Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*तहानलेल्या जीवांसाठी 'दगडूशेठ' तर्फे १०० दिवसात १ कोटी लीटर पाणी* 

*तहानलेल्या जीवांसाठी ‘दगडूशेठ’ तर्फे १०० दिवसात १ कोटी लीटर पाणी* 

 

डोंगरदऱ्यात मदतीसाठी धावले ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा ; दररोज १ लाख लीटर पाण्याचे वितरण

पुरंदर तालुक्यातील दुर्गम वनक्षेत्र, डोंगराळ भाग आणि वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा

 

पुणे : सर्वत्र उन्हाचा वाढता तडाखा आणि कडक उन्हामुळे माळरानावर अटलेले पाणवठे व तहानेने व्याकूळ झालेले मूक जीव अशी परिस्थिती पुण्यापासून काही अंतरावर असताना त्या तहानलेल्या जीवांसाठी ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा मदतीला धावले. पुरंदर तालुक्यातील दुर्गम वनक्षेत्र, डोंगराळ भाग आणि वाड्या-वस्त्यांमध्ये ट्रस्टच्या स्वतःच्या २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करून दररोज १ लाख लीटर याप्रमाणे मार्च, एप्रिल, मे आणि आता जून महिन्यात मिळून तब्बल १ कोटी लीटर पाण्याचे वितरण करण्यात आले आहे.

 

पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी भटकणाऱ्या जीवांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाने टँकरद्वारे पाणी पोहोचवण्यास सन २०१४ पासून सुरुवात केली. माणसांसह वन्यजीव, पक्षी आणि पाळीव जनावरांसाठी दिलासादायक उपक्रम ट्रस्टने दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविला आहे. इतर वेळी महामार्गावरील झाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आणि वृक्षसंवर्धनाला हातभार लावला जातो. गावकऱ्यांची तहान भागवली जात असताना उरलेले पाणी शिवारातील तळ्यांमध्ये सोडले जात आहे. हा उपक्रम ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

 

पुरंदर तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागाला दुष्काळी पट्टा म्हणून ओळखले जाते. उन्हाळा वाढताच या भागातील पाण्याची तीव्रता वाढते. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ट्रस्टने सेवाभावाने पुढाकार घेऊन वाल्हे गावच्या पूर्वेकडील गायकवाडवाडी, मुकादम वाडी, अंबाजीचीवाडी, राख ग्रामपंचायत हद्दीतील रणनवरेवाडी,चव्हाणवस्ती,पडळकरवस्ती,करेवस्ती, वागदरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बहिर्जीचीवाडी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदानामधील झाडांना,चतुर्मुख महादेव मंदिर वारवडी,नारायपूर, पूर-पोखर, दौंडज, नावळी, कडेपठार देवस्थान, थाप, वारवडी, दरेवाडी आणि आजूबाजूच्या परिसरात टँकरद्वारे पाणी पोहोचवण्यास सुरुवात केली.

 

तहानेने व्याकूळ झालेल्या शेळ्या-मेंढ्या, गायी-बैल, दुभती जनावरे आणि रानातील जीव पाण्याकडे धावत येतात. काही क्षणांत कोरड्या तळाभोवती जीवांची गर्दी उसळते आणि निसर्ग जणू समाधानाचा श्वास घेतो. शेतकऱ्यांसाठीही ही मदत मोठा आधार ठरली आहे.

 

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवासोबत वन्यजीवांचे अस्तित्वही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही ही सेवा करत आहोत. पिकांसाठी जपून ठेवलेले पाणी जनावरांना देणे कठीण होत असताना त्यांची चिंता काही अंशी कमी झाली आहे. मेंढपाळांनाही चारा-पाण्यासाठी होणारा त्रासदायक प्रवास कमी झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments