Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedतळागाळातील नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा - उपसभापती सचिन अहिर

तळागाळातील नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा – उपसभापती सचिन अहिर

 

वरळीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मुंबई, दि. २८ : राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे ही विचारधारा छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनात रुजवली. त्याच धाग्यातून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाद्वारे शासन तुमच्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी केले.

 

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने वरळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी हाजी अली येथील लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे आयोजित समाधान शिबिरात ते बोलत होते.

 

यावेळी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, उप जिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे, सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करत उपसभापती श्री अहिर यांनी ही शिबिरे केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता आवश्यकतेनुसार सातत्याने राबवावीत, असे आवाहन केले. संजय गांधी निराधार योजनेव्यतिरिक्त बालसंगोपन योजनेअंतर्गत निराधार महिलांना मिळणाऱ्या मदतीच्या योजनांची व्यापक जनजागृती व्हावी, यावर त्यांनी भर दिला.

 

कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या की, कोकण विभागात मोठ्या प्रमाणावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, सात-बारा उतारे, प्रलंबित फेरफार नोंदी तसेच रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. मोठ्याप्रमाणावर ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात असल्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

 

प्रास्ताविक करतांना जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या की, गेल्या तीन महिन्यांत मुंबई शहरात विविध प्रकारच्या साडे सात लाख सेवा नागरिकांना प्रदान करण्यात आल्या आहेत. शासनाने ऑनलाइन प्रक्रिया सुलभ केल्याने दाखले, प्रवेश आणि इतर सेवा आता सहज उपलब्ध होत आहेत. शासनाच्या डिजिटल सुविधाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

 

या अभियानात प्रशासनातील तब्बल ३९ विभागांनी एकत्र येत सहभाग नोंदवला. यावेळी वरळी मतदारसंघातील शेकडो गरजू लाभार्थी नागरिकांना विविध शासकीय योजनांची प्रमाणपत्रे आणि दाखल्यांचे वाटप उपसभापती श्री. सचिन अहिर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वरळीतील या शिबिरात नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी

झाले होते.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments