Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील कर्वे रस्त्यावरील एस एन डी टी स्थानकातील पार्किंग अव्यवस्थे बाबत कारवाई...

पुण्यातील कर्वे रस्त्यावरील एस एन डी टी स्थानकातील पार्किंग अव्यवस्थे बाबत कारवाई करा – महामेट्रोला संदीप खर्डेकर यांचे पत्र

पुणे -पुण्यातील कर्वे रस्त्यावरील एस एन डी टी स्थानकातील पार्किंग अव्यवस्थे बाबत क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांचे लक्ष वेधले आहे.याविषयी महा मेट्रोने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे .

कर्वे रस्त्यावरील मेट्रोचे एस एन डी टी स्थानक हे अत्यंत व्यस्त स्थानकांपैकी एक आहे.( नळस्टॉप कडून कर्वे रस्ता मार्गे पौड फाट्याकडे जाताना डाव्या हाताला )

मात्र हे स्थानक उभारताना येथे पार्किंग च्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात मेट्रोला अपयश आल्याचे जाणवते. येथे अधिकृत वाहनतळ नसल्याने अरुंद कॅनॉल रस्त्यावर शेकडो दुचाकी, चारचाकी पार्क केलेल्या असतात. आधीच हा कॅनॉल रस्ता अरुंद, त्यातून तेथे पंडित जवाहरलाल नेहरू वसाहत असल्याने तेथील रहिवाश्यांची वाहने, त्यांचे सामान, गाई म्हशी असा सगळा पसारा एकीकडे आणि दुसरीकडे गॅरेज, बांधकाम साहित्य विक्री केंद्र, नर्सरी व अन्य दुकाने, पत्र्याच्या शेड व इतर साहित्य.

त्यापुढे पांडुरंग कॉलोनी व अभिनव व पं. दीनदयाळ शाळेकडे जाणाऱ्या कॅनॉल रस्त्यावर असलेले पार्किंग !!

आता तर मेट्रो ने प्रवास करणारे पांडुरंग कॉलनीत वाहने पार्क करायला लागले असून हे प्रमाण वाढत जाणार आहे हे स्पष्टपणे जाणवते.

या भागातील रहिवासी, शालेय विद्यार्थी व ह्या कॅनॉल रस्त्याने करिष्मा सोसायटी पर्यंत जाणारी प्रचंड वाहने या सगळ्यामुळे येथील वाहतूक समस्येची परिस्थिती गंभीर झाली असून भरीसभर म्हणून ऐन स्थानकाखाली रिक्षा स्टॅन्ड व व्यस्त बस स्थानक ( पी एम पी एल चे ) आहे.

या परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांचा रोजचा मन:स्ताप थांबविण्यासाठी आंदोलन उभारण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहोत.

तरी आपण मनपा प्रशासन, वाहतूक पोलीस व अन्य संबंधित प्रशासकीय यंत्रणेसह येथे पाहणी दौरा आयोजित करावा व नागरिकांना दिलासा देण्यासाठी यथायोग्य उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments