Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedअतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*

 

 

पुणे, दि. ६ जुलै : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

 

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या निर्माण झालेली पूर परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाकडून त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले असून देहू आणि आळंदी परिसरात वाहतुकीसह हालचालींवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी वारकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

 

वारी १० जुलै रोजी पुण्यात दाखल होणार असून देहू आणि आळंदी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याऐवजी वारकऱ्यांनी थेट पुण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. सध्याच्या परिस्थितीत देहू किंवा आळंदी येथे जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

वारीसाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन वारकऱ्यांच्या निवारा, भोजन, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सोयींचे नियोजन करण्यात आले असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

 

विशेषतः जास्तीत जास्त जर्मन हँगर उभारून वारकऱ्यांच्या सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत असून कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित सर्व विभाग समन्वयाने कार्यरत असून वारकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments