पुणे,28 जुलै 2026 : द पुणे ऑब्स्टेट्रिक ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटी (पीओजीएस) तर्फे द असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटीज् (एएमओजीएस) च्या स्तनपान आरोग्य समितीच्या सहकार्याने आयोजित लॅक्टेकॉन 2026 ही एकदिवसीय परिषद नुकतेच पार पडली. या परिषदेची संकल्पना आजचे स्तनपान,उद्याचे सुदृढ बालक,निरोगी कुटुंब व उज्वल भविष्य (ब्रेस्टफीडिंग टुडे,स्ट्राँगर बेबीज हेल्दीअर फॅमिलीज् बेटर टुमारो) ही होती.
उद्घाटनप्रसंगी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनेकोलॉजी ॲन्ड ऑब्स्टेट्रिक्स (फिगो) च्या फिगो वेलवुमन हेल्थकेअर उपक्रमाच्या विभागीय संचालक डॉ.हेमा दिवेकर,लॅक्टेकॉनच्या संयोजक डॉ.मंगला वाणी, पीओजीएसच्या अध्यक्ष डॉ.उमा वानखेडे,सरसचिव डॉ.चारुलता बापये, खजिनदार डॉ.अमोल लुंकड, वैद्यकीय सचिव डॉ.अर्चना पुंगालिया आणि फॉग्सीच्या उपाध्यक्ष डॉ.मीनू अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी पीओजीएसच्या स्पेक्युलम या नियतकालिकेचे व स्तनपानाबाबत जागृती करणाऱ्या पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले.
आपल्या बीजभाषणात इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनेकोलॉजी ॲन्ड ऑब्स्टेट्रिक्स (फिगो) च्या फिगो वेलवुमन हेल्थकेअर उपक्रमाच्या विभागीय संचालक डॉ.हेमा दिवेकर म्हणाल्या की,स्तनपानाचे यश मातेच्या दृढ निश्चयाबरोबरच तिला याबाबत मिळणाऱ्या समर्थनावर देखील अवलंबून असते. यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये प्रशिक्षित स्तनपान सहाय्यकांची (ब्रेस्ट फीडिंग फॅसिलिटेटर्स) ची आवश्यकता आहे. प्रशिक्षित समुपदेशकांची कमतरता,स्तनपानास उशिरा सुरूवात,चुकीच्या पध्दती,आत्मविश्वासाचा अभाव, सुरूवातीच्या काळातच फॉर्म्युला दुधाचा वापर आणि प्रसूतीपूर्व काळात अपुरी काळजी ही सर्वांत मोठी आव्हाने आहेत.प्रसूतीतज्ञ, बालरोग तज्ञ, परिचारिका, प्रसविका (मिडवाईव्ज),आशा वर्कर्स, स्तनपान सुमपदेशक आणि आरोग्य सेवक या सर्वांकडे पुराव्यांवर आधारित समुपदेशनाची कौशल्ये असणे आवश्यक आहे.रचनात्मक कौशल्य विकास,निरंतर मार्गदर्शन आणि संस्थात्मक कटिबध्दता यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक आरोग्यसेवा पुरवठादाराला ब्रेस्ट फीडिंग फॅसिलिटेटर बनवू शकतो आणि माता व बालकांसाठी आरोग्यविषयक उत्तम परिणाम साध्य करू शकतो.
महाराष्ट्रातील युनिसेफच्या पोषणतज्ञ राजलक्ष्मी नायर यांनी आपल्या ऑडिओ संदेशात सांगितले की,हवामान बदलाचा प्रभाव हा माता,गरोदर महिला आणि नवजात शिशुंवर होत आहे.यामुळे स्तनपानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.स्तनपान म्हणजे केवळ बाळाला आहार देणे नव्हे तर मुलांचे योग्य संगोपन,त्यांची बुध्दिमत्ता व भविष्य अधिक उज्वल घडविणे आहे.स्तनपान आणि योग्य वेळी पूरक आहार याला वैज्ञानिक पुराव्यांचा भक्कम आधार आहे.महाराष्ट्राने सर्व जिल्ह्यांत सुरू केलेल्या या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळणे आवश्यक आहे.प्रत्येक बालकाचा पूर्ण विकास होण्यासाठी जन्मानंतर लवकरात लवकर स्तनपान सुरू करणे व ते सहा महिने सुरू ठेवणे.योग्य वेळी पुरक आहार देणे या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
द असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटीज् (एएमओजीएस) चे अध्यक्ष डॉ.अमेय पुरंदरे यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात सांगितले की,स्तनपान हा सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे.माता,बालक यांच्या आरोग्याबरोबरच कुटुंब ही बळकट होते आणि एका अधिक निरोगी समाजाचा पाया रचला जातो.
परिषदेच्या संयोजक डॉ. मंगला वाणी म्हणाल्या, स्तनपानाबाबत आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक स्त्रीरोगविषयक परिषदेत स्तनपानावर स्वतंत्र सत्र असले पाहिजे, जेणेकरून मातांना योग्य माहिती आणि आवश्यक सहकार्य देण्यासाठी आरोग्यसेवक आवश्यक ज्ञान व कौशल्यांनी सुसज्ज होतील.
स्तनपानाशी संबंधित विविध विषयांवर या परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले. प्रसूतीतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, लॅक्टेशन कन्सल्टंटस्, परिचारिका तसेच आरोग्यसेवा क्षेत्रातील अन्य तज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते. माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबरच स्तनपानासंदर्भातील आधुनिक पध्दती,आव्हाने आणि त्यावरील प्रभावी उपाययोजनांवर परिषदेत चर्चा करण्यात आली.
वैज्ञानिक कार्यक्रमांमध्ये द लॅक्टेशन लेन्स या संकल्पनेवर अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये जन्मानंतरच्या पहिल्या तासाचे महत्त्व,स्तनपानाला पर्याय म्हणून दिले जाणारे ब्रेस्ट मिल्क सब्स्टीट्युट या संदर्भातील विविध नियम,फॉर्म्युला मिल्क,मिल्क बँकींग,स्तनपानावेळी पालकांसमोरील आव्हाने यांसह प्रदूषण अशा अनेक विषयांचा समावेश होता.याशिवाय अनेक मार्गदर्शन व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
स्तनपानाविषयक अद्ययावत माहिती,ज्ञान,तज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचार पध्दतींची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच माता आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ही परिषद मह
त्त्वाची ठरली.


