पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी | २४ जुलै २०२६:- अनुसुचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून हिंदू मातंग सेना आणि शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांना केंद्रीय मंत्रिपदावरून तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी दाखले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
दाखले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार प्रभावीपणे काम करत आहे. तसेच, अनुसुचित जाती उपवर्गीकरणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक भूमिका घेतील आणि लवकरच याबाबत निर्णय जाहीर होईल.मात्र, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २७ जुलै रोजी विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याचे कार्यकर्त्यांना दिलेले आवाहन चुकीचे आहे.यापूर्वी मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला पाठिंबा दर्शविणारी भूमिका घेतल्यानंतर आता त्यात बदल करणे योग्य नाही.
हिंदू मातंग सेना आणि शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे रामदास आठवले यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे यासंदर्भात शिफारस करावी आणि महामहीम राष्ट्रपतींनीही या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.भारतातील मातंग समाजाच्या भावना लक्षात घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना तात्काळ मंत्रिपदावरून हटवण्यात यावे.


