Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedहे सरकार निष्ठावंत कार्यकर्ता संपवण्याचे काम करत आहे. -संजय राऊत’

हे सरकार निष्ठावंत कार्यकर्ता संपवण्याचे काम करत आहे. -संजय राऊत’

 

पुणे ः आज देशात हुकूमशाहीचे वातावरण असून सामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. सध्याचे सत्ताधारी सरकार निष्ठावंत कार्यकर्ता ही जमातच नष्ट करण्याचे आणि त्यांना संपवण्याचे काम करत आहे. अशा काळात केवळ चिमटे काढून चालणार नाही, तर थेट हल्ला करण्याची गरज आहे. या देशाला आज चिमट्यांची नव्हे, तर थेट आणि रोखठोक हल्ल्यांचीच गरज आहे, असे परखड मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत व्यक्‍त केले.

 

कै. धनंजय थोरात प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा ’कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले, मुश्ताक पटेल आणि ज्येष्ठ संगीतकार सलील कुलकर्णी यांना खासदार राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सलील कुलकर्णी यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री रेखा कुलकर्णी यांनी पुरस्कार स्विकारला. संजय राऊत यांच्या हस्ते धनंजय थोरात यांच्या कुटुंबातील अथर्व थोरात यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी सीआयडीचे निवृत्त अप्पर महासंचालक अशोक धिवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ वात्रटिकार रामदास फुटाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख वसंत मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर, बिपीन गुपचूप, शिरीष बोधनी, प्रथमेश आबनावे, सुनिल मलके, प्रशांत सुरशे, स्वाती शिंदे, सुरेश कांबळे, केतन अग्रवाल आदी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे आयोजन कै. धनंजय थोरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केले होते.

 

काँग्रेसचे दिवंगत कार्यकर्ते धनंजय थोरात यांच्या आठवणींना उजाळा देत राऊत यांनी आजच्या बिघडलेल्या राजकीय संस्कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, धनंजय हा निष्ठावंत कार्यकर्ता होता. काँग्रेस पक्षात राहून त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. कुठल्याही अमिषाला ते बळी पडले नाहीत. ते केवळ एकदाच नगरसेवक झाले, तरी पक्षात टिकून राहिले. आज मात्र परिस्थिती अगदी उलटी झाली आहे. काँग्रेसने ज्यांना मुख्यमंत्री, राज्यपाल केले, तेच लोक स्वाभिमान आणि निष्ठा विकून पळून गेले.

 

ते पुढे म्हणाले, आज पश्चिम बंगाल असो की संपूर्ण देश, कार्यकर्ता ही जमातच पूर्णपणे नष्ट करायची, असे या सरकारने ठरवले आहे. कार्यकर्त्याला बाजारातील भाव द्यायचा, असे चालू झाले आहे. आज निवडून आलेल्या लोकांना हमीभाव पक्का आहे. हा भाव देऊन त्यांना विकत घ्यायचे आणि जर ते सोबत आले नाहीत, तर थेट तुरुंगात टाकायचे, अशी दडपशाही सुरू आहे. आज विचारांशी कोणतीही बांधिलकी राहिलेली नाही. हे सरकार निष्ठावंत कार्यकर्ता संपवण्याचे काम करत आहे.

 

ब्रिटिश राजवटीचा दाखला देत संजय राऊत म्हणाले, पूर्वी ब्रिटिश आपल्या सोयीसाठी काही जातींना गुन्हेगारी जाती ठरवायचे. अत्यंत दुर्दैवाने तीच प्रथा आजही देशात सुरू आहे. आज देशाचे पंतप्रधान स्वतः ठरवतात की गुन्हेगार कोण! कोणाच्या मागे ’ईडी’ (एऊ) लावायची, कोणाला जेलमध्ये टाकायचे हे वरून ठरवले जाते. यशवंतराव चव्हाण ते शरद पवार यांनी ज्या उपेक्षित समाजाला प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे अस्तित्व आज पुन्हा धोक्यात आले आहे.

 

देशातील आर्थिक गैरव्यवहारांवर बोट ठेवत त्यांनी संताप व्यक्त केला, चोरी केली म्हणून गरिबाला, पारधी समाजातील माणसाला तात्काळ पकडून नेले जाते. मात्र, दुसरीकडे देशातील बँकांचे तब्बल 15 लाख कोटी रुपये चोरून राजेश मेहता सारखे लोक सहज पसार होतात. गेल्या 12 वर्षांत बँकांचे पैसे बुडविणार्‍या बड्या उद्योगपतींचे 14 लाख कोटी रुपये माफ करण्यात आले. देशात रोज 100 बँक फ्रॉड होत आहेत. हे बँक लुटणारे काय राज्यातील गुन्हेगारी जमातीचे आहेत का? मग गुन्हेगार केवळ सामान्य लोकच कसे ठरतात? असा सवाल यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.

 

पश्‍चिम बंगालमध्ये ईव्हीएम गोदामातील आग 4 हजार ईव्हीएम मशिनला आग लागल्याचे सांगितले जाते. पण त्या जळाल्या नाहीत, तर त्या मुद्दाम जाळल्या गेल्या आहेत! असा संशय त्यांनी व्यक्त केला.

 

राम मंदिर प्रकरणात माझ्यावर सीबीआय केस आहे, चार्जशीटमध्ये माझे नाव आहे. पण प्रत्यक्ष अयोध्येच्या राम मंदिरातील दानपेटीतून 5 कोटी रुपये चोरीला गेले, त्यावर देशाचे पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. तिथले सीसीटीव्ही फुटेजही चोरीला गेले. अयोध्येला दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे सांगून भीती निर्माण केली जात आहे, मग ही 5 कोटींची दानपेटी काय दहशतवाद्यांनी पळवली? भाजपचेच खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणतात की, माझ्याकडे नावे आहेत, पण मी बोललो तर ते माझे नाव घेतील. ही कसली पारदर्शकता?

 

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुश्ताक पटेल म्हणाले, आपण सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे कार्य करता आले. या सन्मानामुळे माझ्या कार्याला बळ मिळाले आहे.

 

लेखक नामदेव भोसले यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासाला उजाळा दिला. पोलिसांची भीती पाठीवर बाळगून, भिक्षा मागून आणि जनावरासारखे जीवन जगत आम्ही दिवस काढले. आजही आमचा समाज कुड्या-मुंग्यांप्रमाणे जगत आहे. काँग्रेसचे नेते उल्हासदादा पवार म्हणाले, धनंजय थोरात हे केवळ राजकारणी नव्हते, तर समाजकारणाला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे वडील स. गो. थोरात यांचेही सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे. शहरातील माणसे मराठी भाषा विसरत चालली आहेत.

 

मोहन जोशी, म्हणाले, गेल्या 18 वर्षांपासून पुरस्कार दिला जातो. सामाजिक व संगीत क्षेत्रात उल्‍लेखनिय काम करणार्‍यांना हा पुरस्कार दिला जातो. धनंजय थोरात यांच्या सारखे कार्यकर्ते तयार होण्याची गरज आहे.

 

पराग करंदीकर यांनी प्रस्ताविक केले. सुत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी केले. युवराज शहा यांनी आभार मानले

 

 

 

 

 

चौकट ः

 

पंतप्रधान पदवी विसरतात, पत्नीला विसरतात…

 

देशातील बिघडत चाललेल्या सामाजिक वातावरणावर भाष्य करताना त्यांनी टोला लगावला, ज्या देशात पंतप्रधान आपली पदवी विसरतात, आपली पत्नी विसरतात, तिथे आम्ही मात्र धनंजय थोरात यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याचे स्मरण कृतज्ञतेने ठेवतो. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांचे स्मरण लोकांना होऊ नये, ते कधी जन्माला आलेच नव्हते, असे वातावरण निर्माण करण्याचे काम सध्याची राजकीय व्यवस्था करत असल्याची टिका राऊत यांनी केली.

 

 

 

जनतेला ’निर्भय’ होण्याचे आवाहन

 

जनतेला आणि लेखकांना निर्भय होण्याचे आवाहन केले. तुमच्या पुढच्या पिढीला जर स्वाभिमानाने जगायचे असेल, तर आज निर्भयपणे बोलायला शिका. आजही देशात कोणाला मोकळेपणाने बोलता येत नाही. लिहिणार्‍यांनी आणि बोलणार्‍यांनी आपले काम न भीता केले पाहिजे. जिथे आहात तिथून देशाची सामाजिक परिस्थिती टिकवण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे आवाहन राऊत यांनी केले.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments