Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized'दगडूशेठ' गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमान* श्रीमंत दगडूशेठ...

‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमान* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न

 

 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. श्री राधा-कृष्णांप्रती असलेले दिव्य प्रेम, भक्तीचा वास असलेल्या प्रेम मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरिता प्रेमभावनेत तल्लीन करणारा आध्यात्मिक प्रवास यानिमित्ताने घडविण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतीश रासने, तुषार रायकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा यंदाचे कलादिग्दर्शक नितेश कुमार यांच्या हस्ते पार पडला.

 

सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरिता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा ज्या प्रेम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे, ते मनमोहक पांढऱ्या संगमरवरी वास्तुकलेसाठी व उत्कृष्ट कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय भव्य स्तंभ, प्रकाशमान घुमट आणि कृष्णलीलांचे दर्शन यांसाठी सुपरिचित असलेल्या या मंदिराची प्रतिकृती यंदा गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. नानाविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असेल. जिथे भक्ती प्रेम बनते आणि प्रेम देवत्व बनते या संकल्पनेवर आधारित ही भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

 

प्रतिकृतीच्या रचनेत संगमरवरी वास्तुकलेपासून प्रेरित भव्य दर्शन भाग असणार आहे. उत्तर भारतीय मंदिराच्या पारंपरिक रचनेचे प्रतिबिंब दर्शवणारी कलाकुसर केलेले स्तंभ आणि घुमट, रासलीला, गोवर्धन लीला, झुला यांसारख्या कृष्णलीला दर्शविणारे शिल्पपट देखील असणार आहेत. शोभिवंत फुलांची सजावट, पवित्र शुभचिन्हे आणि आकर्षक विद्युतरोषणाईमुळे सायंकाळनंतर हे मंदिर उजळून निघणार आहे.

 

कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, भौतिकवाद आणि विभाजनाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या जगात प्रेम, भक्ती, सलोखा आणि श्रद्धा या मानवतेला एकत्र बांधणाऱ्या शक्तींचा मिलाफ प्रतिकृतीद्वारे मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. प्रारंभी बुधवार चौकामध्ये भव्य कमान साकारण्यात येणार असून त्यावर आकर्षक नक्षीकाम पहायला मिळेल. मुख्य प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रनिंग मांडवावर कृष्णलीलेतील विविध प्रसंग साकारण्यात येणार आहेत. मंदिराच्या वर दर्शनी भागात राधा-कृष्णाची भव्य मूर्ती देखील असणार आहे. अशा वृंदावनामधील विलोभनीय प्रेम मंदिराची प्रतिकृती गणेशोत्सव २०२६ मध्ये देश-विदेशातील गणेशभक्तांना पुण्यात पाहायला मिळणार आहे. देखाव्यामुळे देशातील धार्मिक, सांस्कृतिक वैभवाचे दर्शन येथे घडते, त्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढण्यास मदत होते.

 

प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये अनेक भव्य खांब असून विविध मूर्ती देखील असणार आहेत. गाभारा व मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक नितेश कुमार आणि ग्लिटरी इव्हेंट्स प्रा. लि. यांनी मंदिराच्या प्रतिकृतीचे काम केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments