Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिधीअभावी डीपी रोडवरील कामे रखडू देऊ नयेत!* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या...

निधीअभावी डीपी रोडवरील कामे रखडू देऊ नयेत!* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्पष्ट सूचना*

*राजाराम पूल–डीपी रोड वाहतूककोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीला प्रारंभ*

*वाहतूक नियोजनासाठी १५ वॅार्डन ही देण्याची घोषणा*

कोथरूडमधील राजाराम पूल–डीपी रोड परिसरातील वाढती वाहतूककोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज घेतला. या उपाययोजनांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. महापालिका तसेच आमदार निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे केवळ निधीअभावी कोणतेही काम रखडू देऊ नये, अशा स्पष्ट सूचना ना. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, वाहतूक नियोजनासाठी लोकसहभागातून १५ वॅार्डन देखील देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

या बैठकीस भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भूतडा, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, भूमी संपादन विभागाचे श्री. बांगर, कार्यकारी अभियंता बांधकाम करपे साहेब, टी डी आर सेल चे कार्यकारी अभियंता जे बी पवार, मालमत्ता व्यवस्थापन चे राजेंद्र थोरात, वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी १७ जुलै रोजीच्या पाहणीदरम्यान दिलेल्या सूचनांवर झालेल्या कार्यवाहीची माहिती अधिकाऱ्यांनी सादर केली. डीपी रोडवरील अतिक्रमण हटविणे, वाहतुकीचे पुनर्नियोजन, पादचारी सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, रम्बल स्ट्रिप्स, पादचारी क्रॉसिंग, गतिरोधक तसेच वाहतूक विभागाने सुचविलेल्या विविध सुधारणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर समाधान व्यक्त करत ना. पाटील यांनी उर्वरित कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत वाहतूक व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे डीपी रोडवरील रस्त्याच्या दुभाजकांमध्ये तयार झालेल्या अनधिकृत पंक्चरवर नियंत्रण आणणे हा होता. या मार्गावर एकूण १४ पंक्चर असल्याचे निदर्शनास आले असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात सात पंक्चर बंद करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. सिंहगड चपाती, महालक्ष्मी नर्सरी, सौरभ सोसायटी, ओलीव्हा हॉटेल, वर्तक हेरिटेज, करी लीफ तसेच कोल्हापुरी कट्टा हॉटेलसमोरील पंक्चर बंद करण्यात येणार आहेत. उर्वरित पंक्चरबाबत वाहतूक विभागाच्या सूचनांनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यात येतील.

याशिवाय महालक्ष्मी लॉन्स–राजाराम पूल ते पटवर्धन बाग या संपूर्ण मार्गाची वाहतूक शाखेने संयुक्त पाहणी करून वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रस्ता ओलांडण्यासाठी निश्चित ठिकाणे, दुभाजकांतील अनधिकृत मार्ग बंद करणे, वाहतुकीच्या दिशांमध्ये आवश्यक बदल करणे आणि सिग्नल व्यवस्थेत सुधारणा करणे यांसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

यावेळी ना. पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, वाहतूक समस्येवर तात्पुरते नव्हे, तर पुढील अनेक वर्षांचा विचार करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. नागरिकांची गैरसोय कमी करणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. निधीची चिंता न करता आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत.

बैठकीनंतर भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी सांगितले की, सदर उपाययोजनांचा फायदा केवळ डीपी रोडपुरता मर्यादित राहणार नाही. या बदलांमुळे सिंहगड रस्ता, मेहेंदळे गॅरेज चौक, विठ्ठल मंदिर रस्ता, कर्वेनगर पाणंद रस्ता तसेच परिसरातील इतर महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीच्या शेवटी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांचे नियमित मूल्यमापन करावे आणि त्यानुसार आवश्यक बदल करून वाहतुकीसाठी कायमस्वरूपी प्रभावी व्यवस्था उभी करावी, असे निर्देश ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments