पुणे, दि. २६ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) इमारतींवर काम करणाऱ्या बांधकाम मजुरांसाठी वास्तूरचनेसाठी लागणारे आकृतीबंध (डिझाईन) आणि आर्थिक साक्षरतेसाठी नुकत्याच एका आगळ्या-वेगळ्या कार्यशाळेचे आयोजन केले. त्यामध्ये पुण्या-मुंबईतील मिळून सुमारे ८० बांधकाम मजूर सहभागी झाले असून इथॉस फौंडेशनच्या वास्तूरचनाकार गीता बालकृष्णन, तसेच सोनम आंबे व त्यांच्या अनुभवी तज्ज्ञ सहकार्यानी मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयानंतर लगेचच बीएनसीएमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यशाळेत नारीशक्ती विजेत्या व देशातील पहिल्या महिला बांधकाम कंत्राटदार म्हणून ओळखल्या गेलेल्या सुनिता भगत उर्फ राणी मिस्त्री यांनी त्यांचा बांधकाम क्षेत्रातील प्रवास आभासी माध्यमातून सांगितला व प्रश्नांना उत्तरे दिली. भगत म्हणाल्या की, इमारतीचे बांधकाम करत असताना प्रत्येकाची छोट्या छोट्या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. हा सल्ला त्यांनी डिझाईन तयार करणाऱ्या वास्तूरचनाकारांनाही दिला. आभासी माध्यमातून भगत यांचा सत्कार झारखंडच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटक्चरतर्फे करण्यात आला.
डॉ. कश्यप यांनी या कार्यशाळेचे स्वागत केले. ते म्हणाले की, वास्तूरचनाकारांचे वास्तूस्वप्न साकार करणाऱ्या या हजारो अज्ञात बांधकाम मजुरांच्या हातांमधील अंतर यातून आपोआप कमी होणार आहे. बीएनसीएप्रमाणे अन्य वास्तूरचनाशास्त्र शिकवणाऱ्या महाविद्यालयींनीही अशा कार्यशाळांसाठी प्रोत्साहन द्यायला हवे.
गीता यांनी वास्तूरचनाशास्त्राबद्दल जागृती करण्यासाठी देशभरातील सात राज्यांमधून १,७०० किलोमीटरची पदयात्रा केली, तेव्हा त्यांनी अनेक बांधकाम मजूरांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर त्यांना अशा प्रकारची कार्यशाळेची संकल्पना सुचली. या कार्यशाळेतून गीता यांनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध सरकारी योजनांची तसेच त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत आर्थिक नियोजन व्यवस्थापनाचीही माहिती सांगितली. वास्तूरचनेसाठी लागणाऱ्या डिझाईनच्या महत्त्वाबद्दल त्यांनी सोप्या भाषेत माहिती सांगितली. त्यासाठी रेखाचित्रे, मॉडेल्स इत्यादी विविध माध्यमांचा वापर करत सादरीकरण केले. गीता यांनी बांधकाम कामगारांचे आयुष्य, जीवनमान, त्यांच्या आशा-आकांक्षा, सोडवावे लागणारे विविध प्रश्न याबाबतही सुसंवाद साधला.
या कार्यशाळेचे आयोजन बीएनसीए तसेच बसेरा सेंटर फॉर इनोव्हेशन अॅण्ड गव्हर्नन्सतर्फे बीएनसीएतील प्राध्यापक आर्किटेक्ट मंदार सुनील आठवले यांनी केले. बीएनसीएचे उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे तसेच प्रा. महेश बांगड, याशिवाय जनसाहस, लर्न, हर मॉनी या स्वयंसेवी संस्था, एसजेके आर्किटेक्ट्स व त्यांचे सहकारी, एमप्लसपी आर्किटेक्ट्स कोलॅबरेटिव्हच्या आर्किटेक्ट पूजा चाफळकर आणि धर्मादाय सामाजिक उत्तरदायित्त्वातून (सीएसआर) महाराष्ट्रात या कार्यशाळेचे प्रायोजकत्व सेंट गोबेन तर्फे करण्यात आले आहे. या कार्यशाळेत गणेश ससाणे, पुष्पा ससाणे, संतोष राठोड, चंदू चव्हाण यांसारखे अनेक कामगार मजूर सहभागी झाले. तसेच बीएनसीएतील विद्यार्थिनीही या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.


