Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुंबई येथे 23 जुलै 2026 रोजी ‘खिडकी : एक मनामनातलं अभिवाचन’ ...

मुंबई येथे 23 जुलै 2026 रोजी ‘खिडकी : एक मनामनातलं अभिवाचन’ · मानवी भावविश्वाचा संवेदनशील कलात्मक आविष्कार रसिकांना अनुभवता येणार

मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने ‘खिडकी : एक मनामनातलं अभिवाचन’ या वैशिष्ट्यपूर्ण साहित्य-रंगमंचीय कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

गुरु प्रॉडक्शन्स आणि आरती आर्ट अकादमी निर्मित हा 56 वा प्रयोग रसिकांसाठी विनामूल्य खुला असून साहित्य, अभिनय आणि प्रभावी अभिवाचनाचा संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून रसिकांना मिळणार आहे. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रदीप कबरे लिखित व अभिनित ‘खिडकी’ हे अभिवाचन जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देणारे आहे. दैनंदिन जीवनातील विविध अनुभव, मानवी नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि भावविश्व यांचे प्रभावी शब्दचित्र या कार्यक्रमातून साकारले जाते. बस, रेल्वे, मोटार, रिक्षा, घर, कार्यालय अशा विविध ‘खिडक्यां’तून दिसणारे प्रसंग आणि त्यातून उलगडणाऱ्या भावना प्रदीप कबरे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिवाचन शैलीतून प्रेक्षकांसमोर जिवंत करतात. त्यामुळे हे केवळ अभिवाचन न राहता एक प्रभावी रंगमंचीय अनुभव ठरतो.

या साहित्यकृतीला ज्येष्ठ नाटककार ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गव्हाणकर यांची प्रस्तावना लाभली आहे; तसेच शं. ना. नवरे, अरुण नलावडे, स्मिता जयकर, ऐश्वर्या नारकर, संभाजी सावंत, डॉ.अनिल बांदिवडेकर, अभिराम भडकमकर, नितीन तेंडुलकर यांसह अनेक नामवंत साहित्यिक, रंगकर्मी आणि कलावंतांनी ‘खिडकी’ या अभिवाचनाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

हास्य, करुणा, संवेदना, अंतर्मुखता आणि जीवनातील विविध भावछटा यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे. प्रत्येक खिडकीतून दिसणाऱ्या वेगवेगळ्या जगाचा आणि त्या अनुभवांशी जोडल्या जाणाऱ्या मानवी भावनांचा कलात्मक प्रवास या अभिवाचनातून उलगडत जातो. साहित्यिक आशय, नाट्यमय मांडणी आणि प्रभावी सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांसाठी संस्मरणीय ठरणार आहे.

सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments