पुणे : आषाढी एकादशीनिमित्त श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट व लायन्स क्लब ऑफ पुणे सिटी, लायन्स क्लब पुणे कोथरूड आणि लायन्स क्लब पुणे धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांसाठी महाआरोग्य शिबिर तसेच महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन लायन्स इंटरनॅशनलचे गव्हर्नर श्रेयस दीक्षित यांच्या हस्ते झाले.
या उपक्रमात १०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर २०० ते २५० नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दीपक थोरात, सचिव नरेंद्र गाजरे, सहसचिव बाळासाहेब ताठे, विश्वस्त महेश अंबिके व स्वप्नील काळभोर तसेच मंदिराचे कर्मचारी उपस्थित होते. लायन्स क्लब पुणे सिटीचे अध्यक्ष दीपक थोरात, खजिनदार बजरंग आकडे, लायन्स क्लब पुणे कोथरूडचे अध्यक्ष गुणेश साने आणि लायन्स क्लब पुणे धनकवडीचे अध्यक्ष भानुदास पायगुडे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी देवस्थानातर्फे घोलप ब्लड बँकेला हिमोग्राम तपासणी मशीन भेट देण्यात आले. तसेच ब्लड बँकेच्या वतीने माजी गव्हर्नर अभय शास्त्री यांच्या हस्ते देवस्थानचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय मंचर-भीमाशंकर रोडवरील पळस टीका गावातील सह्याद्री बालगृहातील अनाथ विद्यार्थ्यांना देवस्थानातर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
दीपक थोरात म्हणाले, आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी देवस्थानाच्या वतीने शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या तीन क्षेत्रांत सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, भविष्यातही हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार आहे.


