Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedवंदे मातरम च्या घोषणा देत तरुणांनी केले चापेकर बंधूंच्या शौर्याचे स्मरण ...

वंदे मातरम च्या घोषणा देत तरुणांनी केले चापेकर बंधूंच्या शौर्याचे स्मरण इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने आयोजन

 

 

पुणे : प्लेग कमिशनर रॅंडच्या अत्याचारांना प्रत्युत्तर देत २२ जून १८९७ रोजी गणेशखिंड येथे पराक्रम गाजविणाऱ्या चापेकर बंधूंच्या शौर्याचे स्मरण करत इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने शौर्य स्मरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील चापेकर बंधूंच्या पुतळ्याजवळ झालेल्या या कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

 

इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने गेली २७ वर्षे हा दिवस शौर्य स्मरण दिन म्हणून साजरा केला जात आहे. यावेळी चापेकर बंधू आणि महादेव रानडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे यांनी चापेकर बंधूंच्या क्रांतिकार्याचा इतिहास उपस्थितांसमोर उलगडला.

 

मोहन शेटे म्हणाले, १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात अपयश आल्यामुळे देशभर नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. अशा काळात वासुदेव बळवंत फडके आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चापेकर बंधूंनी कार्य सुरू केले. त्यांनी लिहिलेल्या कविता आणि आत्मचरित्रातून त्यांच्या प्रखर देशभक्तीचे दर्शन घडते. आपला राग केवळ रॅंड या एका व्यक्तीवर नसून संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यावर आहे, हे दाखविण्यासाठी त्यांनी २२ जून हा राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा हिरक महोत्सवी दिवस आपल्या पराक्रमासाठी निवडला. आपण रॅंडचा वध करणार असल्याचे आगाऊ पत्र पाठवून त्यांनी आपल्या निडर वृत्तीचे दर्शन घडविले.

 

दामोदर चापेकर यांनी फासावर जाताना हातात भगवद्गीता घेतल्याने क्रांतिकार्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. एका कुटुंबातील तीन भाऊ फासावर जाण्याची घटना जागतिक इतिहासात दुर्मीळ असून ती प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

आज देशासाठी मरण्याची नव्हे, तर देशासाठी जगण्याची आवश्यकता आहे. ज्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्या क्रांतिकारकांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेही शेटे यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित तरुणांनी चापेकर बंधूंना पुष्पहार अर्पण करून भारतमाता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments