पुणे, २८ मार्च २०२४ : केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे जागतिक ऑटिझम जागरूकता महिन्यानिमित्त सोमवार,1 एप्रिल 2024 रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑटिझम स्पेक्ट्रम आजाराबाबत जागरुकता निर्माण करणे,त्याबाबत असणारे गैरसमज दूर करणे आणि सर्वसमावेशकतेला चालना देणे हा या रॅलीचा मुख्य हेतू आहे. या रॅलीमध्ये डॉक्टर, केईएम हॉस्पिटल पुण्यातील कर्मचाऱ्यांसह ऑटिझम असलेल्या मुलांचे पालक सहभागी होणार आहेत. ही रॅली सकाळी ७.३० वाजता गुडलक चौक येथून सुरु होणार असून एफसी रोड, जेएम रोड मार्गे परत प्रवास करेल.
मेंदू विकासासंबंधी विकार असलेल्या व्यक्तीचे वर्तनाबाबत आणि सामाजिकरित्या संवाद साधण्याची क्षमता याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस व संपूर्ण एप्रिल महिना ऑटिझम जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. हा या विकाराचा सर्व वयोगटांवर परिणाम होऊ शकतो. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ऑटिझम बाबत जागरूकता पसरवणे,याबरोबरच ऑटिझम असलेल्या व्यक्तींकरीता एक सहाय्यक वातावरण निर्माण करणे आणि ऑटिझम असलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना पाठिंबा देणे हा आहे.


