Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorized*बालगंधर्वांचा तानपुरा परांजपे कुटुंबीय देणार गोपाळ गायन समाजाला भेट* कै. कमलाबाई...

*बालगंधर्वांचा तानपुरा परांजपे कुटुंबीय देणार गोपाळ गायन समाजाला भेट* कै. कमलाबाई परांजपे यांना बालगंधर्वानी दिलेला तानपुरा ; तब्बल १०० वर्षांहून अधिक वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा

पुणे : संगीत परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या गोपाळ गायन समाज संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीच्या निमित्ताने आयोजित उत्सवात बालगंधर्वांचा तानपुरा पुण्यातील परांजपे कुटुंबीय गोपाळ गायन समाजाला भेट देणार आहेत. गुरुवार, दि. २३ जुलै रोजी टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात सायं. ५.३० वाजता होणाऱ्या स्वरमैफलीच्या प्रारंभी हा कार्यक्रम होईल, अशी माहिती तानपुरा जतन करणारे प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी दिली.

डॉ.रामचंद्र परांजपे यांच्या मातोश्री कै. कमलाबाई परांजपे या गोपाळ गायन समाजात पं. गोविंदराव देसाई यांच्याकडे शिकत होत्या. प्रत्येक गोकुळाष्टमीला उत्सवात त्यांचे गायन होत असे. सन १९२१ मध्ये मुंबईमध्ये संयुक्त मानापमानचा प्रयोग होता. त्यावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी आपला तानपुरा बालगंधर्वांना सप्रेम भेट दिला होता. बालगंधर्व पुण्यात आले की कै. बापूसाहेब व कमलाबाई परांजपे यांच्याकडे उतरत असत. तसेच त्यांना नाट्यपदे शिकवत असत.

त्यावेळी केशवरावांचा तानपुरा बालगंधर्वानी कै. बापूसाहेब व कमलाबाई परांजपे यांच्याकडे दिला होता. त्यांचे सुपुत्र डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी तो जतन केला आहे. हाच ऐतिहासिक ठेवा गोपाळ गायन समाजाला भेट म्हणून देण्यात येणार आहे. शंभराहून अधिक वर्षे उलटून गेली तरी देखील आजही तो तानपुरा देखणा व उत्तम स्थितीत आहे, असे गोपाळ गायन समाजाचे डॉ.विकास कशाळकर यांनी सांगितले.

पं. गोविंदराव देसाई हे संगीतोद्धारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे पट्टशिष्य. गुरूंच्या आदेशानुसार त्यांनी पुण्यामध्ये संगीताच्या प्रसाराचे कार्य सुरु केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने त्यांनी १९२६ साली गोपाळ गायन समाजाची स्थापना केली. स्वतःचा संगीत अभ्यासक्रम सुरु केला.

अशा गोपाळ गायन समाजच्या शतकोत्तर उत्सवाचा प्रारंभ कै. कमलाबाई परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘रंगबहार’ या नाटयगीतांच्या कार्यक्रमाने होणार आहे. सूरगंधर्व सुरेश साखवळकर, बकुळ पंडित, केदार केळकर, अस्मिता चिंचाळकर, अभिनेत्री गात, रवींद्र कुलकर्णी व संजय गोगटे (ऑर्गन), केदार कुलकर्णी (तबला) यांचा सहभाग यामध्ये आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुरुवारी हा तानपुरा भेट देण्यात येईल. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला यावे, असे आवाहनही डॉ.रामचंद्र परांजपे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments