Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized_चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कृती आराखडा अंतिम करण्याची कार्यवाही सुरु*_

_चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कृती आराखडा अंतिम करण्याची कार्यवाही सुरु*_

*

*वाहतूक, पार्किंग, अतिक्रमण निर्मूलनासह रस्ते दुरुस्तीची कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश*

पुणे, दि. २१ : चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक नियोजन, वाहनतळांची उपलब्धता, अतिक्रमण निर्मूलन आणि रस्ते सुधारणा यांचा एकत्रित विचार करून कृती आराखडा तयार करावा. वाहतुकीचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित विश्लेषण व सिम्युलेशन करून आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त पार्किंगची क्षमता ओळखावी आणि त्यानुसार पुढील कार्यवाहीचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक नियोजन, वाहनतळ नियोजन, वीजपुरवठा तसेच रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, सल्लागार तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चाकण परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा एआयच्या माध्यमातून अभ्यास करून वाहतूक प्रवाह, वाहनांची संख्या, पार्किंगची गरज आणि संभाव्य वाहतूक कोंडीची ठिकाणे यांचे सिम्युलेशन करावे. त्याआधारे आवश्यक असलेला महत्त्वाचा रस्ते भाग व वाहतूक सुधारणा उपाययोजनांचा आराखडा पुढील शुक्रवारीपर्यंत तयार करण्याचा प्रयत्न करावा. या आराखड्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्यता घेऊन आवश्यक कामे पुढील तीन ते चार महिन्यांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

*अतिक्रमण निर्मूलनाला गती*
चाकण औद्योगिक परिसरातील अतिक्रमणे हटविण्याच्या कार्यवाहीलाही गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, एमएसआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या अखत्यारितील रस्ते व परिसरातील अतिक्रमणांची संयुक्तपणे पाहणी करावी. आवश्यक ते पंचनामे करून नोटिसा बजावाव्यात आणि पुढील शुक्रवारीपासून अतिक्रमण निर्मूलनाची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
विविध विभागांच्या अखत्यारितील तसेच संयुक्त अखत्यारितील रस्त्यांवर अतिक्रमण असल्यास संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी.

वाहतूक जिथे खोळंबते त्या १९ किलोमीटरच्या भागात अतिक्रमण हटवून त्यानंतर रस्ते सुधारणा कामे करण्यात यावीत. अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीची चार कामे पूर्ण करा
चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, साईड पट्टे व शोल्डर व्यवस्थित करणे, पावसामुळे व पुरामुळे रस्त्यावर आलेला गाळ व घाण साफ करणे तसेच रस्त्यावर साचलेला कचरा हटविणे, ही चार कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. ही कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

एमएसआयडीसीमार्फत सुरू असलेल्या कामांचाही याचबरोबर आढावा घेण्यात यावा. संबंधित विभागांनी कामांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घ्यावा. येत्या सोमवार किंवा मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी करून कामांची स्थिती तपासण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने आणि निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत. वाहतूक, पार्किंग, अतिक्रमण आणि रस्ते याबाबतच्या उपाययोजना एकाच समन्वित आराखड्याद्वारे राबवून औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments