Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedकारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक व वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा सांस्कृतिक कार्य...

कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक व वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे कृतज्ञतापूर्वक अभिवादन

मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धातील महाराष्ट्रातील वीरसैनिक, वीरपत्नी, वीरमाता तसेच दिव्यांग सैनिक यांच्या राष्ट्रसेवेतील अद्वितीय शौर्य, त्याग आणि अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘वीरसैनिक व वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा सोमवार, 27 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता लोकभवन, मुंबई येथे होणार आहे.

कारगिल युद्धातील वीर योद्धे, वीरनारी, वीरमाता तसेच दिव्यांग सैनिक यांच्या राष्ट्रसेवेतील अद्वितीय शौर्य, पराक्रम, त्याग आणि योगदानाला कृतज्ञ अभिवादन करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करताना भारतीय सशस्त्र दलातील वीर जवानांनी केलेल्या सर्वोच्च त्यागाची स्मृती जागविणे आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सन 1962 मध्ये महान गीतकार कविवर्य प्रदीप यांनी रचलेली आणि संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली वीरनारी व वीरमातांना समर्पित ऐतिहासिक देशभक्तिपर रचना, स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी नव्याने स्वरबद्ध केली आहे. या रचनेतून राष्ट्रभक्ती, शौर्य आणि त्यागाच्या भावनेला उजाळा देण्यात येणार आहे.

भारतीय सशस्त्र दलाच्या अदम्य शौर्य, पराक्रम, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेला अभिवादन करणारी देशभक्तिपर सांगीतिक प्रस्तुतीही या कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहे. नचिकेत देसाई, शिवम सिंह आणि इतर ख्यातनाम कलाकारांच्या सादरीकरणातून भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेला सांगीतिक अभिवादन करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी दिली.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments