Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सव कार्यकर्ते हे समाजातील सज्जनशक्ती ज्येष्ठ अभिनेते आणि मसापचे अध्यक्ष योगेश सोमण...

गणेशोत्सव कार्यकर्ते हे समाजातील सज्जनशक्ती ज्येष्ठ अभिनेते आणि मसापचे अध्यक्ष योगेश सोमण : जय गणेश व्यासपीठाच्या वतीने आगामी साहित्य संमेलनाच्या शताब्दी निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेस शुभेच्छा आणि कार्यकारिणीच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन

पुणे : गणेशोत्सव कार्यकर्ते समाजामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रम राबवून काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेतली जाणे महत्त्वाचे असून, प्रत्येकाचे काम प्रेरणादायी आहे. केवळ आपला नामोल्लेख व्हावा म्हणून नव्हे, तर समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून कार्यकर्ते काम करतात, हीच खरी प्रेरणादायी शक्ती आहे. गणेशोत्सव कार्यकर्ते हे समाजातील सज्जनशक्ती आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश आजही समाजात साध्य होताना दिसत आहे. हे गणेशोत्सव कार्यकर्त्यांचे यश आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी व्यक्त केले.

जय गणेश व्यासपीठाच्या वतीने आगामी साहित्य संमेलनाच्या शताब्दी निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेस शुभेच्छा आणि कार्यकारिणीच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता येथे करण्यात आले होते. यावेळी सोमण बोलत होते. आमदार हेमंत रासने, श्याम मानकर यांच्या हस्ते कार्यकारिणीचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, पीयूष शाह, विष्णू ठाकूर, गिरीश पोटफोडे, दत्ता सागरे, उदय जगताप, किरण सोनीवाल, सुधीर ढमाले, अमित जाधव राजाभाऊ महाडिक नितीन होले, भैलुमे सर, सागर कोरडे तसेच गणेशोत्सवाचे कार्यकर्ते उपस्थित होते. गणेश मूर्ती, पुणेरी पगडी, शाल, पुष्प देऊन मसापचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणीचा सन्मान करण्यात आला.

योगेश सोमण म्हणाले, मागील २५ वर्षात पाय धरावे असे पायच शिल्लक नाहीत, असे म्हटले जाते; मात्र ते पाय आपण शोधत नाही, ही वस्तुस्थिती आहे. गणेशोत्सव कार्यकर्ते आज समाजामध्ये विविध उपक्रम राबवून विधायक काम करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेतली पाहिजे. या कार्यकर्त्यांच्या कामावर अनेक शॉर्ट फिल्म्सचे विषय तयार होऊ शकतात. त्यासाठी अभिनयाची गरज नाही, कारण हे वास्तव जीवनातील काम आहे.

ते पुढे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर ती बोलती, वाहती आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यरत आहे. शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. या ऐतिहासिक संमेलनाची एक पणती गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तेवत ठेवावी आणि त्याचे निमंत्रण प्रत्येक गणेशोत्सव मंडळात लावावे, असे आवाहनही सोमण यांनी केले.

हेमंत रासने म्हणाले, पुण्याच्या गणेशोत्सवाला १३५ वर्षांचा निरंतर प्रवास लाभला आहे. न कळत्या वयापासून बाप्पाची सेवा करणारे अनेक गणेशोत्सव कार्यकर्ते आजही कार्यरत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वर्षातील सुमारे तीन महिने गणेशोत्सवासाठी द्यावे लागतात आणि तो हा वेळ समर्पित वृत्तीने देतो.

लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्या उद्देशाचा विस्तार आज विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून होत आहे. जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून समाजातील गरजू-उपेक्षित व्यक्तींना मदत करण्याचे काम केले जात आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे हे काम पुढेही सुरू राहील, असे रासने यांनी सांगितले.

आनंद सराफ यांनी पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा तसेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments