Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedशाहू महाराजांचे कार्य संविधानातील समतेकडे जाणारे पाऊल ठरले - लक्ष्मीकांत देशमुख

शाहू महाराजांचे कार्य संविधानातील समतेकडे जाणारे पाऊल ठरले – लक्ष्मीकांत देशमुख

 

पुणे, ता. १४

छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य हे धर्मनिरपेक्ष व समाज परिवर्तन घडविणारे होते. त्यांनी स्री सक्षमीकरणाची क्रांती केली. महिलांना कायद्याचे पाठबळ दिले. वंचितांना आरक्षण दिले. संविधानातील समतेकडे जाणारे ते पाऊल होते, असे मत माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी आयोजित केलेले ३२ वे गांधी दर्शन शिबिर रविवारी गांधी भवन, कोथरूड येथे झाले. यावेळी ‘राजश्री शाहू महाराज आणि भारतीय संविधान’ या विषयावर लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते.

‘सामाजिक विषमतेच्या तळाशी’ या विषयावर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार समीर गायकवाड यांचे व्याख्यान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या थॉटस् ऑफ पाकिस्तान या पुस्तकाविषयी पत्रकार मुक्ता कदम यांचे विवेचन आणि ‘मी सत्यशोधक ज्योतीराव फुले बोलतोय’ हा कुमार आहेर यांनी सादर केलेला एकपात्री प्रयोग या शिबीरात झाला.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, महात्मा फुलेंची प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी काम केले. महाराज हे आदर्श प्रशासक होते. शाहू महाराजांचा कालखंड महिला शिक्षणासाठी चांगला होता. सामाजिक न्याय देणारे संविधान शाहूंनी स्वराज्यात निर्माण केले. समतेचा, सुधारणेचा पथसिध्द मार्ग दिला. महाराजांनी आदेश काढून मागास व सवर्ण यांच्या साठी एकत्र शाळा सुरू केल्या. अस्पृश्यांना वकिली शिक्षण दिले. सर्व सार्वजनिक जागा सर्वांसाठी खुल्या केल्या. कृतीने मनुस्मृतीचे कायदे झिडकारले.

वेश्या, देवदासींमध्ये करत असलेल्या कामाचा अनुभव सांगताना समीर गायकवाड म्हणाले की, रंडी म्हणून वेश्येला नाव ठेवले जाते पण तीच्याकडे जाणाऱ्या पुरूषाला, तीला रंडी बनवणाऱ्यांना नाव ठेवले जात नाही. खरे नालायक आपणच आहोत. आपल्याकडे स्री सन्मान फक्त नावालाच आहे. आपल्याला जन्मताच खूप काही मिळते. मात्र वेश्यांना आपल्या इच्छा, पेटीत दफन करून जगावे लागते. तुम्ही त्यांच्या कडे माणूस म्हणून पहावे. वेश्या वस्तीत सोडून गेलेला नवरा परत येईल म्हणून वाट पाहणारी, मामाने विकलेली, सावत्र बापाने विकलेली वेश्या नाविलाजाने रोज स्वतःला विकते, मात्र तीला प्रेमाचा स्पर्ष तीला मिळत नाही. १०० पैकी ७८ स्रीया जबरदस्तीने या व्यवसायात येतात. त्या प्रेमाच्या भुकेल्या असतात. जीव लावणारा एखादा पुरुष भेटला तर त्याच्यासाठी त्या जीव देखील द्यायला तयार होतात.

मी सुध्दा एकेकाळी उजव्या विचारसरणीचा होतो. दंगली मध्ये सहभागी होतो. आ. ह. साळुंखे, मा. म. देशमुख यांची पुस्तके वाचल्यावर सत्य उमगले. उजव्या विचारसरणीची लोकं आपल्या मेंदूचा ताबा घेतात. आणि त्यांना हवे ते काम करून घेतात. तेथे समता नाही. समरसता हा फसवा शब्द आहे.

रस्त्यावरच्या टोलनाक्यावर पुर्ण विवस्त्र होऊन संभोग करणारा रतलाम, मध्यप्रदेश मधील आमदाराची आपल्याकडे भरपूर चर्चा झाली. मात्र त्या भागात त्याची दखल घेतली नाही. कारण त्यांच्यासाठी हे नित्याचेच होते. हायवे सेक्स हे त्या भागातील नित्याची बाब आहे. गणेशोत्सवात पुण्यात वेश्यांची संख्या वाढते. नवरात्रात कोलकत्यात वेश्यांची संख्या वाढते, यावेळी संस्कृती रक्षक काय करतात. पुण्यामध्ये एका एनजीओ ने वेश्यांना दिलेले धान्य देखील खाल्ले. पुनर्वसन केलेली बाई जेव्हा वेश्या असल्याचे समजते. तेव्हा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. परिस्थिती आणखी बिकट होते. त्यामुळे वेश्या पुनर्वसन स्विकारत नाही.

मुक्ता कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाचा आधार घेवून पाकिस्तानच्या फाळणी बद्दल तसेच मुसलमानांबद्दल जो गैरसमज पसरवला जातो त्याचे खंडण आपल्या विवेचनातून केले. डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील उतारे त्यांचा खंड व पान नंबर सांगत मुक्ता कदम यांनी मांडणी केली.

कदम म्हणाल्या की, पाकिस्तान ची मागणी हवेतून आली नाही. हे सांगतानाच बाबासाहेबांनी ही मागणी मुस्लिम समाजात वाढलेल्या जैविक गोष्टी सारखी रूजवली गेलेली आहे हे स्पष्ट केले होते. १९४० साली पाकिस्तानचा ठराव मुस्लिम लीग ने केला. भारताचे विभाजन नैतिक पाप आहे. मी त्याचा भागीदार बनू इच्छित नाही. असे महात्मा गांधी यांनी म्हणल्याचा उल्लेख बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकात केला आहे. महात्मा गांधी व आंबेडकरांचा फाळणीला विरोधच होता. पाकिस्तान व भारत यांचे संबंध चांगले असावेत अशी त्यांची इच्छा होती. सामाजिक सलोख्याला त्यांचे प्राधान्य होते.

अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले.
प्रविण सप्तर्षी, रमेश आढाव, सुरज कुलकर्णी, युक्रांदचे पुणे शहर संघटक तेजस भालेराव, गांधी दर्शन शिबिराचे समन्वयक गणेश गाढवे, रविंद्र धनक आदी उपस्थित होते.

फोटो ओळ

गांधी दर्शन शिबीरात विचार मांडताना लक्ष्मीकांत देशमुख, डावीकडून व्यासपीठावर बसलेले अन्वर राजन, रमेश आढाव, तेजस भालेराव.

प्रवीण प्र. वाळिंबे
माध्यम समन्वयक
अक्षरकला मिडिया
९८२२४५४२३४
७३८७००२०९७

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments