्याने अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीतील तांत्रिकदृष्टया आव्हानात्मक ठरू शकणाऱ्या प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडण्यास मदत झाली.


